आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गायकीपलीकडचे मन्ना डे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘भयभंजना वंदना सुन हमारी’ हे गाणं ऐकताना माझ्या दृश्यपटलावर कधी भारतभूषणचा चेहरा उमटतच नाही. तिथे दिसू लागते ती डोळे मिटून अंतरात्म्यात वसणार्‍या भयभंजना देवीमातेची विलक्षण आर्त आळवणी करणारी मन्ना डेंची मुद्रा. माणसाचा स्वभाव त्याच्या डोळ्यात दिसतो म्हणतात. तसा माणसाचा आत्मा त्याच्या सुरात प्रतिबिंबित होतो का? मन्ना डे आणि रफीला गाताना ऐकलं-पाहिलं की तसं वाटल्याशिवाय राहत नाही.

मन्ना डेंनी वयाच्या 86व्या वर्षी लिहिलेल्या आत्मचरित्रात आत्म्यातून स्फुरणार्‍या गाण्याचे उल्लेख नकळत आले आहेत. गाणं हा त्यांचा आत्मा, तर लहानपणापासूनचे अनेक छंद, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंगच झालेले. त्यातून एका वेगळ्या तरीही त्या आत्मतत्त्वाशी सुसंगतच अशा मन्ना डेंचे दर्शन घडत राहते. आत्मचरित्रातून ते ज्या प्रकारे उलगडले गेले आहेत, त्यातून सतत जाणवत राहते ते मन्नादांचे लहान मुलासारखे निरागस तरीही प्रगल्भ माणूसपणाने युक्त असे संवेदनशील व्यक्तिमत्त्व.

कोलकात्यातल्या संयुक्त कुटुंबातला पूर्णचंद्र डेंचा हा मुलगा, हेमचंद्र आणि कृष्णचंद्र ऊर्फ के. सी. डेंचा हा पुतण्या मित्रांची गँग जमवून व्रात्यपणा करण्यात पटाईत. शरीरयष्टीने दांडगा. मासे पकडायचा गळ टाकून हलवायाच्या दुकानातली मिठाई चोरणे, बांबू वापरून शेजारच्या गच्चीत उन्हं द्यायला ठेवलेले लोणचे चोरणे अशा कृष्णलीला चालायच्या. तसाच पतंगाचा शौक. पतंगबाजीतले विविध पैलू उलगडताना त्यांचे मन अक्षरश: पतंगाच्या रंगात रंगून गेलेय. काटला गेलेला कुणाचा तरी पतंग आणि मांजा मिळवण्यासाठी शेजारच्या गच्चीवर घेतलेली जीवघेणी उडी, त्यापायी हेमचंद्र काकांचा खाल्लेला मार, मांजात कायम अडकलेला जीव हे सगळे इथे सांगायचे प्रयोजन म्हणजे, हा छंद मोठेपणीही त्यांना सोडून गेला नव्हता. एवढेच नव्हे, तर त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून, माणूस जात्याच ‘मोठा’ असला की एकाच वेळी प्रतिस्पर्धी आणि मित्र असणे हे लहानपणातले घटित मोठेपणातदेखील कसे उतरते त्याचा प्रत्यय येतो. मुंबईतल्या मन्ना डेंच्या ‘आनंदन’ या बंगल्यासमोर एक पार्क आणि पार्कच्या पलीकडेच रफीचे घर. अनेकदा इतर शेजार्‍यापाजार्‍यांना हे दिग्गज पार्श्वगायक आपापल्याला गच्चीवरून पतंगाची काटाकाटी खेळताना दिसायचे. सरळ साध्या रफीला पतंग आकाशात उंच न्यायची हौस. मन्ना डेंचा व्रात्यपणा त्यांच्या लक्षात येत नसे.
मन्ना डे कमी उंचीवर पतंग उडवत आणि मग एकदम उंचावर नेऊन रफीच्या पतंगाला घेरून तो काटत. ‘मन्नादा, इतका उंच कसा काय नेता पतंग? काही तरी रहस्य आहे यामागे. सांगा तरी.’- रफी म्हणायचे. ‘काय माहीत? पण पतंग उडवण्यात तुम्ही माझी बरोबरी कशी करू शकाल? कोलकात्याच्या सिमला स्ट्रीटवर ट्रेनिंग घेतलेय मी.’- मन्ना डे म्हणत. हेमचंद्र काकांना आपली पतंगबाजी आवडत नसली तरी पतंग उडवणे हा आपला केवळ रिकामपणाचा शौक राहिला नव्हता, तर तोही आपला एक ध्यासच होता, असे ते सांगायचे. मांजा तयार करण्याची, थेट लखनऊ, अहमदाबादहून मांजा आणण्याची धडपड, पतंगासाठी ऑस्ट्रेलियन कागद कसा उत्कृष्ट असे ते आवर्जून सांगणे या सार्‍यातून तो ध्यास जाणवतो. रफी ‘रहस्य सांगा’ म्हणून फारच मागे लागल्यावर मन्ना डेंचे उत्तर - ‘यशाचा कोणताच शॉर्टकट नसतो!’ हे उत्तर म्हणजे या दोघांच्याही करिअरमधल्या निखळ यशाचा दोघांनाही माहीत आणि मान्य असलेला मंत्रच.

खेळांची आवड मन्ना डेंनी प्रथितयश पार्श्वगायक झाल्यानंतरही जपली. रॉबिन चॅटर्जी हे साउंड रेकॉर्डिस्ट मित्र. मन्ना डे, रॉबिन चॅटर्जी आणि कंपनीचे क्रिकेट आणि फुटबॉलचे सामने मुंबईतही रंगायचे. लहानपणचा खिडक्यांच्या काचा फोडण्याचा परिपाठ मोठेपणीही चालू राहिल्याचे ते कबूल करतात. फरक एवढाच की, मोठेपणी काच फोडल्यावर ते नुकसानभरपाई देऊ लागले. कधी कधी क्रिकेट मॅचपायी रेकरॉडिंगला जायलाच विसरायचे, मग संबंधित संगीत दिग्दर्शक धापा टाकत बोलवायला यायचा. शतक होत आले असताना खेळ टाकून रेकरॉडिंगला जायला जिवावर यायचे. मन्ना डेंकडून ‘उपर गगन विशाल’ हे त्यांचे पहिले चित्रपटगीत गाऊन घेतले ते एस. डी. बर्मन यांनीच. ईस्ट बेंगॉल विरुद्ध मोहन बागान फुटबॉल सामन्यांच्या वेळी मात्र हा ज्येष्ठ संगीतकार वेगळाच होऊन जायचा, त्याचे मनोज्ञ वर्णन करणार्‍या मन्नादांचे क्रीडाप्रेमही तितक्याच प्रकर्षाने त्यातून डोकावत राहते.

आपले लहानपण हे बहुतेक खेळांनीच व्यापलेले होते आणि संगीत हा केवळ कुतूहलाचा विषय होता. कारण आपण सतत अस्वस्थ असायचो आणि संगीताला एकाग्रतेची गरज असे, असा कबुलीजबाब देतानाही नकळत या ध्यासवृत्तीनेच पुढे संगीतात कशी साथ दिली, तेही ते उलगडून जातात. संगीत त्यांना जन्मदत्त वारश्यानेच लाभले होते. गायक-संगीतकार के. सी. डे ऊर्फ मन्नादांचे बाबूकाका हे दृष्टिहीन. त्यांनी केलेल्या चालींचे नोटेशन लिहिण्याचे काम किशोरवयापासूनच मन्नादांना करावे लागायचे. काकांकडे शास्त्रीय गाण्याचे उस्ताद येत, तसेच लोकगीते गाणारे फिरस्ते यायचे. एखाद्या खाँसाहेबांनी गाऊन दाखवलेली चीज सहजपणे तशीच मन्नाच्या गळ्यातून निघायची. ‘हे कोण बरे गात होते’- ही चकित विचारणा उस्ताद करताहेत, तोवर लहानगा मन्ना खेळायला-उंडारायला सटकलेला असायचा.

त्यामुळे स्कॉटिश चर्च कॉलेजला कुस्तीतली चॅम्पियनशिप मिळवून देणारा मन्ना ‘ऑल इंडिया रेसलिंग कॉम्पिटिशन’मध्ये उतरता उतरता जेव्हा संगीताकडे वळला, तेव्हा ते आपसूकच त्याच्या गळ्यात जागे झाले. कुस्ती करताना पहिलवान ज्या ‘लयी’त आपले डावपेच टाकत असतो, ते पाहूनच आपण कुस्तीकडे आकर्षिले गेलो, असे मन्ना डे सांगतात तेव्हाही ‘लयी’चे आणि त्यांचे ते उपजत नाते डोकावतेच. के. सी. डेंकडे नेहमी येणारे त्यांचे मित्र ज्योतिचरण गुहा ऊर्फ गोबोरबाबू हे कुस्तीतले उस्ताद. के. सी. डेंच्या पंधरा वर्षांच्या पुतण्याचे शरीरसौष्ठव पाहून ते त्याला आपल्या मुलांबरोबरच कुस्तीचे धडे देऊ लागले. त्यांचा मुलगा हा मन्नांच्या गँगमधलाच. त्यामुळे धमाल. पुढे कॉलेजला चँपियनशिप मिळवून दिली.

कुस्तीने आपली शारीरिक क्षमताच केवळ वाढवली नाही, तर कलेतले बारकावे शिकवले, असे या क्रीडानुभवाचे विश्लेषण ते करतात. खेळ हे आम्हाला कधी दोन खेळाडूंमधले द्वंद्वयुद्ध वाटले नाही, तर ती आम्हाला एक जीवनपद्धती वाटली. ज्या जीवनपद्धतीचे स्वत:चे काही नियम असतात, ज्या नियमांमध्ये प्रतिस्पर्ध्याला कोणत्याही प्रकारे घायाळ करायचे नसते, अशी जीवनपद्धती, असे ते म्हणतात. मेहनतीने उपजत गुणांचे चीज करणारा, उमद्या स्वभावाचा गायक कसा निर्माण झाला त्या कथेतल्या रहस्याची ही काहीशी उकल केवळ!