आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सव्यसाची समीक्षक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साक्षेपी चिकित्सक दृष्टी आणि साहित्यातील मर्म नेमकेपणे जोखण्याची वृत्ती यामुळे मराठी साहित्याची कसदार व धारदार समीक्षा करणाऱ्या मोजक्या समीक्षकांचे अध्वर्यूपण प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्याकडे सहजी चालत आले होते. हातकणंगलेकरांनी आपल्या जीवनक्रमात साहित्याचा मोठा कालपट पाहिला होता.
एकोणिसाव्या शतकात मराठी साहित्याची खऱ्या अर्थाने रुजुवात झाली. भारतामध्ये सुरू असलेला स्वातंत्र्यलढा, स्वातंत्र्यानंतरचा भारत, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती अशा असंख्य घटनांचा प्रभाव मराठी साहित्यिकांवर पडत होताच. त्यातून मराठी साहित्यामध्ये विविधांगी लेखनाचे धुमारे फुटत होते. एक काळ असा आला की, मराठी साहित्य हे सत्यकथेच्या म्हणजे पर्यायाने अभिजनवर्गाच्या चौकटीतच अडकून पडले. याविरोधात बहुजन, दलित समाजातील लेखकांनी विद्रोहाचे रणशिंग फुंकले. त्यातून दलित, आदिवासी अशा समाजातील विविध स्तरांतील लेखक आपले जीवनानुभव पुस्तकांच्या रूपाने समाजासमोर ठेवू लागले. मराठी साहित्याचा प्रवाह मोकळा झाला होता. या सर्व साहित्यिक घडामोडींचा बारकाईने वेध घेत प्रा. म. द. हातकणंगलेकरांनी मराठी साहित्याची समीक्षा केली. त्यांच्या लेखनाला शहरीपणाचा नव्हे तर हातकणंगल्याच्या मातीचा सुगंध होता. ग्रामीणतेशी जुळलेली नाळ कायम राखून आधुनिक जगातील साहित्यप्रवाहांनाही आपल्या समीक्षालेखनातून कवेत घेणारा समीक्षक अशी त्यांची करून दिलेली ओळख हातकणंगलेकरांना सुखावून जात असे. एक काळ असा होता की, सत्यकथेचे लेखक असणे हा मराठी साहित्यातील बहुमान समजला जायचा. त्यामागे मौज प्रकाशनाचे सर्वेसर्वा श्री. पु. भागवत यांचे उत्तम लेखक शोधून काढण्याचे परिश्रमही कारणीभूत होते. आपल्याला भावलेल्या लेखकांना मौज परंपरेतील निकषांनुसार चिकित्सक चर्चेनंतरच लिहिते करणे हा `भागवतधर्म' होता. हातकणंगलेकरांनी इंग्रजी व मराठी भाषेत समीक्षाग्रंथ लिहिले. त्यातील साहित्यविवेक, साहित्यातील अधोरेखिते, साहित्याचे सोबती, मराठी कथारूप आणि परिसर ही पुस्तके विशेष गाजली.

साहित्य हे एखाद्या कॅलिडोस्कोपप्रमाणे असते. कॅलिडोस्कोपच्या काचेतून जेव्हा रंगीबेरंगी काचेचे तुकडे प्रत्येक वेळी पाहिले जातात, नेमक्या याच नजरेने हातकणंगलेकरांनी मराठी साहित्याकडे बघितले. त्यामुळे त्यांच्या समीक्षेत विशिष्ट वर्गाचा दुरभिमान डोकावत नाही, त्याचप्रमाणे कोणाबद्दल अकारण आकसही जाणवत नाही. २००८ साली सांगली येथे झालेल्या ८१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने केलेल्या भाषणातूनही त्यांनी मराठी साहित्याचा त्यांना भावलेला जो प्रवास मांडला होता, त्यातही याच समीक्षादृष्टीचे निखळ दर्शन होत होते. मराठी साहित्याला गूढवादी व वैश्विक आयाम देणाऱ्या गुरुनाथ आबाजी ऊर्फ जी. ए. कुलकर्णी या अचाट लेखकाशी म.द. हातकणंगलेकरांचे अंतरीचे सूर जुळलेले होते. `"उघडझाप' या आपल्या आत्मचरित्रात हातकणंगलेकरांनी "जी. ए. कुलकर्णी नावाचं' कोड असा एक नितांतसुंदर लेख लिहिला आहे. जीएंच्या डोहकाळिमा, पिंगळावेळ व हिरवे रावे या कथासंग्रहांचे म. द. हातकणंगलेकरांनी संपादन केले आहे. जीएंनी प्रख्यात लेखक असूनही स्वत:चे खासगीपण अतोनात जपले होते. मात्र जीएंनी आपला रसरशीत जीवनानुभव जयवंत दळवी, सुनीताबाई देशपांडे यांच्यासारख्या सुहृदांना लिहिलेल्या पत्रांत समरसून लिहिला होता. जीएंच्या निवडक पत्रांचे तीन खंड संपादित करून प्रसिद्ध करण्यात म.द. हातकणंगलेकरांनी श्री. पु. भागवत यांच्या संगतीने मोलाची कामगिरी बजावली होती. कोणत्याही लेखकाला केवळ त्याच्या साहित्यकृतीपुरते पाहू नये तर त्याच्या आयुष्यपटासह अभ्यासावे, असे हातकणंगलेकरांचे सांगणे असे. लेखक म्हणून वावरताना समाजाशी फटकून वागणे हे त्यांना कधीही भावले नाही. जीएंची स्मृती निरंतर राहावी म्हणून हातकणंगलेकरांनी धारवाड येथे जी. ए. स्मृती सदनाची स्थापना केली. साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य अकादमी, ज्ञानपीठ समिती, कुसुमाग्रज प्रतिष्ठान अशा विविध संस्थांतून सक्रिय राहून साहित्य व समाज यांना जोडण्याचे काम म. द. हातकणंगलेकरांनी केले. त्यांना आपला परिसर व त्यात येणारी माणसे यांच्याविषयी विलक्षण कुतूहल होते. त्यातूनच हातकणंगलेकरांची आठवणीतील माणसे व साहित्याचे सोबती ही पुस्तके आकाराला आली. अनुवाद हा विविध भाषा, प्रांतांतील लोकांचे मनोमिलन घडवतो, असे प्रतिपादन त्यांनी एकदा केले होते. गो. नी. दांडेकरांचे "माचीवरला बुधा' व व्यंकटेश माडगुळकरांचे "सती' ही दोन पुस्तके हातकणंगलेकरांनी इंग्रजीत अनुवादित केली व या पुस्तकांना एक नवे क्षितिज दाखवले. सव्यसाची समीक्षक ही त्यांची ओळख मराठी साहित्यप्रांत कायम अभिमानानेच मिरवेल!