आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Muslim Voters By Ragendra Sathe, Divya Marathi

मुस्लिमांचे मतदान कोणाला?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मुस्लिमांची संख्या सुमारे चौदा टक्के आहे. जम्मू-काश्मीरमध्ये ते बहुसंख्य आहेत. केरळ, आसाम, पश्चिम बंगाल यांसारख्या राज्यांमध्ये ते जवळपास 25 टक्के आहेत. उत्तर प्रदेशमध्ये त्यांची संख्या सुमारे 20 टक्के, तर बिहारमध्ये 17 टक्के आहे. देशात 35 जिल्हे असे आहेत, जिथे मुस्लिमांची संख्या 30 टक्के किंवा त्याहूनही अधिक आहे. लोकसभेतल्या एकूण 543 पैकी 183 जागा अशा आहेत, जिथे मुस्लिमांची संख्या 11 टक्के आहे. म्हणजे, या मतदारसंघांत मुस्लिमांनी एकदिलाने मतदान करण्याचे ठरवले, तर तिथला निकाल ते घडवू वा बिघडवू शकतात.
मुस्लिमांचा कल नेहमीच आजवर बहुतेकदा काँग्रेस वा तत्सम पक्षांच्या बाजूने राहिला आहे. 2009मध्ये काँग्रेसने दिल्लीतील सातही लोकसभा जागा जिंकल्या होत्या. त्या वेळी 78 टक्के मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला कौल दिल्याचा निष्कर्ष निघाला होता. पश्चिम बंगालसारख्या राज्यात मुस्लिम आजवर कम्युनिस्टांना मतदान करीत. पण आता त्यांची जागा तृणमूल काँग्रेसने घेतली आहे. गेल्या विधानसभेला तब्बल 52 टक्के मुस्लिमांनी ममतांना पाठिंबा दिला होता. लालकृष्ण अडवाणींची रथयात्रा अडवून मुस्लिम आणि यादव असा भक्कम मतदारसंघ उभारणा-या लालूंच्या राष्‍ट्रीय जनता दलाला 30 टक्के मुस्लिमांची पसंती मिळत आलेली आहे.


बाबरी विध्वंसानंतरच्या काळातल्या राजकारणातून एक बाब स्पष्ट झाली; ती म्हणजे, या देशात हिंदूंची संख्या सुमारे 85 टक्के असली तरीही, या देशातले हिंदू भाजपला एकगठ्ठा मते द्यायला तयार नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपला केंद्रातील सत्ता हस्तगत करायची असेल, तर मुस्लिमांना दुर्लक्षून चालणार नाही.
दुसरीकडे, 2014च्या लोकसभा निवडणुकांना सामोरे जात असताना काँग्रेस अत्यंत गलितगात्र अवस्थेत आहे. मायावतींच्या दलित-ब्राह्मण अशा ‘सर्वजन’ राजकारणाचा रंग उडू लागला आहे, तर मुलायमसिंहांच्या समाजवादी पक्षाचे मुजफ्फरनगर दंगलींबाबतचे अपयश दारुण आहे. तिकडे बिहारमध्ये लालू आणि नितीश हे पक्षांतर्गत बंडाळीने हैराण झाले आहेत, तर भाजपने आपल्या राजकीय प्रचाराच्या संघात हिंदुत्वाला राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे. मुसलमानांचा शत्रुवत होणारा उल्लेख थांबला आहे. उलट, राजनाथसिंहांनी त्यांची जाहीर माफी मागितली आहे. (आता ही माफी नेमकी कशाबद्दल हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही, ही गोष्ट सोडा.) मुसलमानांचे प्रत्येक मत आमच्यासाठी अमूल्य आहे, असे विजयकुमार मल्होत्रा म्हणत आहेत. एकूणच, मुस्लिमांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्याच्या राजकारणाला तूर्तास तरी रजा देण्यात आली आहे.


याचा एक बरा म्हणता येईल असा परिणाम हा की, मुस्लिमांना आजवर सातत्याने ‘हिंदू-मुस्लिम’ अशाच परिप्रेक्ष्यात विचार करण्याची जी सक्ती होती, ती काही काळासाठी उठली आहे. धार्मिक व्यूहाच्या बाहेर येऊन राजकारणाचा विचार करण्याच्या शक्यतेची एक फट त्यातून निर्माण झाली आहे. मुद्दा असा आहे की, मुसलमान मानस आज बदलत आहे काय?


मुस्लिम मानस असे जरी म्हटले, तरी देशभरचा मुस्लिम हा एकच नाही. अलीकडेच अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे ज्येष्ठ अभ्यासक महंमद सज्जाद यांनी बिहारमधील मुस्लिमांबाबत जे पुस्तक प्रसिद्ध केले आहे, त्यात त्यांनी मुस्लिम हा एक समाज नसून अनेक समाज किंवा ‘कम्युनिटीज’ आहेत, असा उल्लेख केला आहे. देशभर पसरलेल्या विविध आर्थिक, प्रांतिक आणि जातीय स्तरातील मुस्लिमांमध्ये तर हीच गोष्ट कित्येक पटींनी खरी आहे. आपल्याकडे अंतुले किंवा हुसेन दलवाई या कोकणी मुसलमानांना उत्तर भारतीय मुस्लिम आपले नेते मानत नाहीत. एपीजे अब्दुल कलाम किंवा ए. आर. रेहमान हे मुस्लिम समाजाचे आयकॉन ठरत नाहीत, कारण उत्तरेकडच्या मुस्लिमांना ते आपले वाटत नाहीत. फार काय, हैदराबादची कडवी इत्तेहादुल मुसलमिन आणि इतरत्रचे कडवे यांचेही जमत नाही.


पण तरीही, मोदी यांच्या भाजपच्या बाजूने जायचे की त्यांना विरोध करणा-यांबरोबर राहायचे, याची एक उलघाल त्या समाजात सर्वत्र चालू आहे. लंडनस्थित हसन सरुर या ज्येष्ठ पत्रकाराने असे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांचे बोलणे आश्वासक वाटत असले तर मुस्लिम तरुणांनी जरूर त्यांच्या मागे जावे. इतिहासात अडकून न पडलेला नवा मुस्लिम मध्यमवर्ग (जरी तो संख्येने थोडा आहे) याच रीतीने विचार करीत आहे, असे भाजपचे म्हणणे आहेच. गुजरातेतील बोहरा व्यापारी किंवा काही विशिष्ट पंथीयांचे तरुण धर्मगुरू हे मोदींच्या बाजूला झुकले असल्याची प्रसिद्धी अनेकदा करण्यात येत असते. एकेकाळी काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या आणि अहमद पटेल यांच्या निकटवर्ती असिफा खान यांच्या भाजप प्रवेशाचा आणि त्यांनी मोदींची बाजू लावून धरण्याचा जोरदार प्रचार करण्यात येत असतो. अलीकडचा पत्रकार असलेल्या एम. जे. अकबर यांचा पक्षप्रवेश हाही असाच गाजवण्यात आला. अशी उदाहरणे देऊन सर्वच वारे फिरले आहे, असे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न चालू आहे.


यातली मेख अशी आहे की, भाजपचा सध्याचा पवित्रा हा डावपेचात्मक राजकारणाचा एक भाग आहे. जसे की, कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्षाने आपला हितशत्रू असलेल्या भाजपसोबत युती करून उत्तर प्रदेशाची सत्ता मिळवली होती. किंवा, अलीकडे दलित आणि ब्राह्मण अशी मोट बांधली होती. राजकारणासाठी अशा तडजोडी केल्या तरी आपल्या दलितत्वाचा मूळ गाभा कायम राहील, असा त्यांचा दावा होता. भाजपची मुस्लिमांबाबतची भूमिका काहीशी अशीच आहे.


सवाल असा आहे, की या डावपेचांच्या राजकारणाला प्रतिसाद देऊन आपल्या समाजाच्या हितांचा गाभा कायम ठेवण्यात मुस्लिम राजकीय नेत्यांना यश येईल काय? तसा आत्मविश्वास त्यांच्यात आहे काय? अशी तडजोड करूनही आपल्या समाजात ते आपले स्थान टिकवून ठेवू शकतील काय? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची दिशा 2014च्या लोकसभा निवडणुकीतील मुस्लिमांच्या वर्तनातून मिळणार आहे. त्या दृष्टीने मुसलमान कोणाला मतदान करणार, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.