आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Nagan Khurd Water Conservation By Dr. Hemant Patil

जलसंधारण अन् नागण खुर्द

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागण खुर्द येथील शेतकरी खूप कष्ट करतात, पण चार सुखाचे घास ते व्यवस्थित खाऊ शकत नाहीत. असे का होते हा प्रश्न मनात घर करून बसला होता. त्याचे उत्तर शोधताना असे कळले की, गावातील नाले, बांध यांच्यातील गाळ अनेक वर्षांपासून काढला नसल्याने व ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’... हा उपक्रम कोणीच राबवत नसल्याने विहिरींना पाणी राहत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सुरुवातीला शेतक-यांना पत्र लिहिले. त्यातून ग्रामस्थांना लोकसहभागासाठी आवाहन केले. त्याचा लोकांवर चांगला प्रभाव पडला.


गावाच्या भल्यासाठी 2011 मध्ये शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांचे गावात व्याख्यान आयोजित केले. व्याख्यानानंतर खानापूरकर यांनी गावाच्या पाहणीसह तीन नाल्यांचा अभ्यास करून काय उपाययोजना करता येतील याबाबत काही टिप्स दिल्या. त्या लोकांना समजवून सांगण्यासाठी आम्ही 40 पानांची ‘जलसमृद्धी’ या नावाने एक पुस्तिका तयार करून, प्रचारसभा घेऊन वाटप केली. त्यानंतर लोकसहभागातून चार नाले चार किलोमीटरपर्यंत 5 फूट खोल व 15 फूट रुंद खोदून त्यातून 20 हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला. त्यामुळे सुमारे 2 कोटी लिटर जलसाठा निर्माण होऊन तेवढेच पाणी जमिनीत जिरले. 2013 मध्ये उत्तम पाऊस झाल्याने 10 सिमेंट बंधारे व दोन माती बंधारे तुडुंब भरले. प्रत्येक बंधा-यात 100 ते 150 मीटरपर्यंत पाणीसाठा कायम आहे. सर्व जलसाठे लक्षात घेता जवळपास दीड किलोमीटर पाणी पावसाळा संपल्यानंतर तब्बल तीन महिने अडलेले होते. भरलेल्या नाल्यांच्या दोन्ही बाजूंना खोदलेले मातीचे साठे आहेत. त्याचा परिणाम म्हणून एवढा पाऊस पडूनसुद्धा शेतातील मातीच्या वाहण्याला प्रतिबंध झाला आहे. म्हणजेच जलसंधारणाबरोबरच मृद्संधारणसुद्धा शक्य झाले आहे.


या कार्यानंतर गावाच्या वरच्या बाजूला असलेला तलाव 1972 मध्ये खोदण्यात आला होता. त्या ठिकाणी 15 दिवस एका पोकलेनचा वापर करत 1300 ट्रॉली गाळ काढून त्या तलावाची जलधारण क्षमता वाढवण्यात आली. परिणामी जे शेतकरी मे महिन्यात कपाशीसाठी टॅँकरने पाणी आणत त्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे. आजदेखील रब्बी हंगाम घेऊन 10 ते 15 फूट पाणी विहिरीत शिल्लक आहे. वरील सर्व कामासाठी 580 तास पोकलेनचा वापर करून 18,206 घनमीटर खोदकाम केले आहे. त्यामुळे 1.82 कोटी लिटर जलसाठा निर्माण झाला असून त्यांचा एकूण 41 विहिरींना कायमस्वरूपी लाभ झाला. तर 150 हेक्टर लागवड क्षेत्राची पाण्याची समस्या दूर झाली आहे. ही योजना पूर्णत्वाला नेण्यासाठी पाच लाख खर्च आला आहे.


यापैकी 1 लाख महात्मा फुले जलभूमी संधारण योजनेकडून अनुदान तर उर्वरित खर्च ग्रामस्थ व मी केला आहे. यासाठी जीवन पाटील, काशीनाथ पाटील, वासुदेव पाटील, राजेंद्र पाटील, काशीनाथ देशमुख, दिलीप पाटील, उमाकांत पाटील, जयंत महाजन, युवराज पाटील व नितीन पाटील व इतर ग्रामस्थांची मोलाची साथ मिळाली. त्यामुळे तर आज गावाचा कायापालट होऊन शेतकरी सुखी झालेला दिसतो. तसेच गावात पर्जन्यमापक यंत्र बसवून पावसाची नोंद केली जात आहे. त्याची शेतक-यांना चांगली मदत होते. हे कार्य इतर गावांतील ग्रामस्थांनीदेखील केल्यास त्यांच्या गावाचादेखील सहज विकास होईल, यात शंका नाही.
धावत्या पाण्याला चालतं करा,
चालत्या पाण्याला बसतं करा,
बसत्या पाण्याला झोपतं करा..
वरील जलसंधारणाचा संदेश, पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाची साठवण करणे व वापरात आणणे हा संदेश देतो. त्याचा
उपयोग सा-यांनी करायला हवा.


hemantpatil72@gmail.com