आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी राजकारणाचे संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत मंगळवारी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाने सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या वर्चस्वाला धक्का देणे व अमेरिकी काँग्रेसमध्ये रिपब्लिकनांच्या जागा वाढणे यात अनपेक्षित असे काही नाही. कारण या निवडणुका बहुतांशी रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यातल्याच प्रांतात झाल्या होत्या. पण प्रश्न हा होता की, डेमोक्रॅटिक पक्ष काही चमत्कार घडवेल का याचा. तसे झाले नाही. कारण ओबामा यांच्या हाती अध्यक्षपदाची दुस-यांदा सूत्रे हाती देताना सामान्य अमेरिकी जनतेच्या प्रचंड अपेक्षा, आकांक्षा होत्या. त्यावेळी अमेरिकेपुढे देशांतर्गत आरोग्य सेवा सुधारण्याचे, बेरोजगारी, परकीय गुंतवणुकीच्या प्रश्नांबरोबर अफगाणिस्तान, इराक, सिरिया हे प्रश्न आ-वासून उभे होते. त्यामुळे ओबामाविरोधात राजकीय वातावरण तयार होत गेले.
दीड वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षाने ओबामा सरकारची अडवणूक करत देशाची सर्व प्रशासकीय व्यवस्था "शटडाऊन' करण्याची वेळ आणली होती, हा एक इशारा होता. याच दीडएक वर्षात रशियाचा आंतरराष्ट्रीय राजकारणात दबदबा निर्माण झाला. सिरियातील गृहयुद्ध व युक्रेनमधील यादवीत रशियाने थेट हस्तक्षेप केल्याने व नाटोवर दादागिरी दाखवल्याने त्याची तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेत उमटण्यास सुरुवात केली. पुढे आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने सुरू केलेला नरसंहार रोखण्यात अमेरिकेला अपयश आले. त्यात इराकमध्ये लोकशाही स्थापन करण्याचे ओबामा यांचे मनसुबे आयएसआयएसने उधळून लावल्याने अमेरिकेतील जनमत ओबामांच्याविरोधात जाऊ लागले. मुस्लिम व अरब जगतामध्ये शांतता प्रस्थापित करण्याची ओबामा यांची व्यूहरचनाही पुढे निष्प्रभ ठरत गेली. या सर्व घटनांचा फायदा घेत अमेरिकेचे जगाच्या राजकारणावरचे वर्चस्व कमी होत चालल्याची टीका रिपब्लिकन पक्षाने सुरू केली व या टीकेचे परिणाम या निवडणुकीतून दिसून आले आहेत. ओबामा यांच्या लोकप्रियतेला धक्का बसण्यामागे डेमोक्रॅट्स पक्षामधील अंतर्गत राजकारणही कारणीभूत आहे. ओबामा यांच्यावर सर्व बाजूंनी प्रहार होत असताना माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन ज्या पक्षाच्या आगामी अध्यक्षीय निवडणुकीत संभाव्य उमेदवार समजल्या जात आहेत त्यांनीही या सर्व काळात मौन बाळगले होते. म्हणून आताच्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल २०१६ मध्ये होणा-या अध्यक्षीय निवडणुकांच्या डेमोक्रॅट्स पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. पुढची दोन वर्षे अमेरिकेचे राजकारण वादळी ठरणार यात शंका नाही.