आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मन की बात'चे ढोलताशे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये यूपीएचा पराभव होऊन भाजपने केंद्रात सरकार स्थापन केले. या निवडणुकीत भाजपने नरेंद्र मोदी यांच्याभोवतीच सारा प्रचार केंद्रित केला होता. निवडणुकीपर्यंत ठीक होते, पण पंतप्रधान झाल्यानंतरही नरेंद्र मोदी यांचा स्वकेंद्रित प्रचार मोठ्या जोमाने अजूनही सुरू आहे. कोणत्याही देशाच्या दौ-यावर गेले की मोदी तेथील अनिवासी भारतीयांची जाहीर सभा घेऊन त्यात भाषण करतात. भारतातील सरकारी व खासगी दूरचित्रवाहिन्या मोदींच्या भाषणात बातमीमूल्य जोखून या भाषणांचे थेट प्रसारण करीत असतात. पहिल्यांदा या भाषणांचे झालेले कौतुक आता ओसरू लागले आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून नरेंद्र मोदी हे ऑल इंडिया रेडिओच्या माध्यमातून महिन्यातून एका रविवारी सकाळी ‘मन की बात' या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधतात. हा कार्यक्रमही खूप लोकप्रिय झाल्याचे सरकारी गोटातून सांगण्यात येत असले तरी हा वरवरचा प्रचार आहे. एखादी गोष्ट खूप लोकप्रिय झाली असेल तर ती आणखी वाढावी म्हणून फार परिश्रम घ्यावे लागत नाहीत. मात्र ‘मन की बात' हा कार्यक्रम अधिकाधिक लोकप्रिय व्हावा यासाठी त्याचे प्रक्षेपण दूरदर्शन, खासगी रेडिओ तसेच खासगी दूरचित्रवाहिन्यांवरूनही व्हावेत अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा आहे. त्या दिशेने केंद्रीय माहिती व प्रसारण खाते, प्रसारभारती यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश पंतप्रधान कार्यालयाने दिले आहेत. ‘आपल्याच भाषणांचे प्रसारण सर्वांनी करावे यासाठी स्वत:च्या कार्यालयामार्फत पंतप्रधानच जर प्रयत्न करत असतील तर ते चित्र फारसे शोभादायक नाही. प्रसारभारती व केंद्र सरकारने परस्परांपासून योग्य अंतर राखले तरच प्रसारभारतीची स्वायत्तता अबाधित राहू शकेल. तशी तरतूद प्रसारभारती कायद्यातही आहे. त्याचा आदर नरेंद्र मोदी सरकारने करायला हवा. गेल्या सहा महिन्यांत मोदी सरकार कारभाराच्या आघाडीवर फारशी प्रभावी कामगिरी करू दाखवू शकलेले नाहीत. उलट भाजपमधील नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेच हे सरकार गाजते आहे. समाजातील दोषांवर बोलणारे पंतप्रधान मोदी ‘मन की बात' कार्यक्रमात स्वत:च्या सहका-यांच्या वादग्रस्त कृत्यांबद्दल त्यांना जाहीरपणे कानपिचक्या देताना दिसले नाहीत. त्यामुळे ‘मन की बात'मध्ये अधिक पारदर्शीपणा येणे आवश्यक बनले आहे.