आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Mohsin Shaikh Murder And Its Causes By Aruna Burte, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहसीन म्हणजे ऋजू, परोपकारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यम परिस्थितीतील कुटुंबात वडिलांच्या व्यवसायात मदत करत सोलापुरात पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यावर अनेक तरुण करिअर करण्यासाठी पुणे गाठतात. त्यापैकी एक होता मोहसीन शेख. 2006 पासून पुण्यात मिळेल ती नोकरी करत स्वकष्टाने त्याने संगणक क्षेत्रात विविध अभ्यासक्रम पूर्ण करून प्रावीण्य मिळवले. एका चांगल्या कंपनीत संगणक तंत्रज्ञ म्हणून नोकरी लागल्याने 28 वर्षे वयाचा मोहसीन विवाहाची स्वप्ने पाहत होता. 2 जूनच्या रात्री नमाजानंतर वाटेवरील खानावळीतून रात्रीसाठी जेवण घेऊन रूममेटबरोबर हडपसरमधील खोलीवर परत जाताना अचानक त्याची मोटारसायकल 15-20 जण अडवतात.
मोहसीनची दाढी, नमाजी टोपी आणि हिरवी पठाणी यामुळे त्याच्यावर हल्ला झाला, असे त्याच्या मित्राला वाटते. हॉकी स्टिक आणि दगड यांचा निर्घृण वापर जिवे मारण्यासाठी करताना संतापलेले हल्लेखोर म्हणत होते, ‘शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान करणारी चित्रे फेसबुकवर तूच टाकलीस!’ काय होतेय हे समजायच्या आत मोहसीन रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडला. संपर्कानंतर पोलिस येईपर्यंत हल्लेखोर आपल्या गाड्या आणि हत्यारे टाकून पसार झाले. उपचारादरम्यान मोहसीन मरण पावला. सोलापुरातील मोहसीनचे कुटुंब आमच्या घराजवळ असल्याने त्यांना भेट दिली. त्याचे अम्मी-अब्बा दोघेही दु:खाने थिजल्यासारखे झाले होते.

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, यूट्यूब, इंटरनेट यासारखे संदेशवहनाचे असंख्य मार्ग अलीकडे अनेकांच्या हातात आहेत. इतर राज्यांतील ईशान्य भारतातील रहिवासींचे जथ्थ्याने स्थलांतर, मुझफ्फरनगर आणि मुंबईतील आझाद मैदानावरील दंगल यासारख्या अलीकडील अनेक घटनांपूर्वी समाजातील विविध स्तरांबद्दल गैरसमज, अविश्वास वाढीस लागेल अशा बनावट चित्रफिती पसरवण्यात आल्या होत्या. या वेळीही फेसबुकवर आक्षेपार्ह चित्रे आणि मजकूर पसरवला. त्यापाठीमागे काही महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक हे कारण असूही शकेल. सोलापूरसह पुणे आणि महाराष्‍ट्रातील अनेक शहरांत शनिवार 31 मेनंतर तणाव पसरवण्यात आला. त्यामधे राजकीय आणि कडव्या विचारसरणीच्या संघटना यांच्या नेतृत्वाखाली 200 सार्वजनिक तसेच खासगी वाहनांचे नुकसान झाले. बाजारपेठा बंद पाडल्या. अशा तणावपूर्ण वातावरणात झालेल्या मोहसीनच्या खुनाला ‘हेट क्राइम’ म्हणतात. पोलिस तपासात 19 ते 25 वर्षे वयाचे तरुण हल्लेखोर हिंदू राष्‍ट्र सेना या संस्थेचे सदस्य आहेत, असे स्पष्ट झाले आहे.
खुनाचे समर्थन करत ‘पहिली विकेट पडली’ असा एसएमएस या संस्थेच्या सदस्यांनी एकमेकांना पाठवला आणि परिसरातील बेकरी तसेच इतर मुस्लिम दुकानांची नासधूस केली. त्यामुळे हा गुन्हा कदाचित पूर्वनियोजनाचा भाग असेल की काय, अशीही शंका वाटते. दहा वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या हिंदू राष्‍ट्र सेना या संघटनेचे ब्रीदवाक्य, Hinduise nation and militarise Hindus असे हिंसेला उघड नैतिक अधिष्ठान देणारे आहे. संघटनेचे संस्थापक धनंजय देसाई यांच्याविरुद्ध अनेक फौजदारी गुन्हे दाखल असताना, राज्य सरकार प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी कशाची वाट पाहत होते, हा अनुत्तरित प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. मोहसीनच्या खुनाची आणि वसंत रूपनर यांच्या गंभीर इजेची नैतिक जबाबदारी घेत राज्य सरकारने योग्य कारवाई करण्यात आता तरी तत्परता दाखवायला हवी.

कोठून येते ही हिंसेची प्रेरणा? या हिंसेपाठीमागे द्वेष, पुरुषार्थाचे वर्चस्ववादी विचार आणि अशी हिंसा केली तर त्याला सत्ताधारीवर्ग अभय देतील असा बेमुर्वतपणा असतो. विविध जाती, धर्म, वर्ग, लिंग, वर्ण यामधील स्तरात असणारे पूर्वग्रह, गैरसमज यांचा वापर करत समाजाची ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करणे हे द्वेषाचे कारण आहे. ‘ते’ या स्तराची बहुआयामी ओळख जाणीवपूर्वक पुसून ती एकांगी, नकारात्मक, राक्षसी केली जाते. पुन:पुन्हा होणा-या प्रचारातून ती मनावर बिंबवली जाते. आपल्या दैनंदिन जीवनातील समस्या ‘ते’ निर्माण करतात अशी खात्री पटते. ‘ते’बद्दल द्वेष तयार होतो. ‘ते’ धोकादायक शत्रू होतात. अशा ‘ते’चा समूळ नायनाट करणे योग्य वाटते. असे करण्यासाठी आज्ञा, आदेश, फर्मान किंवा फतवा यापैकी काही तरी लागते. आज्ञापालनाचे बाळकडू कुटुंबासह समाजातील इतर सर्व संस्थांमधून सातत्याने पाजले जाईल याची तजवीज असते.
बहुतेक वेळी कष्टकरी स्तरातील तरुण पिढी यामध्ये बारुद व्हायला तयार होते. त्यांच्या रोजच्या जगण्याचे, भाकरीचे प्रश्न भावनिक अस्मितेपुढे दुय्यम बनतात. मोहसीनला ठार मारणा-यांमध्ये असे तरुण होते. त्यांचे तारुण्य द्वेषाच्या अंतहीन हिंसक शोकांतिकेत अडकते. या तंत्राचा वापर करत समाजात जात, धर्म, विचारसरणी यांच्याशी निगडित अस्मितांचे ध्रुवीकरण करून तथाकथित ‘राष्‍ट्रबांधणीच्या’ प्रयोगाचे राजकारण गेल्या तीन दशकांत सातत्याने होत आहे. या लोकशाही विकासविरोधी प्रक्रियेला समाजातील शिक्षित-सुसंपन्न स्तराचे मिळणारे वाढते नैतिक समर्थन चिंताजनक आहे. मोहसीनच्या खुनाचा निषेध तरुण व्यावसायिकांनी आणि इतर काही जणांनी शांततेने करणे ही आशादायक बाब आहे. नुकताच पुण्यात 15 तारखेला झालेला मोर्चा हे त्याचे ठळक उदाहरण आहे.
आधुनिक सोशल मीडियाचा कल्पक, जबाबदार आणि प्रगल्भ वापर करता येतो हे त्यांना माहीत आहे. आपल्याला न पटणारी चित्रे, चित्रफिती, विचारसरणी याला विरोध करण्याचे लोकशाही मार्ग उपलब्ध आहेत. खून, विध्वंस, राडा याप्रकारे रस्त्यावर न्यायनिवाडा करण्याची क्रूर पद्धत टोळी समाजाचे लक्षण आहे, लोकशाहीचे नाही. फेसबुकवर ‘अनलाइक’ हे बटण तर नक्की निवडता येते. इतिहास, महाकाव्य, पुराणे यातील व्यक्ती, विचार आणि ग्रंथ यांची चिकित्सा प्रत्येक काळात होऊ शकते. समाज जिवंत असण्याचे ते लक्षण आहे. त्यांना माहीत आहे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, जातीय पायावर आधारित ‘आपण’ आणि ‘ते’ असे ध्रुवीकरण विकासासाठी, लोकशाहीसाठी मारक आहे. कोणतीही तणावजन्य परिस्थिती ‘भावनेचा उद्रेक’ नसते, तर ती जाणीवपूर्वक तयार केलेली असते, हे अभ्यासाने दाखवून दिले आहे. हेही माहीत आहे की, इतिहासाच्या विविध टप्प्यांवर ‘ते’ वेगवेगळे होते. उदा. ‘ते’ मद्रासी, बिहारी, भैया, कामगार, कम्युनिस्ट, मुसलमान, दलित, बहुजन, ख्रिश्चन, पाकिस्तानी आणि यासारखे इतर अनेक. राडा, बॉम्बस्फोट, दंगली, महाआरती, महापंचायत, कारसेवा, जाळपोळ, खून, युद्ध, बनावट चित्रफितीचा प्रसार यामुळे त्या त्या वेळी समाजस्वास्थ्य विसकटवले गेले. दरवेळी समाजातील ‘नाही रे’ स्तराचा सन्मानाने जगण्याचा न्याय्य संघर्ष कित्येत दशके मागे लोटला गेला. या वेळीही पुण्यातील दगडफेकीत वर्मी मार लागल्याने कुटुंबाचे आधार असलेले कष्टकरी वसंत रूपनर कोमात आहेत. आपल्या मुलाचे नाव मोहसीन ठेवताना तो ऋजू, परोपकारी होण्याची अब्बांची केवढी मोठी स्वप्ने वास्तवात येता येता अचानक विसकटली....
मोहसीनच्या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने आलेल्या सोलापूर शहरवासीयांना अब्बांनी शांतता आणि संयम राखण्याची विनंती करत आपले दु:ख आवरण्याचा योग्य मार्ग निवडला. ध्रुवीकरण आणि द्वेष यातील फोलपणा सर्व स्तरांतील तरुण पिढीने जाणणे, त्यासाठी समाजात एकजूट करणे, या संदर्भात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अभ्यास करणे, यासारख्या इतर गोष्टींसाठी जाहीर भूमिका घेत योग्य हस्तक्षेपाचा कृती कार्यक्रम प्रभावीपणे तयार करणे ही आजची आपल्यासमोरील आव्हाने आहेत. एकविसाव्या शतकातील दुस-या दशकात विज्ञान-तंत्रज्ञान याची पुरेशी प्रगती झाल्याने संवाद, सहकार्य, सलोखा आणि समता समाजात रुजवणे शक्य आहे. मोहसीनच्या खुनाचा निषेध करणा-या व्यावसायिक तरुणांची स्वप्ने साकार करण्याचे आव्हान पेलण्यासाठी संवेदनशील स्तरांनी त्यांना नैतिक पाठबळ देत समाजात उदारमतवाद रुजवायला हवा. कारण मोहसीन म्हणजे ऋजू, परोपकारी.
लेखिका साम‍ाजिक कार्यकर्त्या आहेत.
aruna.burte@gmail.com