आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या विकासाचे राजकारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी काढून ती केंद्रशासित करण्याचा डाव पं. जवाहरलाल नेहरूंसह काँग्रेस नेत्यांनी रचला आहे, असा आरोप संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी आंदोलन करणा-या नेत्यांकडून करण्यात येत असे. मात्र, मुंबईसह महाराष्ट्र राज्य १ मे १९६० रोजी अस्तित्वात आले. १९८५ मध्ये मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मुरली देवरा यांच्याशी राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी त्या वेळचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी आरोप केला होता की, काही उद्योगपती मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे काढण्याचे कारस्थान रचत आहेत. त्यांच्या आरोपाचा पद्धतशीरपणे फायदा करून घेत शिवसेनेने त्या वर्षी झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळविला! त्या घटनेनंतर २९ वर्षांनी म्हणजे आता काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेतेच युती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव रचल्याचा आरोप करू लागले आहेत. म्हणजे या आरोपाचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.
मुंबईला जागतिक व्यावसायिक केंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चाधिकार समितीची स्थापना करण्याची मागणी फडणवीसांनी नुकतीच केली. मुंबईच्या विकासासाठी स्वतंत्र सीईओ नेमा, अशी मागणी अडवाणींचे एकेकाळचे सल्लागार सुधींद्र कुलकर्णी यांनी मागे केली होती. फडणवीसांच्या मुंबईसंदर्भातील समिती संकल्पनेचा मूळ स्रोत हा सुधींद्र कुलकर्णी यांच्या योजनेत दडलेला असण्याची शक्यता आहे. मुंबईच्या विकासाचे सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प गेल्या १५ वर्षांपासून केंद्र सरकारची संमती न मिळाल्याने रखडले आहेत. आता उच्चाधिकार समितीची कल्पना पुढे आली असली तरी त्यामुळे केंद्राचा वरचष्मा वाढण्याची भीती आहे. आता राज्यात युती व केंद्रात भाजपचे सरकार असल्याने योग्य संवाद साधून मुंबईच्या विकासाचे प्रकल्प जलदगतीने मंजूर करून घेण्यास अडचण येण्याचे कारण नाही. त्यामुळे उच्चाधिकार समितीचा हा विषय फडणवीसांनी बाजूला ठेवावा. गेल्या १५ वर्षांत मुंबईचे जे प्रकल्प केंद्राच्या मंजुरीअभावी रखडले आहेत, त्याचा दोष गेली दहा वर्षे केंद्रात सत्तेवर असलेल्या यूपीए व गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारचा आहे. आपल्या या ढिलाईचा जाब या दोन्ही काँग्रेसनी द्यायला हवा.