आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘म्हैस’ उडाली आकाशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाहतूक व दळणवळणाच्या मर्यादित सुविधा असतानाच्या काळात पुलंनी ‘म्हैस’ ही अत्यंत गाजलेली कथा लिहिली होती. खड्ड्याखड्ड्यांतून प्रवास करणा-या कोकणातल्या एसटीच्या मार्गात आडव्या आलेल्या नि ठाण मांडून बसलेल्या म्हशीमुळे प्रवाशांची कशी गैरसोय होते याचे रंजक नि गमतीशीर वर्णन पुलंनी केले होते. या वर्णनातून त्यांनी त्या काळच्या प्रवासातल्या अडचणी हलकेच टोला लगावत सांगितल्या होत्या. आता दळणवळण व वाहतूक व्यवस्था प्रगत झाली, असा आपला दावा असताना मोकाट जनावरांना पायबंद घालण्याचे प्रयत्न नेहमीच वाया गेलेले दिसतात.

सुरत विमानतळावर घडलेली घटना जेवढी गमतीशीर आहे, तेवढीच ती सुरक्षेच्या दृष्टीने गंभीरही म्हटली पाहिजे. गुरुवारी स्पाइसजेट कंपनीचे दिल्लीला जाणारे विमान टेक ऑफ करत असताना त्याच्या मार्गात एक म्हैस आली व पुढे काही तास गोंधळ उडाला. या विमानाची धडक साहजिकच जोरदार असल्याने म्हैस गतप्राण झाली; पण बोइंग जातीच्या असलेल्या या विमानाची मोठी हानी झाली. या घटनेमुळे विमानतळांवरच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेला येणे साहजिकच आहे. कारण विमानतळावर प्रवाशांची कसून झडती घेतली जाते; पण प्रत्यक्षात जनावरे रनवेवर जाऊन तेथे ठाण मांडून कशी बसतात याचे कोडे कुणालाच सोडवावे असे वाटत नाही. आपल्याकडे विमानतळाच्या रनवेवर कुत्री फिरत असल्याच्या घटना किंवा विमानांना पक्ष्यांच्याही धडका बसल्याची अनेक उदाहरणे आहेत. कोंबड्या, शेळ्या-मेंढ्या मोटारींवर बसण्याच्या घटना चित्रपटात नव्हे, तर प्रत्यक्षातही दिसतात.

अशा घटनांमध्ये काही अपवादात्मक घटना वगळता साहजिकच प्राण्यांवर जीव गमावण्याची वेळ येते. प्राण्यांच्या जिवाचे मोल आपल्याकडे फारसे गांभीर्याने घेतले जात नाही. काही वर्षांपूर्वी मनेका गांधींचे प्राणिप्रेम चेष्टेचा विषय झाले होते. आता मात्र विमानाच्या धडकेने म्हैस गतप्राण झाली याबद्दल त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा गोवंशाचा मुद्दा निवडणुकीत सातत्याने मांडणा-या संघानेही त्यावर मौन बाळगले आहे. खरे तर या संघटनांनी विमान कंपनीवर किंवा विमानतळ प्राधिकरणावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करून एकाच वेळी सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढत संस्कृती रक्षणाच्या कर्तव्याला जागल्याचे समाधान मिळवले पाहिजे.