यंदा योगायोग असा की, गांधी जयंती व दसरा हे लागोपाठ आले आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी संधी साधण्याच्या
आपल्या विलक्षण हातोटीचा पुरेपूर वापर करून एक उत्तम गोष्ट केली.
गांधी जयंतीला त्यांनी मोहनदास (मोहनलाल नव्हे) करमचंद गांधी ऊर्फ महात्मा गांधी यांचा जयघोष केला. या महात्म्याचा जो सार्वजनिक स्वच्छतेचा आग्रह असायचा, त्याचं महत्त्व स्वतःच हातात झाडू घेऊन जनतेला पटवून दिलं. शिवाय स्वच्छतेची शपथही भारतीय जनतेला दिली. त्याचबरोबर येत्या पाच वर्षांसाठी हजारो कोटींच्या सार्वजनिक स्वच्छता मोहिमेचीही त्यांनी घोषणा केली.
लगेच दुस-या दिवशी दसरा आला आणि ‘बहुविधतेनं नटलेल्या भारताला एकत्र ठेवणारा धागा हा हिंदुत्वाचाच आहे,’ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे मौलिक सुविचार संपूर्ण देशानं ऐकले. या भाषणाचं प्रत्यक्ष प्रक्षेपण (सध्याच्या टेलिव्हिजनच्या भाषेत ‘लाइव्ह टेलिकास्ट’) दूरदर्शननं केल्यानंच सरसंघचालकांचे सुविचार ऐकण्यासाठी आतुर झालेल्या हिंदुस्थानातील समस्त नागरिकांचं समाधान झालं असेल.
...आणि
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हे सुविचार देशाला ऐकवल्याबद्दल सरसंघचालकांची मुक्तकंठानं स्तुती केली. तीही ट्विट करून. या दोन्ही गोष्टींकरिता पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन अशासाठी करायचं की, त्यांच्या या निर्णयानं २६ मे रोजी सरकार अस्तित्वात आल्यापासून संभ्रमाच्या धुक्याचा जो दाट पडदा सर्व निर्णय प्रक्रियेभोवती पडला होता, तो एका झटक्यात दूर झाला. मोदींचं प्राधान्य विकासालाच आहे, संघाची भूमिका त्यांना मान्य नाही; पण हळूहळू ते सगळ्यांना ताळ्यावर आणतील, असं १६ मेच्या निवडणूक निकालानंतर हिंदुत्ववादी शक्तींनी जी सामाजिक ध्रुवीकरणची मोहीम हाती घेतली, त्यावरून वाद निर्माण झाला की सांगितलं जात होतं. त्यामुळं एक संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.
मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळं हा संभ्रम एका झटक्यात दूर झाला आहे. संघ व मोदी हे एकाच मार्गानं चालले आहेत, या राजकीय वास्तवाबद्दल आता संभ्रम राहिलेला नाही. संघ जेव्हा हिंदूंचा हिंदुस्थान म्हणतो, तेव्हा ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेचा मथितार्थ तोच असतो. संघ व मोदी यांनी आपली भूमिका अशी इतकी स्वच्छपणे स्पष्ट केली असल्यानं आता ‘मोदी व संघ वेगळे आहेत, मोदी हिंदुत्ववाद्यांना सरळ करतील,’ असा युक्तिवाद करीत कुंपणावर बसू पाहणा-यांना कोणतीही सबब पुढं करण्याची संधी उरलेली नाही. ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे,’ ही संघाची भूमिका आहे. तीच मोदी यांनाही मान्य आहे. अन्यथा त्यांनी सरसंघचालकांचं भाषणाबद्दल इतकं उघड कौतुकच केलं नसतं. म्हणूनच ‘हिंदुत्ववादी’ नसलेल्या उद्योग, व्यापार, कला, संगीत, साहित्य, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांतील मान्यवर दिग्गजांनी आता ‘हिंदूंचा हिंदुस्थान’ किंवा ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ अथवा ‘हिंदू संस्कृती हीच या देशाची संस्कृती आहे,’ ही भूमिका मान्य आहे काय, याचा खुलासा करणं क्रमप्राप्त आहे. उदाहरणार्थ - ‘इन्फोसिस’चे शिल्पकार नारायण मूर्ती अथवा ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी, ‘बायोकॉन’च्या किरण मुझुमदार-शॉ वगैरेंसारख्या उद्योग जगतातील दिग्गजांना दीनानाथ बात्राप्रणीत ‘विज्ञान’ मान्य आहे काय आणि तसं ते नसल्यास बात्रा यांच्या पुस्तकांना प्रस्तावना लिहिणा-या मोदी यांना ते त्याबद्दल विचारण्याची हिंमत दाखवणार आहे की नाही?
आमिर खान वा
अमिताभ बच्चन हे ‘बॉलीवूड’मधील ‘शोमेन’ मोदी यांच्या ‘स्वच्छता मोहिमे’त सामील होत असताना, ‘गांधीजींची स्वच्छता फक्त सार्वजनिक क्षेत्रापुरतीच मर्यादित होती की, त्यात स्वतःच्या शरीराबरोबर मनही निर्मळ व निष्कलंक ठेवण्यावर भर नव्हता काय,’ असा प्रश्न मोदी यांना विचारणार आहेत की नाही? या अशा प्रश्नांची उत्तरं अर्थातच ‘नाही’ अशीच असणार आहेत.
...कारण या मंडळींप्रमाणे मोदी यांनाही गांधींजींच्या ख-या विचारांशी काही सोयरसुतक नाही. गांधी हे मोदी यांच्या दृष्टीनं राजकीय सोईचं एक साधन आहे. तसं जर नसतं, तर ज्या हिंदुत्वापायी गांधीजींचा खून नथुरामनं केला, त्याचा स्रोत असलेल्या संघटनेच्या प्रमुखाचं भाषण सरकारी प्रसार माध्यमांवरून दाखवण्याचा निर्णय गांधी जयंतीच्या दिवशी त्या महात्म्याच्या विचारांचा जयघोष करून लगेच दुस-या दिवशी मोदी सरकारनं घेतलाच नसता. अर्थात ही संघाची कार्यपद्धतीच आहे. त्यामुळं मोदी असं कसं करू शकतात? हा विरोधकांचा आक्षेप त्यांच्या वैचारिक भाबडेपणाचा निदर्शक आहे.
हा असा संघाचा संधिसाधूपणा गेल्या ९० वर्षांत कायमच दिसून येत आला आहे. वेळ पडल्यास विश्वामित्री पवित्रा घ्यायचा आणि वेळ आल्यास विश्वामित्रालाच पुढं करायचं, ही ती कार्यपद्धती आहे. म्हणजे ‘हिंदुत्वा’मागचा विद्वेषी विचार उघड करणारं गोळवलकर यांचं एखादं वचन वा वाक्य संदर्भासहित उद्धृत केलं की एकदम विश्वामित्री पवित्रा घेत, ते वाक्य असलेलं ‘गुरुजी’चं साहित्य संघ प्रमाण मानत नाही, असं सांगून मोकळं व्हायचं. सरदार पटेल यांनी गांधींच्या हत्येनंतर संघाबद्दल श्यामाप्रसाद मुखर्जी यांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं, ते दाखवून दिलं की, ‘त्या वेळी पटेल यांचं आकलन चुकीचं होतं,’ असं म्हणत हात झटकून टाकायचे. उलट ‘ज्यांना तुम्ही भ्रष्ट म्हणून हिणवलंत, गंभीर आरोप केले, त्यांनाच पक्षात घेऊन निवडणुकीचं तिकीट कसं काय देता,’ असा प्रश्न विचारताच एकदम विश्वामित्राचा आधार घेत ‘शाश्वत धर्म’ व आपद् धर्म’ अशी फोड करून पळवाट शोधायची. ‘आम्हाला निवडून येणं गरजेचं आहे. त्यासाठी अशा लोकांना तिकिटं देऊन आमची संख्या वाढवणं गरजेचं आहे, असं एकदा आम्ही निवडून आलो की, मग आम्ही आमचा शाश्वत धर्मच पाळणार,’ अशी ग्वाही ‘दिल्लीत नरेंद्र, महाराष्ट्रात देवेंद्र’ अशा घोषणांच्या गजरावर स्वार होऊन सध्या चौखूर उधळत असलेल्या महाराष्ट्र भाजपच्या प्रमुखांनी दिली आहे. सरळ सोप्या मराठीत या वागणुकीला संधिसाधूपणा म्हणतात आणि सत्तेसाठी तो आम्ही करीत आहोत, असं म्हणण्याची राजकीय धमक या ‘नरेंद्रा’च्या लाटेवर स्वार झालेल्या ‘देवेंद्र’त नाही.
हीच संघाची कार्यपद्धती गांधीजींच्या मोदी यांनी सध्या चालवलेल्या जयघोषात दिसून येते. ‘जातीविरोधातील लढा’ आणि ‘हिंदू-मुस्लिम ऐक्य’ या गांधीजींच्या सामाजिक व राजकीय भूमिकांची दोन ठळक वैशिष्ट्ये होती. या जातिव्यवस्थेबाबत संघाचा नवा शोध तर अफलातूनच आहे. मोहन भागवत यानी अलीकडंच एका पुस्तक प्रकाशन समारंभात बोलताना प्रतिपादन केलं की, ‘देशात जातिव्यवस्थाच नव्हती. येथे फक्त ‘चातुर्वंशीय क्षत्रिय’ धर्म होता. जातिव्यवस्था येथे आक्रमण केलेल्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी आणली. त्यांनी भारतात आल्यावर समाजातील काही घटकांना गाई मारणं, चामडं कमावणं, साफसफाई करणं या कामांना जुंपलं. त्यातून आजच्या दलित जाती निर्माण झाल्या.’ भय्याजी जोशी व सुरेश
सोनी या संघाच्या इतर दोन उच्चतम नेत्यांनीही या समारंभात हेच सांगितलं. म्हणजे फुले, शाहू, आंबेडकर यांनी जे लिहून ठेवलं वा ते जे बोलले, ते सगळं गेलं कच-यात. हाच संघाचा संधिसाधूपणा मोदी यांच्या गांधी जयघोषामागं आहे. पण त्यानं आपणच छोटे होतो, हे संघाच्या लक्षात आलेलं दिसत नाही.
... कारण गांधीजींबद्दलचं आपलं खरं मत सांगण्याचा प्रामाणिकपणा संघाकडं नाही. त्यासाठी लागणारी वैचारिक धमकही ना मोदी यांच्यात आहे ना मोहन भागवत यांच्याकडं. गांधीजींचं नाव घेतल्याविना जगात वा भारतात मोदींना काही करता येत नाही, हेच तर खरं महात्माजींचं मोठेपण आहे.
ते खुलेपणानं मान्य करून, गांधीजींचा खून करण्याचा गुन्हा घडायला नको होता, तो करणा-या नथुरामाचा आम्ही निषेध करतो, असं म्हणण्याचा प्रामाणिकपणा मोदी यांच्यात नाही.
म्हणूनच त्यांचा गांधी जयघोष हे निव्वळ नाटक आहे.
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
prakaaaa@gmail.com