आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Multiculuralism By Prof. Avinash Kolhe, Divya Marathi

दुहेरी निष्ठेची समस्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी एक बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानुसार रिचर्ड वर्मा या भारतीय वंशाच्या व्यक्तीला अमेरिकन सरकारने भारतातील राजदूत म्हणून नेमले. एका भारतीय वंशाच्या, पण आता अमेरिकेचा नागरिक असलेल्या व्यक्तीचा हा सन्मान झालेला बघून आपल्याला आनंद होणे स्वाभाविक आहे. वास्तविक पाहता गेली काही वर्षे असे अनेक भारतीय अमेरिकन व्यक्ती अमेरिकेत अनेक क्षेत्रांत चमकत आहेत. यापैकी चटकन आठवणारे नाव म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे तरुण नेते व मिसुरी या छोट्याशा प्रांताचे लोकनियुक्त राज्यपाल बॉबी जिंदल. आज रिपब्लिकन पक्षात बॉबी जिंदल एवढे लोकप्रिय आहेत की भविष्यात त्यांना या पक्षातर्फे अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची विचारणा होईल, असे बोलले जाते.

रिचर्ड वर्मा काय किंवा बॉबी जिंदल काय, यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत असताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की, ही भारतीय वंशाची मंडळी आहेत हे ठीक आहे; पण आता नागरिक म्हणून त्यांचा निष्ठा अमेरिका नावाच्या वेगळ्या देशाशी वाहिलेल्या आहेत. ते भारतीय वंशाचे आहेत याचा अर्थ ते आपल्या पदांचा वापर करून भारताला मदत करतील, असे नाही. ते भारतीय वंशाचे जरी असले तरी आता मात्र अमेरिकेचे नागरिक आहेत. रिचर्ड वर्मा हे भारतीय वंशाचे भारतीय अमेरिकन आज भारतात अमेरिकेचे राजदूत म्हणून नियुक्त झालेले आहेत. ते भारतीय वंशाचे असले तरी भारतात येऊन ते स्वतःचे व्यावसायिक कौशल्य पणाला लावून अमेरिकन सरकारचे हितसंबंध जपतील यात शंका नाही. ते भारतीय वंशाचे आहेत म्हणून भारताचा खास फायदा होईल, अशी आशासुद्धा न ठेवलेली बरी.

रिचर्ड वर्मा यांच्या नेमणुकीमुळे एका जुन्या मुद्द्याची पुन्हा चर्चा करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपल्या देशात २० व्या शतकाच्या सुरुवातीला महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यलढा तीव्र व्हायला लागला होता. यातील पहिला लढा म्हणजे १९२० चे असहकाराचे आंदोलन. हे आंदोलन गांधीजींनी खिलाफत चळवळीशी जोडून घेतल्यामुळे मुस्लिम समाजात यात मोठ्या प्रमाणात उतरला होता. मात्र, पुढे खुद्द तुर्कस्तानमध्ये केमाल पाशाने खिलाफत रद्द केल्यामुळे मुस्लिम समाज स्वातंत्र्यलढ्यापासून दूर गेला. गांधीजींनी चौरीचौरा येथे घडलेल्या हिंसाचारामुळे असहकाराचे आंदोलन मागे घेतले. परिणामी हे आंदोलन ओसरल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंदू-मुस्लिम दंगे सुरू झाले. अर्थात त्याआधी फक्त मुस्लिमांसाठी असलेली मुस्लिम लीग १९०६ मध्ये स्थापन झाली होती तसेच
१९१६ मध्ये फक्त हिंदूंसाठी असलेली हिंदू महासभासुद्धा स्थापन झालेली होती.
या सर्व घडामोडी स्वातंत्र्यवीर सावरकर बारकाईने बघत होते. त्यांच्या लक्षात आले की, मुस्लिम समाज स्वातंत्र्यलढ्यात तेव्हाच आला जेव्हा काँग्रेसने या लढ्याची सांगड असहकाराच्या आंदोलनाशी घातली. जेव्हा केमाल पाशाने खिलाफतच रद्द केली तेव्हा मुस्लिम समाज असहकाराच्या आंदोलनातून बाहेर पडला. याचा अर्थ मुस्लिम समाजाला ज्या देशात ते राहतात त्या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल काही देणे-घेणे नाही. मात्र, हजारो मैल दूर असलेली खिलाफत रद्द झाल्यामुळे हा समाज इंग्रजी सत्तेशी लढायला तयार होतो. म्हणजे या समाजाच्या निष्ठा नेमक्या कोणाशी आहेत, असा प्रश्न सावरकरांच्या मनात आला. त्यांनी पुढे १९२३ मध्ये ‘हिंदुत्व’ हा ग्रंथ लिहिला.

यात त्यांनी ‘पुण्यभू’ व ‘पितृभू’चा सिद्धांत मांडला. याच्या आधारे मुस्लिम व ख्रिश्चन समाज ख-या अर्थाने भारताशी एकनिष्ठ असूच शकणार नाहीत. याचे कारण या दोन्ही समाजांच्या पवित्रभू भारताबाहेर आहेत. याच आधारे त्यांनी असेही प्रतिपादन केले की, फक्त हिंदूच खरा भारतीय असू शकतो, कारण हिंदूंची पुण्यभू व पितृभू भारतातच आहे. गेली अनेक वर्षे ही व्याख्या वादाच्या भोव-यात सापडलेली आहे.

आज २१ शतकात अशी परिस्थिती अनेक ठिकाणी दिसते की, भारतीय वंशाच्या अनेक कर्तृत्ववान व्यक्ती जगातील ब-याच देशांत आढळतात. या व्यक्ती भारतीय वंशाच्या आहेत, पण आज भारताच्या नागरिक नाहीत. अशा स्थितीत त्यांना १९२३ मध्ये सावरकरांनी दिलेली व्याख्या लावायची झाल्यास त्यांची काय स्थिती होईल? त्यांची पुण्यभू भारत आहे, जशी रिचर्ड वर्मांची आहे; पण त्यांची पितृभू वेगळी आहे. भविष्यात समजा अमेरिका व भारत यांच्यात टोकाचे वाद झाले तर रिचर्ड वर्मा यांच्यासारख्या हजारो भारतीय अमेरिकन व्यक्तींची निष्ठा कोणत्या देशाकडे असेल? पुण्यभूकडे की पितृभूकडे?

सावरकरांनी १९२३ मध्ये जेव्हा ही व्याख्या केली तेव्हा त्यांना कदाचित कल्पना नसेल की लवकरच अनेक भारतीय व्यक्ती भारताच्या सीमारेषा ओलांडून इतरत्र जातील, स्वकर्तृत्वाने नाव कमावतील. या कर्तृत्ववान भारतीय व्यक्ती पुढे इतर देशांचे नागरिकत्व घेतील. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा सुरुवातीला कोणीही कल्पना करू शकते नव्हते की, स्वातंत्र्यानंतर भारतीय समाज एवढ्या मोठ्या प्रमाणात परदेशी जाईल व तेथे स्थायिक होईल. त्या काळच्या समाजासमोर परदेशी डॉक्टर होण्यासाठी गेलेल्या आनंदीबाई जोशींचे झालेले हाल होते. अशा स्थितीत नजीकच्या काळात हिंदू समाज परेदशी जाईल याचा सावरकरांना अंदाज असणे शक्यच नव्हते.

पण १९७०च्या दशकात जेव्हा अनेक भारतीय मोठ्या प्रमाणात परदेशी स्थायिक होऊ लागले व त्या त्या देशाचे नागरिकत्व घेऊ लागले तेव्हा त्यांच्या निष्ठेचा प्रश्न ऐरणीवर आला. इंग्लंडमध्ये लॉर्ड नेसबिट नावाचे राजकारणी होते. ते तर तेथे स्थायिक झालेल्या भारतीय समाजावर उघडपणे दुहेरी निष्ठेचा आरोप करत असत. त्यांचे म्हणणे होते की, जेव्हा भारत व इंग्लंड यांच्यात क्रिकेटचा सामना होतो व इंग्लंड हरतो तेव्हा इंग्लंडमध्ये स्थायिक झालेला भारतीय समाज जल्लोष करतो. हे चूक असल्याचे नेसबिट यांचे म्हणणे होते. तुमचा देश जर हरत असला तर तुम्हाला वाईट वाटायला हवे. एवढे जर भारताबद्दल प्रेम वाटत असेल तर भारतात जाऊन राहा, असाही त्यांचा इंग्लंडमधील भारतीयांना सल्ला होता.

हा प्रकार भारतातही सुरुवातीला होता. १९५० किंवा १९६० च्या दशकात जेव्हा भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात जर भारत हरला तर भारतातील अनेक मुस्लिम वस्त्यांत मिठाई वाटली जात असे. त्यांच्यावर दुहेरी निष्ठेचा आरोप केला जात असे. ही स्थिती १९७०च्या दशकापासून बदलायला लागली. अनेक भारतीय जगभर जायला लागले व विविध देशांचे नागरिकत्व स्वीकारायला लागले. परिणामी त्या काळी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी जाहीरपणे अशा परदेशस्थ भारतीय समाजाला जेथे असाल तेथील मातीशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला दिला.

आज जेव्हा रिचर्ड वर्मा या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड होते तेव्हा त्यामागे झालेले बदल समजून घेणे अनिवार्य ठरते. आज जर एखाद्या मराठी व हिंदू व्यक्तीने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले तर त्याला चार-पाच व्यक्तिमत्त्वांसह वावरावे लागते. ती व्यक्ती भाषेचा विचार केल्यास मराठीची अभिमानी असेल, धर्माचा विचार केल्यास हिंदू असेल व वंशाचा विचार केल्यास आशियाई असेल; पण त्या व्यक्तीची राजकीय ओळख ‘अमेरिकेचा नागरिक’ अशी असेल. गेल्या पाचपन्नास वर्षांत नागरिकत्व, राष्ट्रप्रेम दुहेरी निष्ठा वगैरे संकल्पनांत खूप बदल झाले आहेत. त्यानुसार आपापल्या भूमिकांत बदल करणे गरजेचे आहे.