आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Maharashtra Politics And Its Peculiarity By Prashant Dixit, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी स्वाभिमानाला मोदी कुरवाळणार का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेच्या दौ-यानंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौ-यावर निघतील. महाराष्ट्रातील युती तोडण्याचा जुगार मोदींच्या जिवावर भाजपने खेळला असल्याने महाराष्ट्रात प्रचाराची राळ उडवून देणे मोदींना भाग पडेल. त्यांच्या वक्तृत्वावर फिदा असणारा वर्ग इथेही असल्याने त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याची धडपड भाजपचे नेते करणार यात शंका नाही. मेडिसन स्क्वेअरमधील त्यांच्या भाषणातून आजच ते घराघरात पोहोचले आहेत.

तरीही महाराष्ट्रात मोदींनी ब-याच अडचणींना तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे दिसतात. जगावर भुरळ टाकण्याइतके महाराष्ट्रावर भुरळ टाकणे सोपे नाही. बिहार, उत्तर प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रात भाजपविरोधात राजकीय एकजूट झालेली नाही. इथे पंचरंगी लढती होत आहेत. परंतु प्रत्येक पक्षाचा प्रचाराचा झोक पाहिला तर भाजपविरोधात सर्वपक्षीय एकता होत असल्याचे कळून येईल. प्रत्येक पक्षाचा टीकेचा रोख मुख्यत: भाजपकडे आहे. केंद्रात भाजप सत्तास्थानी असल्यामुळे असे होणे साहजिक म्हटले तरी अशा टीकांचा एक सामूहिक परिणाम होत असतो. तो परिणाम दूर करण्यासाठी भाजपला बरीच शक्ती खर्ची घालावी लागेल.

तथापि, मोदी यांच्यासमोरील मोठे आव्हान महाराष्ट्राच्या स्वभावात दडलेले आहे. महाराष्ट्र हे भारतात तसे वैशिष्ट्यपूर्ण राज्य आहे. प्रत्येक राज्याचे स्वत:चे गुणदोष असतात व त्याचा परिणाम राजकीय, आर्थिक, सामाजिक असा सर्व थरांवर होत असतो. महाराष्ट्रातही असे गुणदोष आहेत. पण ते इतरांपेक्षा अधिक टोकदार व लक्षणीय आहेत. यामुळेच अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र वेगळा पडतो. या गुणदोषांमुळेच महाराष्ट्राला देशात मित्रराज्य नाही. महाराष्ट्राच्या न्याय्य मागण्यांसाठीही अन्य राज्ये पाठिंबा देत नाहीत. प्रत्येक लढाई एकट्यानेच लढायची ही परंपरा पार पानिपतापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला आलेली आहे. जुळवून घेणे महाराष्ट्राला कधी जमलेले नाही. भौगोलिक स्थानही असे मिळाले आहे की महाराष्ट्र ना धड उत्तर भारतात आहे ना दक्षिण भारतात. उत्तरेत त्याला आक्रमक म्हणून ओळखतात, तर दक्षिणेत त्याला अहंकारी समजतात.

गेल्या पिढीतील नामवंत साहित्यिक वि. द. घाटे यांनी फार वर्षांपूर्वी "महाराष्ट्राचे मन’ नावाचा अतिशय सुंदर व मर्मभेदी लघुनिबंध लिहिला होता. त्याची आठवण या वेळी होते. या निबंधात घाटे म्हणतात, "अहंकार हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे आणि तो त्याच्या प्रामाणिकपणातून आला आहे. ती त्याची प्रेरकशक्ती आहे. कंगालपणाचाही त्याला अभिमान आहे. तो गोडबोल्या नाही. संभाषणात फटकळ आहे. रांगडा, रोखठोक आहे. दारिद्र्याने तो लाचार होत नाही, नोकरी धरली तरी तो शिव्या खाणार नाही.'

"महाराष्ट्राला पैशाचा लोभ नाही. पैसा मिळाला तर तो खिशात ठेवील, पण मिळवण्यासाठी जिवाचे रान करणार नाही. खरे म्हणजे पैसा कमावण्याची त्याला अक्कल नाही. मराठेशाहीत कसबा वसवताना गुजराला अगत्याने बोलावून दुकान थाटून देत. आजही गावांतून मराठी खोपट्याच्या शेजारी गुजराचा वाडा दृष्टीस पडतो. सावकारी, व्यापारउदीम हा महाराष्ट्राचा धर्म नाही. महाराष्ट्रात स्वत:ची अशी वाण्याची जातही नाही. पुढचे बेत आखायचे, त्यामागे चिकाटीने लागायचे हे हिशेबी गुण महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले नाहीत.'

आज मोदींच्या भाजपवर शिवसेना व मनसेकडून होणारी टीका ऐकताना वि. द. घाटेंचा हा लघुनिबंध पुन्हा-पुन्हा डोळ्यासमोर येतो. महाराष्ट्राच्या या स्वभावाशी मोदींना टक्कर द्यायची आहे. लोकसभेच्या वेळी वस्तुस्थिती वेगळी होती. सत्ता बदलण्याचा उन्माद त्या वेळी होता. महाराष्ट्र हा नेहमीच राष्ट्रीय भावनांची कदर करणारा असल्याने मोदी लाटेला त्याने मनापासून हातभार लावला. त्यामध्ये शिवसेनेचे कर्तृत्व फारच थोडे होते हे आकडेवारीतून सहज दिसण्यासारखे आहे. परंतु विधानसभा ही घरची लढाई आहे व तेथे महाराष्ट्राचे स्वभावगुण कडवेपणे प्रगट होणार आहेत.

महाराष्ट्र अहंकाराशी कधीच तडजोड करीत नाही. त्याचा अहंकार डिवचला गेला की तो भल्याबु-या परिणामांची पर्वा करीत नाही. म्हणूनच शिवसेना व मनसे हे दोन्ही पक्ष उघडपणे महाराष्ट्राच्या अहंकाराला साद घालीत आहेत. काँग्रेसही त्याच मार्गाने चालली आहे, हे नारायण राणेंच्या वक्तव्यावरून दिसते. राष्ट्रवादी तर उघडपणे मराठ्यांचा पक्ष म्हणूनच गेली काही वर्षे काम करीत आहे. सेना, मनसे, राष्ट्रवादी हे तीनही पक्ष महाराष्ट्राच्या स्वभावगुणांशी जुळलेले आहेत. त्यामुळेच त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो. पण महाराष्ट्राने कायम साथ केली आहे ती काँग्रेसची. कारण राष्ट्रीय दृष्टिकोन महाराष्ट्राला भावतो. या दृष्टिकोनाचा व्यावहारिक फायदा मात्र तो उठवू शकत नाही.

मराठी स्वभावात अहंकार इतका का मुरला याचे विवेचन करताना घाटे म्हणतात, "इतिहासाचे ओझे महाराष्ट्राइतके अन्य कोणत्याच प्रांताच्या डोक्यावर बसलेले नाही. परकी सत्तेपुढे अन्य राज्ये लाचार झाली, महाराष्ट्राने ते कधीही केले नाही. यामुळे आजही समकालीन माणसापेक्षा शिवाजी महाराज, संभाजी, बाजी, मुरारबाजी, तानाजी, बाजीराव ही माणसे मराठी माणसाला अधिक वास्तविक वाटतात.'

उद्धव व राज ठाकरेंची भाषणे घाटेंच्या निरीक्षणाला पुष्टी देतात. इतिहासाची जबरदस्त झिंग व त्यातून येणारा अभिमान हे मोदींसमोर मोठे आव्हान ठरेल. मोदींची भाषा वेगळी आहे. व्यवहाराची आहे. व्यावसायिकाला साजेशी आहे. अर्थोत्पादन हेच जीवितध्येय मानणा-या गुजरातमधून ते आले आहेत. पैसा मिळवताना स्वभावाला मुरड घालावी लागते. अशी मुरड घालीतच गुजराती समाजाने भरपूर धनदौलत कमावली व त्या जोरावर आता कारभार हाती घेतला. मराठी मनाला हे कळते. मुंबई महाराष्ट्रात असली तरी मुंबईच्या अर्थकारणात आपला शिरकाव नाही ही खंत त्याला कमालीची छळते. पण यातून काही शिकण्याऐवजी ही खंत त्याच्या अहंकाराला अधिकच खतपाणी घालते. मोदी जेव्हा ग्लोबल मार्केटची भाषा बोलतील, तेव्हा ती मराठी माणसाला पटेल की पुन्हा एकदा तो अहंकाराच्या कोषात जाऊन मतदान करील, हा या निवडणुकीतील महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे.

शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत. इतके सुजाण, सर्वव्यापी व दूरदृष्टीचे व्यक्तिमत्त्व जगाच्या इतिहासातही क्वचितच दृष्टीस पडते. महाराजांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर महाराष्ट्राच्या वर उल्लेखलेल्या गुणदोषांचा त्यांनी परिस्थिती पाहून हुशारीने उपयोग करून घेतलेला दिसेल. यामुळेच अवघ्या पन्नास वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी इतिहासावर ठसा उमटवणारे यश मिळवले. मराठी राज्य श्रीमंत करून सोडले. महाराजांना इतिहासाचा अभिमान होता, पण ओझे नव्हते. वर्तमानाकडे चोखंदळपणे पाहत भविष्य घडवण्याची नजर त्यांच्याकडे होती.

महाराष्ट्रातील आजची तरुण पिढी अशा नजरेची आहे असे कधी-कधी वाटते. मेडिसन स्क्वेअरमधील मोदींचे भाषण त्यांना आवडते. मात्र अहंकाराच्या ओझ्याखाली ती कधी दबेल हेही सांगता येत नाही. जागतिकीकरणाचा लाभ या पिढीला घ्यायचा आहे. त्यासाठी मोदीच हवे असे नाही. पण महाराष्ट्रातील नेत्यांनी निराशा केल्यामुळे ही पिढी मोदींकडे आकर्षित होत आहे. मोदींना तिथे संधी आहे. तथापि, मराठी अहंकार त्यांनी डिवचला तर त्यांचा पराभव नक्की आहे. मराठी अहंकाराला मोदी कसे हाताळणार यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतील.