आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Maneka Gandhi, Divya Marathi, Indian Culture

कसाईखान्यांवर आरोपांचा सुरा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय संस्कृतीच्या तत्त्वांचे रक्षण करण्याच्या नाऱ्याबरोबरच गोरक्षण नावाचे आख्यान संस्कृतिरक्षक नेहमी लावत असतात. आता या संस्कृतिरक्षकांच्या बाजूने शड्डू ठोकून केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी आखाड्यात उतरल्या आहेत. ‘देशामध्ये दूधदुभते देणाऱ्या प्राण्यांची कसाईखान्यांमध्ये कत्तल होते. या व्यवसायातून मिळणारा पैसा दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरला जातो,’ असा खळबळजनक आरोप मनेका गांधी यांनी यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी तयार केलेल्या एका अहवालाचा हवाला देऊन केला.
लव्ह जिहादच्या आरोपानंतर उत्तर प्रदेशच पुन्हा वादाचे केंद्र आहे. हा योगायोग नक्कीच नाही. शविाय, लव्ह जिहादचा सरसकट संबंध जसा दहशतवादाशी लावला गेला होता, तसाच तो कसाईखान्यांच्या संदर्भातही लावला गेला आहे. आपला दावा सिद्ध करणारे आणखी काही सबळ पुरावे मनेका गांधी यांनी दिले असते तर त्यांचे म्हणणे दखलपात्र ठरवता आले असते. आपण ज्याविषयी आरोप केला तो मुद्दा धार्मिक किंवा राजकीय नसून तो आर्थिक स्वरूपाचा आहे, असे मनेका म्हणत आहेत. मात्र कसाईखान्यांचा बहुतांश व्यवसाय एका विशिष्ट समाजाच्या हाती एकवटलेला आहे. या व्यवसायातून कमावलेले पैसे हा समाज दहशतवादी कृत्यांसाठी वापरतो असाही एक अन्वयार्थ मनेका गांधी यांच्या आरोपातून निघू शकतो.

महाराष्ट्र शासनाने राज्यात दरवर्षी १५ हजार गुराढोरांची कत्तल करण्यास परवानगी दिल्याच्या निर्णयावर मनेका गांधींनी कडाडून हल्ला चढवला आहे. प्राण्यांच्या अवैध व्यापाराला प्रखर विरोध करतानाच प्राणिप्रेमींनी दुसऱ्या बाजूस गोशाळांच्याही संपर्कात राहावे, असेही मनेका गांधींनी म्हटले आहे. खरोखरच कसाईखान्यांतून मिळणारे उत्पन्न दहशतवादी कारवायांसाठी वापरले जात असेल तर त्या प्रकरणांतील आरोपींना तत्काळ जेरबंद करायला हवे. अशा कारवाईसाठी केंद्रात भाजपचेच सरकार असल्याने मनेका गांधी यांना कोणी अडवायचा प्रश्नच नाही. पण थेट कारवाईपेक्षा आरोपांचे बुडबुडे काढण्यातच मनेका गांधींना जास्त रस दिसतो आहे. याचाच अर्थ मनेका गांधींमधील कट्टर संस्कृतिरक्षक सध्या वरच्या पट्टीत बोलू लागला आहे!