जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहण्यास जे नेते कारणीभूत आहेत, त्यात आधी अर्थमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग यांचा वाटा मोठा आहे. जागतिकीकरणाच्या गेल्या अडीच दशकात सारा देश बदलून गेला. या बदलाच्या मुळाशी असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या काळात नेमके कसे घडत होते, सरकारवर दबाव कसे येत होते, या काळातही दीर्घकाळ सत्तेवर असलेला काँग्रेस पक्ष आणि सरकारचे संबंध कसे होते, या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचे मूळ काय आहे आणि त्याला रोखण्यास पंतप्रधान कमी का पडले, असे अनेक प्रश्न भारतीयांच्या मनात घर करून बसले आहेत.
काँग्रेसचे माजी नेते के. नटवरसिंग यांच्या ‘वन लाइफ इज नॉट इनफ’ या पुस्तकाने त्यातील काही गोष्टी उघड केल्या आहेत. माजी पंतप्रधानांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू आणि माजी ऑडिटर जनरल विनोद राय यांच्याही पुस्तकांनी डॉ. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीविषयी अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत. विशेषत: पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहनसिंग कसे कमकुवत होते आणि गांधी घराण्याने त्यांना कसे स्वातंत्र्य दिले नाही, यावर या पुस्तकांत भर देण्यात आला आहे. पण या सर्व वादाविषयी डॉ. मनमोहनसिंग यांचे काय म्हणणे आहे, हे मात्र त्यांच्या मनातच राहिले आहे.
इतिहासाला
आपल्या कारकीर्दीची नोंद घ्यावी लागेल, असे म्हणून तो मुद्दा त्यांनी बाजूला सारला आहे. मात्र आता त्यांनाच हे सर्व सांगण्याची इच्छा झाली असून त्यांचेही पुस्तक लवकरच वाचायला मिळणार आहे. हे पुस्तक त्यांनी २००८ मध्येच लिहायला घेतले होते, मात्र आता ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. डॉ. मनमोहनसिंग तब्बल १० वर्षे अतिशय महत्त्वाच्या कालखंडात पंतप्रधान होते. या काळात त्यांचे आणि
सोनिया गांधींचे संबंध कसे होते, त्यांचा राहुल गांधींनी अपमान केल्यानंतर ते शांत का बसले, टू जी आणि कोळसा गैरव्यवहारात पंतप्रधान म्हणून त्यांनी नेमकी कोणती भूमिका बजावली, हे सर्व त्यांच्याच लेखणीतून जगासमोर येणार आहे. एक शांतपणे काम करणारा नेता म्हणून डॉ. मनमोहनसिंगांना देश ओळखतो, मात्र त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे या पुस्तकामुळे जगासमोर येणार आहे.