आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघावर टीकेसाठी नवीन विषय शोधा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा नव्याने वाचकांना परिचय करून देण्याची काही गरज नाही. ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष असल्यामुळे या ना त्या प्रकारे नेहमीच बातम्यांत असतात. विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे पानिपत झाले. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. (तो स्वीकारला जाणार नाही, हे माहीत असल्यामुळे राजीनामा दिला.) महाराष्ट्राच्या पानिपताला पृथ्वीराज चव्हाण जबाबदार आहेत, असेही त्यांनी एक विधान केले. (म्हणजे मी जबाबदार नाही.) काँग्रेसची निष्ठा म्हणजे सोनिया गांधी, राहुल यांच्याशी निष्ठा. या अर्थाने माणिकराव एकनिष्ठ सेवक आहेत. आजच्या आयाराम-गयाराम जमान्यात नेहरू-गांधी घराण्याशी अशी निष्ठा ठेवणे प्रशंसनीय समजले जाते.

नेहरू-गांधी घराण्याची निष्ठा एकदा स्वीकारली की, पदोपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिव्या देण्याच्या व्रताचे त्याच निष्ठेने पालन करावे लागते. माणिकराव ते करतात. म्हणून माणिकरावांचे अभिनंदन. निवडणुकांच्या धामधुमीत १ एप्रिल २०१४ ला नागपूरला ते म्हणाले, ‘भारतीय जनता पार्टी दुसरे-तिसरे काही नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुखवटा आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हेदेखील संघाचा मुखवटा आहेत. ही लोकसभा निवडणूक काँग्रेस विरुद्ध आरएसएस अशी आहे.' औरंगाबादला येथे ३० नोव्हेंबर २०१४ रोजी ते म्हणतात, ‘भाजपचे मुख्यमंत्री कोणाला करायचे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवतो. ज्याने जास्त दिवस संघाची चड्डी घातली त्याचा पहिला नंबर लागतो. यामध्ये एकनाथ खडसे अपयशी ठरले असतील.'

माणिकरावांच्या या वक्तव्यात नावीन्य काहीच नाही. कारण संघाच्या चड्डीचा विषय शरदराव पवार यांनी यापूर्वीच दोन-तीन वेळा काढलेला आहे. त्यांनी काही तरी नवीन बोलायला पाहिजे होते; पण नवीन काही तरी बोलायचे तर संघाची माहिती तरी पाहिजे. चड्डीशिवाय काहीच माहीत नसल्यामुळे बिचारे माणिकराव चड्डीवर बोलले.

माझे वय आता जवळजवळ ७० झाले आहे. त्यातील ६३ वर्षे संघात गेली आहेत. या ६३ वर्षांतील जवळजवळ २५ वर्षे अर्धी चड्डी घालून संघाचे दैनंदिन काम करण्यात गेली आहेत. याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मी शेकडो वेळा अर्धी चड्डी वापरली आहे. संघात मला ब-यापैकी मान्यता आहे, परंतु माझ्या नावाचा मुख्यमंत्री म्हणून संघाने विचार केला नाही. माणिकरावांचा निकष येथे काही लागू पडलेला दिसत नाही. बरे, मी एकटाच अर्धी चड्डी घालतो असे नाही. महाराष्ट्रातील जवळजवळ तीन पिढ्यांची जडणघडण संघशिक्षा वर्गाच्या माध्यमातून ज्यांनी केली त्या ज्येष्ठ स्वयंसेवकाचे नाव होते भाऊराव बेलवलकर. हे नाव घेताच मस्तक नम्र होते आणि भाऊरावांची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. मी बाल असल्यापासून भाऊरावांना पाहिले ते एकाच वेशात, संघाची खाकी विजार आणि शर्ट. याच पोशाखात ते पोस्टातील आपली नोकरी करायला जात. आणीबाणीत त्यांनी आपला हा पोशाख बदलला नाही. १९९५ मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा ते हयात होते. सर्वाधिक दिवस अर्धी चड्डी घालणारे म्हणून मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा कोणीही अजिबात विचार केला नाही. म्हणजे माणिकरावांचा निकष या ठिकाणीदेखील बिनकामाचा ठरला. संघाचे अज्ञान असले की असेच होते. म्हणून माणिकरावांच्या संघज्ञानात भर घालण्यासाठी थोडेसे लिहिले पाहिजे. संघाची अर्धी विजार ही संघस्थानावर कार्यक्रमासाठी घालायची असते. दिवसभर घालून ती मिरवायची नसते. इतर वेळी सर्वसामान्य लोक जसा पोशाख करतात तसाच स्वयंसेवकांचा असला पाहिजे, हा डॉक्टर हेडगेवारांचा आग्रह असे. आपण समाजापासून कोणी वेगळे आहोत, असा भाव आपल्या मनात अजिबात निर्माण होता कामा नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात ज्याच्याकडे शारीरिक विभागाचे काम असते तो सर्वाधिक वेळ अर्ध्या विजारीत असतो. त्यानंतर क्रमांक लागतो तो वेगवेगळ्या शाखांच्या मुख्य शिक्षकांचा आणि कार्यवाहांचा. अशांची महाराष्ट्रातील संख्या ही कैक हजारांत मोजावी लागेल. मुख्यमंत्रिपद हे एकच असते आणि माणिकरावांच्या निकषाप्रमाणे जास्तीत जास्त अर्धी चड्डी घालणा-यांची संख्या काढली तर गोंधळच गोंधळ निर्माण होईल.

मनात प्रश्न असा निर्माण होतो की, माणिकरावांनी संघाला लक्ष्य का केले आहे? त्याचे उत्तर असे आहे की, पंडित नेहरूंपासून संघाला लक्ष्य करून निवडणुका जिंकायच्या ही नेहरू-गांधी घराण्याने आखलेली व्यूहरचना आहे. संघाला लक्ष्य का करायचे? त्याचे उत्तर सोपे आहे, कारण संघाला लक्ष्य केल्याने मुसलमानांच्या मनात भीती निर्माण करता येते, दलितांच्या मनात अविश्वास निर्माण करता येतो आणि मागासवर्गात संघासंबंधी संशयाचे वातावरण निर्माण करता येते. हे करण्यासाठी काँग्रेसने अनेक विचारवंत पाळले, पोसले. अनेकांच्या विदेशवा-या घडवून आणल्या. या सर्वांना आपण ‘पुरोगामी, सेक्युलर, डावे विचारवंत, मानवतावादी, समतावादी’ वगैरे वगैरे नावाने ओळखतो. या सर्व मंडळींनी गेल्या ६६-६७ वर्षांत काँग्रेसला अनुकूल अशा प्रकारे संघाला बदनाम करणारे विषारी लेखन उदंड केलेले आहे. अक्षरश: त्यांनी पाऊस पाडलेला आहे. संघाला झोडणे दुस-या कारणासाठी सोपे होते. कारण संघ राजकीयदृष्ट्या दुर्बळ होता. त्याचा पक्ष घेण्याची हिंमत समाजातील भोंदू, स्वार्थी आणि अत्यंत घाबरट विचारवंत करू शकत नव्हते.
ही व्यूहरचना काँग्रेसच्या दृष्टीने यशस्वी झाली; परंतु ती असत्यावर आधारित असल्याने कधी ना कधी तिचे भांडे फुटणारच होते. काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी पडलेली पिढी वयोमानाप्रमाणे निजधामाला गेली. काहींच्या विचारसरणी परलोकवासी झाल्या. अनेकांच्या पक्ष-संघटना केवळ सांगाड्याच्या रूपाने जिवंत राहिल्या. काही जण संघ शिव्यांची तुपाची धार ओतत ओतत इतके थकले, इतके गलितगात्र झाले की, काहींना तर आत्महत्या कराव्या लागल्या; परंतु संघ चालत राहिला.

माणिकराव, तुमच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचे पद राहावे, असे आम्हाला मनापासून वाटते. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी.' तुम्ही तेथे असल्यामुळे नेहरू-गांधी घराण्याची एकनिष्ठा जपण्यासाठी तुम्हाला संघावर प्रहार करत राहावे लागतील; पण आमची तुम्हाला विनंती अशी की, काही तरी नवीन विषय शोधा. तेच तेच विषय वापरून वापरून आता गुळगुळीत झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून जॉइन आरएसएस या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद समाजातून येत आहे. पूर्वी कधी संघात न गेलेले अभिमानाने अर्धी चड्डी घालून आता शाखेत यायला लागले आहेत. त्यांच्या भावना तुम्ही कशाला दुखावता? त्यांना काँग्रेसकडे कसे आणता येईल, याचा विचार का नाही करीत? संघाविषयी काहीही बोलले तर त्या बोलाचे अमृत होते, संजीवनी होते आणि संघ अधिक वाढायला लागतो. हे तुमच्या लक्षात येत नाही का?

नरेंद्र मोदी मुस्लिमविरोधी आहेत, असा प्रचार करून तुम्ही त्यांना हिंदू रक्षक केले. लोकांना ते आवडले आणि जनतेने त्यांना चक्क पंतप्रधान बनवून टाकले. हे तुमच्या कसे लक्षात येत नाही की, इथे मुस्लिम तुष्टीकरण कोणाला हवे आहे? तुमचे संघ दलितविरोधी कार्डसुद्धा आता चालत नाही हो! आता अनेक मान्यवर दलित नेते भाजपत येतात. आम्हाला भाजपत घ्या, असा त्यांचा आग्रह असतो. म्हणून माणिकराव, तुमच्या राजकीय भवितव्यासाठी तुमचा एक मित्र म्हणून तुम्हाला सांगणे आहे की, गांधी परिवाराशी एकनिष्ठता ठेवण्यासाठी व त्यांची संघविरोधी विषयसूची समर्थपणे पुढे नेण्यासाठी काही तरी नवीन विषय शोधा; परंतु एक अडचण आहे, संघातील विषय शोधण्यासाठी संघात जावे लागेल. पुस्तके वाचून किंवा काठावर बसून संघ समजत नाही. पाण्यात पडल्याशिवाय जसे पोहता येत नाही तसे संघाचे आहे. कच बनून संघविद्या शिकण्यासाठी येणार की शकुनी बनून दुर्योधनाची पूजा करणार? निर्णय तुम्हालाच करायचा आहे.