आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Murty Classical Library By Aakar Patel

अभिजात ग्रंथांचा भारतीय प्रवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हार्वर्ड विद्यापीठाने लोएब क्लासिकल लायब्ररीची प्रकाशित केलेली ग्रीक आणि लॅटिनमधील अनुवादित अभिजात पुस्तकं माझ्या आवडत्या पुस्तक मालिकांपैकी एक आहेत. ही पुस्तकं अनेक कारणांसाठी वैशिष्ट्यपूर्ण आणि निराळी ठरतात. यासंदर्भातले पहिले निरीक्षण म्हणजे, या पुस्तकाचा आकार. कुणाच्याही हातात, अगदी खिशातही ती सहज सामावून जायला हवीत, याच उद्देशाने या पुस्तकांचा आकार निश्चित करण्यात आला आहे. या मालिकेतले प्रत्येक पुस्तक साधरणपणे सहा इंच लांब आणि सव्वा चार इंच रुंद असते. प्रत्येक पुस्तकाची जाडी पाऊण इंचापेक्षा किंचित अधिक असते. याचे मुख्य कारण, हिरोटेडसने लिहिलेला पर्शियन युद्धाचा प्रदीर्घ इथे चार भागात प्रकाशित झालेला असतो किंवा सर्वश्रेष्ठ ग्रीक शोकांतिकाकार युरिपिडसची तीन नाटकं एका भागातही समाविष्ट केलेली असतात. एकूणच पाहताक्षणी ही पुस्तकं तुलनेत खूपच छोटी भासतात. माझ्या खासगी ग्रंथालयात एकूण सहा हजारच्या वर विविध विषयांवरची पुस्तकं आहेत. पण लोएब क्लासिक लायब्ररीने प्रकाशित केलेली पुस्तकं त्यामध्ये आकाराने छोटेखानी म्हणून पटकन लक्ष वेधून घेतात.

१९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत लोएब पुस्तकं म्हणजे सुसंस्कृत, अभिजन युरोपियनांनी अग्रक्रमाने वाचायला हवीत, अशी ग्रंथमालिका होती. त्यात प्लेटो आणि अॅरिस्टॉटलचे समग्र ग्रंथ, तसेच प्लुटार्क आणि हिप्पोक्रेटसचे ग्रंथ, हानिबाल विजयाची कॉलिबसने सांगितलेली कथा, अशी कला, इतिहास, वैद्यक विज्ञान अशा विविध ज्ञानशाखांचा संगम असलेली पुस्तकं त्यात असतात. अलेक्झांडरच्या विजयाच्या नोंदीदेखील लोएब क्लासिकल लायब्ररीने पुस्तक प्रकाशित केल्या होत्या. अर्थातच इलियडसारखे महाकाव्य अर्थात त्यात होतेच, पण अनेक ग्रीक शोकांतिकाही होत्या. ग्रीक पुस्तकांबरोबरच सिसेरो, सेनेका, सीझर(एक महान इतिहासकार) अशा लॅटिन लेखकांचीही पुस्तकं त्यात होती. ल्युचियनसारखा व्यंगात्मक लेखक असो किंवा लिवीसारखा रोमन इतिहास लेखक असोत, त्यांची पुस्तकं यात होती. ही सारी यादी प्रसिद्ध ओडिसी आणि इलियाड ही महाकाव्य लिहिणा-या होमरपासून सुरू होते. होमर आठव्या शतकात होऊन गेला. त्यानंतरची १३ व्या शतकातील ग्रंथसंपदा लोएब क्लासिकल लायब्ररीत आलेली आहे.

ही पुस्तकं वैशिष्ट्यपूर्ण ठरण्याचे दुसरे कारण म्हणजे, यात डाव्या पानावर मूळ ग्रीक किंवा लॅटिन मजकूर छापलेला आहे, तर उजव्या पानावर आधुनिक इंग्रजीमधील अनुवाद आहे. आमच्यासारखी ज्यांना ही भाषा थोडीतरी येत असेल, त्यांच्यासाठी ही एक मोठी पर्वणी म्हणावी लागेल. प्रसिद्ध लेखिका व्हर्जिनिया वूल्फने लोएब मालिकेबद्दल लिहिले आहे. ‘लायब्ररीतील डाव्या पानावर ग्रीक, लॅटिन मजकूर आणि उजव्या पानावर इंग्रजी असलेली पुस्तकं म्हणजे, एक मुक्त स्वातंत्र्याची देणगी आहे. वाचणा-यांमध्ये सारेच परिपक्व नसतात, तर त्यात काही नवागत किंवा हौशी वाचकही असतात, हे लक्षात घेऊन या हौशी वाचकांचा पुस्तक निर्मिती करताना आदर केला गेलेला आहे. ग्रीक साहित्यामधील अडचण आजवर आपण कधी नीट ओळखली नाही. त्याचे कारण असे की, जी काही माणसं त्याचा अभ्यास करतात ही सगळी ज्ञानवंत असतात असे मानले जात असे. परंतु एका सामान्य माणसाच्या दृष्टीने ही अत्यंत थोर आणि महत्त्वाची वाङ्‍मयनिर्मिती आहे. आपण हे ओळखायला हवे की, लोएबसारख्या मालिकेशिवाय आपण कधीही राहू शकत नाही.' लोएबची ही सारी पुस्तकं जाड पुठ्ठ्याच्या बांधणीत वेगवेगळ्या रंगात येतात. ग्रीक मजकूर हिरव्या रंगात तर लॅटिन भाषेतील लेखन लाल रंगात छापलेले असते.

या पुस्तक मालिकांचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे, कुणाच्या तरी सामाजिक बांधिलकीतून म्हणजेच कुणाच्या तरी आर्थिक मदतीतून ते आकारास आलेले आहे. पहिल्या पुस्तकात या मालिकेचा हेतू आणि आवाका स्पष्ट करणारे लेखन जेम्स लोएबने केलेले आहे. त्यात तो म्हणतो की, ‘आमचा हेतू ग्रीक आणि रोमन महान तत्त्वज्ञानातील सौंदर्य दाखवावे, त्यातील शिकवण आत्मसात करावी, हा आहे. मुख्य म्हणजे, हे सारे अनुवादातून घडावे, जो अनुवाद सर्वोत्कृष्ट वाङ्‍मयाचा एक नमुना असेल. वाचनातील मौज काय असते, याचा अनुभव देणारे हे लेखन असेल. उगाचच असा काहीतरी मजकूर छापायचा, जो तुम्हाला हे साहित्य किती थोर आहे आणि त्यापासून वाचक कसा वंचित राहिला आहे, याची विनाकारण जाणीव करून देईल, असे लेखन आम्हाला नको. त्यामुळेच मूळ मजकूर आणि त्याचा अनुवाद बाजूबाजूला टाकून आम्ही सर्वोकृष्ट ‘क्रिटिकल टेक्स्ट’ देणार आहोत.’

हे सारं आज लिहिण्याचे कारण म्हणजे, जगभरातल्या जाणकार वाचकांमध्ये मानाचं स्थान मिळवलेल्या ‘लोएब क्लासिकल लायब्ररी’मालिकेच्या धर्तीवर अशीच एक भारतीय पुस्तकांची मालिका आता प्रकािशत होत आहे. मूर्ती क्लासिकल लायब्ररी या नावाची ही मालिका हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या माध्यमातून प्रसिद्ध होत आहे. ‘इन्फोसिस’चे कोट्यधीश संस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन मूर्तीने ही मालिका प्रायोजित केली आहे. या मालिकेच्या हेतूबद्दल ते म्हणतात, “जगभराच्या वाचकांपर्यत गेल्या दोन सहस्रकांतील सर्वोकृष्ट वाङ्‍मय पोहोचवणे, हे आमचे प्राथमिक ध्येय आहे. रोहन मूर्तीचे स्पेलिंग मात्र ‘एमयूआरटीआय’ आहे.”
थोरल्या मूर्तींचे सहकारी नंदन निलेकणी आणि विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी या दोन कोट्यधीश गुणवंतांनी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा देणगी स्वरूपात दिला आहे. ही मंडळी भारतातल्या अतिबलाढ्य उद्योगपतींमध्ये अपवादच ठरतात. कारण, या अतिबलाढ्य उद्योगपतींच्या दृष्टीने चॅरिटी म्हणजे मोठी देवळे बांधणे किंवा महागडी हॉस्पिटल उभारणे एवढेच आहे. म्हणूनच थोरले मूर्ती कमावलेले पैसे वेगळ्या कार्यासाठी देत आहेत ते स्वागतार्ह आहे. असो. गेल्या महिन्यात मूर्ती क्लासिकल लायब्ररीतर्फे प्रसिद्ध झालेली पुस्तके अशी होती : बुले शहाची सुफी गीते, अबुल फजलने लिहिलेला अकबराचा इतिहास (भाग १), थेरीगाथा - बुद्धिस्ट महिलांच्या कविता आणि तेलुगूमधील अभिजात ग्रंथ - मनूची कहाणी आणि सूरदासांचा ग्रंथ, सूर्स ओशन (सूरदासांच्या कवितांचा संग्रह), असे ग्रंथ त्यात आहेत.
अभिजात साहित्यात जगभरची सर्वोत्कृष्ट पुस्तके समाविष्ट होतात. साक्षर नि सुसंस्कृत वाचकाने ती वाचणे आणि अभ्यासणे अपेक्षित असते. कारण समकालीन भाषा आणि साहित्याबरोबरच पारंपरिक भाषांमध्ये मोठे ज्ञान साठवलेले असते. हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी मूळ पुस्तक वाचणे किंवा अनुवाद वाचणे हे दोन्ही मार्ग उपलब्ध असतात. पण यातला दुसरा मार्ग अधिक कठीण ठरतो. रोजच्या गरजेच्या वाचनाबरोबरच संस्कृतीचे ज्ञान घेण्यासाठी आणि प्राचीन ग्रंथ अभ्यासण्यासाठी अनुवादाशिवाय अन्य प्रभावी पर्याय नसतो. लोएब आणि पेंग्विन क्लासिक्ससारख्या मालिका ती ज्ञानभूक भागवत असतात. मूर्ती क्लासिकल लायब्ररीची पुस्तकं अनेक वर्षे चालू असलेल्या या मालिकेला समांतर असा प्रवाह निर्माण करणारी आहेत. मूर्ती यांच्या मालिकेतील पुस्तके लोएबच्या तुलनेत आकाराने मोठी आहेत, पण डाव्या पानावर मूळ मजकूर आणि उजव्या पानावर अनुवाद ही प्रथा इथेही पाळण्यात आली आहे. प्रत्येक वर्षी या मालिकेतली काही पुस्तके प्रसिद्ध होतील. अलीकडे प्रकाशित झालेली ही पाच पुस्तके पाहून तरी मला खात्रीपूर्वक वाटतंय की, ‘मूर्ती क्लासिक्स’ काळाच्या ओघात लोएबसारखीच प्रतिष्ठा मिळवेल.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.