आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Modi And His America Visit By Uday Dandavate, Divya Marathi

अमेरिकेतील मोदी उत्सव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रसिद्धी माध्यमांचा आणि सोशल नेटवर्कचा फायदा घेऊन वातावरण कसे तापवायचे, आपल्या समर्थकांमध्ये उत्साह कसा निर्माण करायचा आणि त्या उत्साहाचे उत्सवामध्ये परिवर्तन कसे करायचे याचे तंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके जाणले आहे. याची प्रचिती त्यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका भेटीतून जाणवली. योगायोग असा की, नरेंद्र मोदी आणि बॉलीवू़ड अभिनेता शाहरुख खान हे दोघेही एकाच वेळी अमेरिकेत होते. दोघांच्या चाहत्यांनी भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले होते. किंबहुना मनोरंजनातून स्वप्नरंजन उत्तेजित करण्याच्या खास बॉलीवूड तंत्राचा पुरेपूर अनुभव अमेरिकेतील भारतीयांना नरेंद्र मोदी आणि शाहरुख खान यांच्या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला.

जुन्या काळातल्या भारतीय सिनेमात गांभीर्य, संयम, डौलदारपणा आणि वास्तवाशी निगडित कथानक असायचे. त्याउलट आजच्या सिनेमाचा भर उत्तेजक, उथळ, आणि वास्तवापासून दूर स्वप्नरंजनावर अधिक असतो. असाच काही बदल भारतीय राजकारणात घडून येत आहे. हे गेल्या काही वर्षांत दिसून येत आहे. याची जाणीव नरेंद्र मोदींच्या अमेरिकेतील कार्यक्रमातून झाली. या कायापालटाला फक्त तेच जबाबदार नाहीत. एके काळी "ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी’ किंवा "माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ अशा गाण्यांवर प्रभावित होणारी जनता आज लेसर शो, दिव्यांचा झगमगाट, होलोग्राफिक प्रतिमा, रंगीबेरंगी पोशाखातील नृत्यांगनांचे समूह नृत्य, अशा गोष्टींमुळे प्रभावित होते. अशा वातावरणात साधी राहणी पत्करणारे, समाजसेवेला जीवन समर्पित करणारे, समाजातील असमानतेविरुद्ध लढा देणारे समाजसेवक दुर्लक्षित राहत असल्याचे दारुण सत्य आपल्याला दिसून येते.
भारतीय समाजातील असमानता, अंधश्रद्धा, आणि सामाजिक विषमता लक्षात न घेता, त्याविरुद्ध लढा उभा करण्यापेक्षा भविष्याचे स्वप्नरंजनच लोकांना अधिक हवे आहे, असे आज दिसते. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींचे अमेरिकेतील कार्यक्रम म्हणजे देशभक्तीची उत्कट भावना मनोरंजनाद्वारे अनुभवण्याची एक मेजवानी ठरली, असेच म्हणावे लागेल. ठोस कार्यक्रमापेक्षा स्वप्नरंजनावर त्यामध्ये अधिक भर दिला गेला, असेही म्हणावे लागेल.
या भेटीतून काय साधले हाच खरा प्रश्न आहे. नरेंद्र मोदींच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर डागाळलेल्या सार्वजनिक प्रतिमेचे नूतनीकरण करणे हा एक महत्त्वाचा उद्देश या भेटीमागे होता हे नक्कीच. दहा-बारा वर्षे २००२ च्या गुजरातमधील दंग्याचे कारण देत मोदींना व्हिसा नाकारणा-या अमेरिका सरकारने भारतीय पंतप्रधानांना या भेटीत सन्मानाने वागवले. न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमधील जाहीर सभांतून अमेरिकी सरकारच्या नाकावर टिच्चून मोदी समर्थकांनी या विजयाबद्दल उत्सव साजरा केला. या उत्सवात उन्माद होता, बेभान व्यक्तिपूजा होती आणि देशभक्तीच्या घंटानादामागे दडलेली हिंदुराष्ट्रभक्ती होती.

अमेरिकेत मोदींच्या भेटीचे काय प्रतिसाद उमटले हे देखील समजून घेतले पाहिजे. बहुवर्णीय न्यूयॉर्कमध्ये वेगवेगळ्या देशाचे लोक आपापल्या संस्कृतीचे प्रदर्शन नेहमीच करतात. त्याची लोकांना सवय असते. त्यामुळे मोदी महोत्सवाबद्दल रस्त्यावर घुटमळणा-या लोकांमध्ये कुतूहल होते, परंतु हा महोत्सव अमेरिकन लोकांपर्यंत काही ठोस कार्यक्रम पोहोचवू शकला, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. जरी राजकीय स्तरावर सेनेटर आणि राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पंतप्रधानांना सन्मानाने वागवले असले तरी अमेरिकी प्रसार माध्यमांनी या भेटीची फारशी दखल घेतली नाही हेच खरे. जॉन ओलिवर या विनोदी कार्यक्रमाच्या यजमानाने तर मोदींच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील कार्यक्रमाची आणि सेंट्रल पार्कमधील भाषणाची टिंगल टवाळीच केली. काही मोदी समर्थकांनी वृत्तपत्रांचा मोदींबद्दलचा निरुत्साह, आणि काही माध्यमांनी केलेली टिंगल टवाळी यामागे वर्णद्वेष होता, असा आरोपही केला. सत्य काही असो, परंतु प्रवासी भारतीयांचा भरभरून ओसंडलेला उत्साह आणि स्थानिक लोकांमधले सौम्य कुतूहल यातला फरक नक्कीच दिसून आला. पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याबरोबर मोदी समर्थकांची झालेली बाचाबाची आणि ठिकठिकाणी मोदींविरोधी झालेली निदर्शने यांचा मोदी समर्थकांच्या उत्साहावर फारसा परिणाम झाला नाही हे खरे.
अमेरिकन राजकारणात उद्योगपतींचे हितसंबंध जपण्यावर खूप भर असतो. त्यादृष्टीने भारताचा बाजार म्हणून जास्तीत जास्त उपयोग कसा करून घेता येईल, पेटंट कायद्याला मान्यता देऊन अमेरिकन उद्योगांचा अधिकाधिक फायदा कसा करून घेता येईल, शस्त्रास्त्र उत्पादन कंपन्यांसाठी भारतातून मागणी कशी वाढवता येईल आणि दहशतवादाविरुद्ध अमेरिकेने सुरू केलेल्या युद्धात, भारताचे भौगोलिक महत्त्व जाणून घेऊन कशाप्रकारे समर्थन प्राप्त होईल, या विषयांवर अमेरिकन सरकारची अधिक रुची होती, असे जाणवते. मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये जमा झालेल्या जनसमूहाकडे पाहिल्यावर मला वर्षानुवर्षे मुंबईत नानी पालखीवाला यांच्या अर्थसंकल्पानंतर दरवर्षी होणा-या भाषणाला जमा होणा-या श्रोत्यांची आठवण झाली. अर्थसंकल्पाचा आपल्या गुंतवणुकीवर परिणाम काय होईल या कुतूहलाने जमा होणा-या लोकांसारखेच अमेरिकेतील प्रगतिशील भारतीय मोदींच्या धोरणांचा त्यांच्या गुंतवणुकीच्या भवितव्याला आणि भारतातील सुविधांना "अच्छे दिन आने वाले हैं’ या आशेने जमा झाले होते हे स्पष्ट दिसत होते. India Inc. च्या भागधारकांचे जणूकाही सहमिलन न्यूयॉर्कमध्ये आयोजिले होते.
उज्ज्वल भवितव्याच्या मार्गात अडथळे आणणा-या कुणालाही मोदी उत्सवात आमंत्रण नव्हते. अंबानी आणि अडाणी हे मोदींचे डावे आणि उजवे हात म्हणून या भेटीत वावरले हे खास करून जाणवले. मोदींच्या उत्सवात सामील झालेले बहुतांश भारतीय, दहा वर्षांपूर्वी डॉ. मनमोहनसिंग यांच्या उदारमतवादी धोरणाचा उदोउदो करत होते, हेदेखील जाणून घेतले पाहिजे.

एकंदरीत, या भेटीचा अन्वयार्थ काढायचा झाल्यास ही भेट म्हणजे मोदींचा सन्मान, मोदी समर्थकांचा उत्सव आणि अमेरिकन राजकारणी आणि उद्योजकांबरोबर हस्तांदोलन एवढाच निघू शकतो. सिनेसृष्टीत ज्याप्रमाणे एखाद्या नायकाची काही काळ चलती असते त्याप्रमाणेच शाहरुख खान आणि नरेंद्र मोदी यांची प्रवासी भारतीयांमध्ये सध्या चलती आहे हे स्पष्ट झाले. न्यूयॉर्कच्या वास्तव्यात सुषमा स्वराज यांच्या मुत्सद्देगिरीपेक्षा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित ढोवल यांच्या हेरगिरीचे पारडे जास्त भारी मानले गेले हेदेखील स्पष्ट झाले. सुषमा स्वराज भारतात परत आल्या आणि ढोवल काही दिवस चर्चा करण्यास मागे राहिले यातून पंतप्रधानांच्या राजकारणाचा रोख कळू शकला. स्वकेंद्रित राजकारणात भ्रष्टाचारी आणि अत्याचारी व्यवस्थेला खतपाणी मिळते हे नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या कारकीर्दीतून समजून घ्यावे. अमर्याद सत्ता आणि नेत्यांवर भाबडी श्रद्धा लोकशाहीच्या अधोगतीचे कारण ठरू शकते.

नरेंद्र मोदींना लोकसभा निवडणुकीत जनादेश मिळाला आहे. पुढील पाच वर्षे उत्सव साजरे करण्यात घालवली तर जनता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. न्यूयॉर्कमधील उत्सव आत्मविश्वास वाढवण्यास उपयोगी ठरला असला तरी बहुरंगी आणि बहुढंगी भारतात राज्य करायचे असेल तर ठोस कार्यक्रम आणि दबलेल्या जनतेच्या जीवनात मूलभूत फरक घडवून आणावा लागेल. गांधीनगरहून चाबूक चालवणे आणि दिल्लीहून देशाचे राजकारण चालवणे यातला फरक जाणून घेणे आवश्यक आहे. धनिकांच्या दाढीला हात लावण्यापेक्षा सामान्य माणसाचे हित पाहायला हवे. उद्धटपणाला लगाम घालून जनसेवेला महत्त्व दिले पाहिजे. धर्माधिष्ठित राजकारण करण्यापेक्षा सर्वधर्मसमभाव रुजवावा लागेल. एकचालकानुवर्तित्व दामटण्यापेक्षा सामायिक राजकारण करावे लागेल. गांधीजींना फक्त श्रद्धांजली अर्पण करण्यापेक्षा त्यांनी सुचवलेला सर्वधर्मसमभावाचा मार्ग पत्करला तर भारतवर्ष आधुनिक काळाकडे नव्या जोमाने आणि एकमताने सरसावू शकेल.

(लेखक अमेरिकेत राहत असून "सहनिर्माणातून नवरचना’ या विषयात संशोधन करतात. )
uday@sonicrim.com