आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम लोकसंख्येत २५% वाढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानव जातीची खरी ओळख तिची भूमी आणि तिचा देश आहे. पण मानवाने देशाला दुसरे स्थान दिले आहे आणि तो ज्या धर्माचा अनुयायी आहे तीच त्याची पहिली ओळख बनली, हे वास्तव आहे. धर्माच्या प्रचार आणि प्रसारात भाषेचा मोठा वापर होत आला आहे. त्यामुळे कोणती भाषा जगात अधिक प्रचलित आहे, यावर पुन्हा पुन्हा चर्चा होत असते. धर्म, भूमी व भाषा यांनी मिळून संस्कृती बनत असते. त्यामुळे कळत नकळत भूमी आणि भाषा धर्माशी जोडल्या जातात.

आज जगात सर्वाधिक लोकसंख्या ख्रिश्चन धर्मीयांची आहे. त्याखालोखाल इस्लामला मानणा-या मुसलमानांचा क्रमांक लागतो. एक काळ असा होता की, तेव्हा धर्मच कायद्यांचा स्रोत होता. नंतरच्या काळात जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि प्रत्येक देशाच्या संस्कृतीवर धर्माचा प्रभाव वाढताना दिसू लागला. हजरते मुसा, येशू आणि मोहंमद यांनी अरबस्तानच्या भूमीवर जन्म घेतला. त्यामुळे त्यांचे कर्मक्षेत्र त्या देशांच्या सीमेत बंदिस्त झाले. दळणवळणातील प्रगतीमुळे जगातील अन्य भागांची माहिती होऊ लागली, तेव्हा त्या भागांवर अधिकार प्रस्थापित करण्यासाठी धर्माचा वापर झाला. पुढे या धर्मांमध्ये संघर्ष होऊ लागला. पश्चिमेकडे या तीन धर्मांची पकड वाढत गेली आणि आशियाच्या दक्षिण भागामध्ये िहंदू आणि बौद्ध िवचारधारा स्थिर झाल्या. त्यांची संस्कृती कृषिप्रधान असल्यामुळे संघर्ष उद्भवला नाही.
पाश्चिमात्यांनी भाषेला आपल्या सत्तेचे साधन बनवले आणि भारतीयांनी मात्र संस्कृत, पाली किंवा हिंदीला सत्तेच्या चौकटीपासून दूर ठेवले. आपल्या आर्थिक विकासासाठी राजकीय दबदबा निर्माण करण्याची आवश्यकता भासली तेव्हा पाश्चिमात्यांनी त्यासाठी भाषेचाही वापर केला. भाषेसोबत त्यासंबंधीचा धर्म येणारच. भारतात मुसलमानांनी उर्दूला आपल्या अस्तित्वाचा आधार बनवले. त्यामुळे उर्दू वृत्तपत्रे जे लिहितात ते सत्य मानावेच लागते. एक असेच कटू सत्य मागील दिवसांमध्ये उर्दू मीडियाने दाखवून दिले. भारतात मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे उर्दू वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर आजचे अल्पसंख्याक पुढील काळात बहुसंख्याक बनू शकतील आणि बहुसंख्याक अल्पसंख्याक बनल्यास आश्चर्य नको.
दरवर्षीप्रमाणे भारतात यंदाही मातृभाषा दिवस साजरा झाला. यानिमित्ताने अनेक उर्दू वृत्तपत्रांनी भारतात अन्य धर्मीयांच्या तुलनेत मुस्लिम लोकसंख्या वेगाने वाढत असल्याचे ठळकपणे प्रकाशित केले. हैदराबादहून प्रकाशित होणा-या दैनिक सियासत आणि मुन्सिफने या गंभीर विषयावर आपली भूमिका मांडली आहे. २३ जानेवारीच्या अंकात दैनिक सियासतने म्हटले आहे की, भारतातील मुस्लिम लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य धर्मीयांची लोकसंख्या १८ टक्के वाढल्याचे या वृत्तपत्राने नमूद केले आहे. म्हणजे, लोकसंख्या वाढीत मुस्लिम ६ टक्क्यांनी पुढे आहेत. भारतात सर्वाधिक मुस्लिम टक्केवारी जम्मू आणि काश्मीर राज्यात आहे. तेथे मुस्लिम लोकसंख्या ६८ टक्के आहे. यानंतर आसामचा क्रमांक लागतो. तेथे ३४.२ टक्के मुसलमान आहेत. पश्चिम बंगालचा तिसरा क्रमांक असून तेथे ही टक्केवारी २७ आहे. या उर्दू दैनिकाने हे सत्यही स्वीकारले आहे की, १९९१ ते २००१ या काळात मुस्लिम लोकसंख्या २९ टक्के वाढली आहे. २००१ मध्ये आसाममधील मुस्लिम लोकसंख्या वाढीच्या दराने मागील सर्व रेकाॅर्ड तोडले. तेथील मुस्लिम लोकसंख्या ३०.९ वरून ३४.३ टक्क्यांवर पोहोचली. लोकसंख्येतील वाढीचे कारण बांगलादेशींची घुसखोरी असल्याचे सांगितले जाते; परंतु आसामला लागून असलेल्या मणिपूरमध्ये मात्र प्रमाण घटले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या २००१ मध्ये २५.२ टक्के होती, ती २०११ मध्ये २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. उत्तराखंडमध्ये मुस्लिम लोकसंख्या ११.९ वरून १३.९ टक्के झाली आहे. नवी दिल्ली येथून प्रकाशित होणा-या साप्ताहिक नई दुनियाने आपल्या २ फेब्रुवारीच्या अंकात मुस्लिम लोकसंख्या वाढत असल्याचे सत्य स्वीकारले आहे. या साप्ताहिकाचे म्हणणे आहे की, “आपल्या गरिबीमुळे मुस्लिम कुटुंब नियोजन करत नाहीत. मुसलमानांच्या घरात एका मुलाचा जन्म हाेणे म्हणजे कमावणारे दोन हात वाढले असे मानले जाते.’'
साप्ताहिक पुढे म्हणते की, “मुस्लिमांनी कुटुंब नियोजन करावे असे जर सरकारला वाटत असेल तर शिक्षण आणि अधिक रोजगाराची व्यवस्था केली पाहिजे. गरीब मुसलमान जास्त मुले जन्माला घालतात आणि श्रीमंत मुसलमान कमी. याचा विचार केला तर खरे चित्र समोर येईल. आसाम आणि प. बंगाल ही राज्ये घुसखोरांसाठी नंदनवन बनली आहेत. सरकारने ही घुसखोरी थांबवावी म्हणजे मुसलमानांवरील कलंक आपोआप दूर होईल. दलित आणि मागास हिंदूंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत असल्याने त्यांचा जीवनस्तर वेगाने उंचावत आहे; परंतु बिचारे मुसलमान मात्र आणखी मागास बनत आहेत. सरकार या दिशेने सक्रिय झाल्यास मुस्लिमही हिंदूंप्रमाणे प्रगतिशील होतील. कुटुंब नियोजन करतील. मुस्लिमांची संख्या अशीच वाढत राहिल्यास हिंदू अल्पसंख्य होतील, असा दावा हिंदू संघटना सतत करत असतात, त्यामुळे मुस्लिमांना अपमानित व्हावे लागते.”

दिल्लीहून प्रकाशित होणा-या जमाते इस्लामीच्या मुखपत्राचे म्हणणे आहे की, या प्रकारच्या बातम्या एका षड्यंत्राचा भाग आहेत. मुसलमानांवर खोटे आरोप करणे भारतातील बहुसंख्याक जनता आणि वृत्तपत्रांचा कटच आहे. या लेखात सादर केलेल्या उर्दू वृत्तपत्रांच्या विश्लेषणाचे एक महत्त्व आहेच; परंतु मुस्लिमांनी कुटुंब नियोजन न करण्याचे कारण शरियतशी संबंधित आहे, हे विसरून चालणार नाही. मौलाना आणि विद्वानांचे मत आहे की, कुटुंब नियोजनाला इस्लामच्या आधारावर योग्य मानले जात नाही. कोणत्याही जीवाला अस्तित्वात येण्यापासून रोखणे धर्माच्या कसोटीवर योग्य नाही, असा त्यांचा युक्तिवाद असतो. सामान्य मुसलमानांना कुराण आणि हदीसच्या नावावर सहज भ्रमित केले जाऊ शकते. आजवर या विषयावर मुसलमानांत जनमत चाचणी झालेली नाही. मुस्लिम माेहल्ल्यात पोलिओ डोस देण्याचे अभियान राबवण्यातही सरकार यशस्वी होऊ शकत नाही तर कुटुंब नियोजनाबद्दल विचारही करायला नको. त्यामुळे यात यशस्वी व्हायचे असेल तर अधिक मुले जन्मास घालण्यासंबंधी ज्या चुकीच्या धार्मिक धारणा रूढ करण्यात आल्या आहेत, त्या संपवाव्याच लागतील.