आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Narandra Modi's Prime Ministerial Candidature

नाइट वॉचमन नरेंद्र मोदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपने राजकीय खेळीचा मोठा ‘गेमप्लॅन’ आखल्याचे दिसते आहे. राजकारणातील पितामह भीष्म लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदापासून दूर सारण्याची ही खेळी केवळ दाखवण्यासाठी आहे, असे वाटते. मोदींना ‘रणसंग्राम-2014’ साठी पुढे करण्याच्या संघाच्या या नीतीला विविध कंगोरे आहेत. संघाचे ‘खायचे आणि दाखवायचे दात’ वेगवेगळे असतात हे तर उघड गुपित असल्याचे सर्वश्रुत आहे. पंतप्रधानपदाच्या घोषित उमेदवारीसंदर्भात आपण या दृष्टिकोनातून विचार केला तर काही कंगोरे आपल्याला कळून येतील. 13 सप्टेंबरला उमेदवारीच्या घोषणेनंतर अडवाणींचे मौन आणि मोदींनी सभांमधून घेतलेली आघाडी. तसेच ‘रेवाडी’ आणि परवा ‘गुजरात’ मध्ये अडवाणी-मोदींच्या उपस्थितीतून संघनीतीच्या ‘गेमप्लॅन’ ची ‘चाहूल’ लक्षात येते.
तळाच्या फलंदाजाला ‘ओपनिंग’ पाठवून कमी चेंडूत जास्त धावा काढून धावगती राखण्याचे हे तंत्र क्रिकेटच्या विश्वातील आहे. अगदी त्याप्रमाणे मोदींना नाइट वॉचमन केले असून, नंतर राजकारणातील सेट ‘बॅट्समन’ अडवाणींनी विजयश्री खेचून आणण्याची संघाची ही ‘कूटनहती’ अथक परिश्रमातून मिळवलेल्या अडवाणींच्या संमतीतूनच ठरली आहे.
अडवाणींना अर्धचंद्र दिला, अडवाणींचा पत्ता कट केला, त्यांना साइड ट्रॅक केल्याचे माध्यमांचे हे वार्तांकन अर्धसत्य जरी असले तरी पूर्णसत्य नक्कीच नाही. मागील काही महिन्यांमध्ये माध्यमांनी, विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने तज्ज्ञ विश्लेषकांना घेऊन अडवाणींच्या गच्छंतीवर तासन्तास खल केला. पण संघ आणि पक्षाच्या भूमिकेचा नेमका अन्वयार्थ काढण्यात माध्यमं कमी पडल्यासारखी वाटतात...!
तिस-यांदा गुजरात सर केल्यानंतर संघ आणि भाजपने सुनियोजितपणे मोदींचे ‘ब्रँडिंग’ केले. मोदींच्या ‘ब्रँड इमेज’ला पुढे करून 52 टक्के तरुण मतदारांना आकर्षित करणे, गोध्राच्या पार्श्वभूमीवर सकळ हिंदूंचा कैवार घेणा-या मोदींना हळुवारपणे पुढे करून हिंदूंना आकर्षित करणे आणि गुजरातचे ‘तथाकथित’ विकास मॉडेल त्यांच्या रूपाने प्रचारात रेटणे ही रणनीती आखल्याचे आपल्या लक्षात येते. 70 कोटी मतदारांपैकी बहुतांश मतदारांना भुरळ टाकून मते खेचण्याची संघ‘नीती’ यशस्वी होईल आणि एकट्या ‘कमळ’ निशाणीवर जवळपास 190 किंवा 200 खासदारांचे ‘गणित’ जमवण्याचे काम मोदींना देण्यात आले आहे. पण बहुमतासाठी लागणा-या 272 च्या जादुई आकड्यासाठी मोदींना दिल्लीत नवे मित्रपक्ष मिळण्याची शक्यता धूसर आहे...! त्या वेळी कमी पडणा-या 72 किंवा त्यापेक्षा अधिक जागांसाठी अडवाणींचा चेहरा वापरता येईल असे संघ, भाजपचे प्रयत्न आहेत. केवळ हिंदुत्व सत्तेचा मार्ग नाही, हिंदुत्वामुळे वाढीव जागा मिळू शकतात. मात्र, सत्तेसाठी काही धर्मनिरपेक्ष, काँग्रेसेतर मित्रांची मोट बांधावीच लागते.
‘नायदर काँग्रेस...नॉर बीजेपी’ असा सूर लावणा-या काही घटक पक्षांना अटलबिहारी वाजपेयींनीच सोबत घेतले होते. ‘नॉर बीजेपी’च्या सूत्रावर पाणी सोडून अटलजींमुळेच एनडीएत काही पक्ष डेरेदाखल झाले होते. त्या वेळी अडवाणी हे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे नेते होते. पण आता अटलजींची कमतरता भरून काढण्यासाठी अडवाणींनी ‘अटल’ भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे पंतप्रधानपदाची सर्वाधिक महत्त्वाकांक्षा बाळगणा-या नेत्याने आपल्या स्वप्नावर पाणी सोडल्याचे मनाला न पटणारे आहे. अडवाणींची खरी गरज संघाला निवडणुकीनंतर पडेल. त्या वेळी त्यांचा योग्य वापर करून सत्ता हस्तगत करण्याचा हा ‘गेमप्लॅन’ यशस्वी होतो का, हे बघण्यासाठी मात्र मेअखेरची वाट पाहावी लागेल. 272 साठी मित्र जमवण्याची क्षमता अडवाणींत आहे, मोदींत नाही. त्यामुळे ‘पितामहं’ना ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी पुढे करण्याचे आश्वासन संघाने देऊन ठेवले आहे. त्याशिवाय अडवाणींची समजूत काढलीच जाऊ शकत नाही. भाजपने पंतप्रधानपदाचे काढलेले लॉटरीचे ‘बंपर तिकीट’ मोदींच्या हाती जरी असली तरी ‘रक्कम’ आपल्यालाच मिळेल अशी आशा ठेवण्यापलीकडे सध्या तरी अडवाणींकडे पर्याय नाही...! ‘दाखवायचे आणि खायचे दात’ या वेळी संघाचे एकच असते तर अडवाणींनी 13 सप्टेंबरनंतर राजकीय निवृत्ती घेण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता..? पण असे झाले नाही त्याची पाच कारणे आहेत.
1. मागील 60 वर्षांपासून भारतीय राजकारणात अडवाणींचा असलेला दबदबा 2. अवघ्या दोन खासदारांच्या पक्षाला अडवाणींनी देशातील आणि संसदेतील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मिळवून दिलेला नावलौकिक. 3. प्रवास न सोसणा-या वयात रथयात्रांमधून केलेला मैलो प्रवास, त्यातून पक्षाला मिळालेला जनाधार...4. राममंदिर, काश्मीरचे 371 कलम आणि समान नागरी कायद्यासारख्या नानाविध ‘क्लृप्त्या’ आखून पक्षाला मिळवून दिलेले संसदीय यश. 5. आधी तेरा दिवस, मग तेरा महिन्यांसह एकूण साडेसहा वर्षे केंद्रात सत्ता मिळवण्याची किमया त्यांनीच तर केली आहे. एवढ्या उत्तंग व्यक्तिमत्त्वाच्या अडवाणींना सहजपणे अन् तेही त्यांचेच शिष्य मोदींच्या बदल्यात ‘रिप्लेस’ करतील ही कृती मनाला न पटणारी आहे.
मोदींचे ‘ब्रँडिंग’ करून त्यांना केंद्राच्या राजकारणात आणण्याचा घाट अडवाणींच्या संमतीशिवाय झाला हे जरी खरी असले तरी त्यात त्यांना रजामंदी देण्याशिवाय पर्याय नव्हता. लॉटरी लागली तर ‘रक्कम’ आपल्यालाच मिळणार असल्याचे सत्य माहीत असूनही मग अडवाणी तीव्र नाराज का आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो. होय, संघाने घेतलेल्या या निर्णयात अडवाणींची नाराजी आहे, पण लॉटरीचे तिकीट संघाने आपल्या हातात टेकवण्याऐवजी मोदींच्या हातात दिल्याचे त्यांना दु:ख आहे. अडवाणींनी 2014 ची लोकसभा अखेरची ‘इनिंग’ असेल अशी वाच्यता करूनही अखेरचे नेतृत्व दिले गेले नाही याचे त्यांना शल्य आहे. पण मोदींना मिळालेल्या ‘मँडेट’वर अडवाणींना ‘शपथ’ द्यायची संघाची ही भूमिका अडवाणींना मान्य नव्हती. माध्यमांनी तर संघ, भाजपने त्यांचा पत्ता कट केल्याचे ‘अतिरंजक’ वृत्तमालिका आणि ‘डिबेट’ घडवून आणले. ते काही अंशी खरे असेलही..! अर्थात लोकसभा निवडणुकीचे नेतृत्व करण्यास आपण सक्षम नसल्याचा समज पसरवला गेला. विशेष हातोटी वापरून संघाने हा समज सर्वमान्य (देशव्यापी) करून घेतला. अडवाणींना सर्वाधिक शल्य त्याचेही आहे.. ! आपले निरुपयोगित्व दुस-यांनी का ठरवावे..? असा प्रश्न त्यांच्या भोवती घोंगावतो आहे. लोकसभा निवडणुकीनंतर याच ‘फायर ब्रँड’ मोदींमुळे मित्रपक्ष दूर जातील, त्या वेळी ‘अडवाणी कार्ड’ बाहेर काढायचे या ‘क्षुल्लक’ व्यूहरचनेचा अडवाणींना तिटकारा आहे.
तिस-यांदा गुजरात जिंकल्यानंतर म्हणूनच मोदींना संघाने स्वस्थ बसू दिलेले नाही. देशातील नामांकित संस्थांत त्यांची भाषणे ठेवणे, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये जम्बो मुलाखती घडवणे, देशातील प्रमुख बालेकिल्ल्यांत त्यांचे मेळावे, संमेलने, जाहीर सभांचे फड रचणे. या काळात अडवाणींचे मन ‘दु:खी-कष्टी’ होत गेले. सवाल केवळ पंतप्रधानपदाचा नाही, सवाल निवडणुकीतील नेतृत्वाचाही आहे. मोदींकडे निवडणुकीचे सूत्रे सोपवून अडवाणींना आपली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पत’ गेल्यासारखे वाटू लागले आहे. त्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर दिसून येत आहे. गोव्यात मोदींकडे प्रचार समितीचे प्रमुखपद देण्यापूर्वी विश्वासात घेतले गेले नसल्यामुळे अडवाणींनी सर्व पदांतून मुक्ती मिळवण्यासाठी पक्षाध्यक्ष राजनाथसिंहांना खरमरीत पत्र लिहिले. त्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी सरसावलेले भाजपचे वरिष्ठ नेते आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्यात गुप्त खलबते झाली. ती खलबतं म्हणजेच ‘लॉटरीची रक्कम’ अडवाणींना देण्याचे होय. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीचा ‘डिक्लेअर अजेंडा’ आणि ‘हिडन अजेंडा’ असेच संघाच्या कृतीला म्हणावे लागेल. मोहन भागवत-अडवाणींची दिल्ली आणि नागपुरातील संघ मुख्यालयातील भेटीतच ही खलबते झाल्याचा दाट संशय असून आपल्यापासून ते लपवून ठेवले आहे.