आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Narendra Modi By Bhimrao Bansod, Divya Marathi

मोदी गुरुजींचे सर्वसाधारण सल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या निमित्ताने देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी म्हणून एका मोठ्या देशव्यापी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यातून त्यांनी डिजिटल साधनांच्या साहाय्याने लाइव्ह पद्धतीने असा संवाद साधला. सुरुवातीला आपला काही मिनिटांचा सल्ला देऊन नंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याच्या पद्धतीने हा संवाद साधला. विद्यार्थ्यांना विचारायला लावलेले प्रश्न तसे साधेसुधेच असल्याने हा कार्यक्रम कोणालाच बोजड झाला नाही. दिल्ली येथील हॉलमध्ये उपस्थित असलेल्या तसेच देशभरातून विविध ठिकाणांहून ज्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला त्या विद्यार्थ्यांकडे बघता ते सर्व विद्यार्थी आर्थिक स्थिती उत्तम असलेल्या उच्चभ्रू वर्गातील होते. त्यांच्यासमोर उपस्थित असलेल्या व प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये अल्पसंख्याक असलेला एकही मुस्लिम विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी नव्हती, याचीही नोंद घ्यावी लागेल.

लोकसभा निवडणुकांपूर्वी देशभर फिरत असताना ज्याप्रमाणे त्यांनी लोकसंस्कृतीचा आदर करण्यासाठी त्या त्या राज्यातील विशिष्ट समुदायांच्या सार्वजनिक कार्यक्रमातून अनेक पगड्या आपल्या डोक्यावर ठेवल्या, टोप्या टाकल्या व फेटे बांधलेत; पण आग्रह करूनही मुस्लिमांची टोपी कधी परिधान केली नाही. हा जसा त्यांचा कट्टर मुस्लिमविरोध त्या वेळी लक्षात आला, तसाच मुस्लिम द्वेष याही कार्यक्रमातून लक्षात ठेवायला पाहिजे. अल्पसंख्याक ख्रिश्चन, दलित व आदिवासी, भटक्या-विमुक्तांचा कोणी विद्यार्थी त्या हॉलमध्ये अथवा प्रश्न विचारणाऱ्यांमध्ये होता काय याचाही शोध घ्यावा लागेल. जवळपास २५ ते ३० टक्के असलेल्या अल्पसंख्य समुदायाला बाजूला ठेवून ते ‘समर्थ भारत’ कसा बनवतील हे तेच जाणोत. असो.

देशाचे पंतप्रधान म्हणून केवळ नरेंद्र मोदींनीच असा संवाद साधला, अशातला भाग नाही. यापूर्वीचे पंतप्रधान राजीव गांधी यांनीही देशातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यांचाही विद्यार्थी वर्ग हा आताच्या पंतप्रधानासारखाच ‘डून स्कूल’मधलाच होता. त्यांचे आजोबा पंडित नेहरू हे तर विद्यार्थ्यांचे केवळ शिक्षक नव्हते, तर ते त्यांच्या कुटुंबीयांतील एक घटक म्हणूनच ‘चाचा नेहरू’ होते. त्यांच्या शेरवानीत खोवलेले गुलाबाचे ‘फूल’ म्हणजे जणू काही चाचा नेहरूंच्या ‘मुला’चेच प्रतीक मानले जात होते. तेव्हापासून तर आजपर्यंतच्या राज्यकर्त्यांनी घेतलेल्या धोरणामुळे मुलांच्या संगोपनापासून तर त्यांच्या शिक्षणापर्यंतची परिस्थिती अत्यंत विदारक आहे.
गोरगरीब, दलित-आदिवासी, भटक्या विमुक्तांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची काय परिस्थिती आहे? त्यांना अजूनही नीट वर्गखोल्या व वर्गशिक्षकही नाहीत. जे आहेत ते नीट शिकवतील अशी परिस्थिती नाही. त्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री नाही. त्यामुळे त्यांनी उघडलेल्या साखर शाळा असो, रात्रीच्या प्रौढ शाळा असो अथवा सर्व शिक्षा अभियान असो, सरकारच्या खालच्या वर्गाकडे पाहण्याच्या उपेक्षेच्या दृष्टिकोनामुळे या सर्व उपायांची वाट लागली आहे. परिणामी, बालमजुरांची, अशिक्षितांची व यातही मुलींची संख्या वाढली आहे. आता तर या केंद्र सरकारनेही कायम ठेवलेल्या नवीन आर्थिक व औद्योगिक धोरणाचा भाग म्हणून शासनाने करावयाच्या शिक्षणावरील खर्च कमी होत आहे. शिक्षण ही शासनाची जबाबदारी नसून पालकांनीच ती पार पाडावयाची आहे, असे याही सरकारचे ठाम मत आहे. त्यामुळे अशा विदारक परिस्थितीत आणखी वाढच होत जाणार आहे. तेव्हा बालकांच्या पालकांचीच परिस्थिती सुधारली नाही, तर विद्यार्थ्यांची परिस्थिती कशी सुधारेल? याचा उपाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या सल्ल्यात दिसत नाही.

त्यांनी दिलेले सल्ले हे सर्वसाधारण आहेत. जसे विद्यार्थ्यांनीही वीज आणि पाण्याची बचत करावी, आपल्या परिसरात निदान एक रोपटे तरी लावावे, म्हणजे पर्यावरणाचा तोल सांभाळला जाईल, यामुळेही देशसेवा होऊ शकते, अभ्यासक्रमाशिवाय अवांतरही वाचन करावे, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत, नुसती डिग्री घेण्याऐवजी रोजगाराभिमुख शिक्षण घ्यावे, हे सल्ले म्हणून तर ठीक आहे; पण त्यांनी सांगितलेला ‘स्वच्छ भारत- स्वच्छ विद्यालय’ होईल कसे? त्यांचे अनुदान बंद करून? मुलींना शाळेत शौचालय पाहिजेत हे त्यांचे म्हणणे खरे आहे; पण ते बांधणार कोण? आणि असे शौचालय काय मुलांना नकोत? पण ज्या शाळांतून विद्यार्थ्यांनाच काय; पण शिक्षक-शिक्षिकांना व इतर स्टाफलाही ही सोय उपलब्ध नसते तेथे विद्यार्थ्यांना या सोयी कोण देणार? देशाचे पंतप्रधान, शासनाचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून ते याबाबतीत काय करणार आहेत, याचा कोणताही विचार त्यांनी या संवादातून मांडला नाही.

विद्यार्थ्यांनी आपल्या घरी येणारे १०० रुपये, ५० रुपये विजेचे बिल १०-५ रुपयांनी कमी कसे करता येईल याबाबत आपल्या पालकांशी संवाद साधण्याचाही सल्ला त्यांनी दिला. खरे म्हणजे ते ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते, त्यांच्याकडे इतके कमी बिल येऊच शकत नाही. साध्या कनिष्ठ मध्यम वर्गालाही किमान ५०० रुपयांच्या पुढेच आजकाल विजेचे बिल येत आहे. यावरून त्यांचा या खालच्या वर्गाशी व सतत वाढणाऱ्या वीज दरांशी काहीच संबंध नाही हे दिसून येते. त्यांच्यासमोर असलेल्या विद्यार्थ्यांनी सूर्योदय व सूर्यास्त पाहिला नसेल, म्हणून तो पाहावा असा सल्ला देत असतानाच पौर्णिमेच्या चांदण्या रात्री आपल्या घरातील तसेच रस्त्यावरील दिवे बंद करायचे सांगून चंद्रप्रकाशाचा आस्वाद घ्यावा, असेही त्यांनी सुचवले. इतकेच नव्हे, तर त्याच प्रकाशात सुईत दोरा ओवण्याच्या स्पर्धाही आयोजित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. गंमत म्हणून हे ठीक आहे; पण ज्या ग्रामीण भागातून पौर्णिमेच्या रात्रीच नव्हे, तर अमावास्येच्या दिवशीही लोडशेडिंग असते, त्या ग्रामीण जनतेला मात्र हा सल्ला हास्यास्पदच वाटेल. वीज टंचाईची परिस्थिती केवळ राज्यात नव्हे, तर देशभरच आहे. तेव्हा देशातील सर्वच शहरांतील मोठमोठ्या दुकानांतून, शॉपिंग मॉल्स व कॉम्प्लेक्समधून, आपल्या मालाच्या व दुकानाच्या जाहिरातीसाठी निऑन बल्बमधून वीज वापरणाऱ्यांना, ऐन वीज टंचाईतही रात्रीच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणाऱ्या क्रिकेट संघाला त्यांनी वीज बचतीचा हा सल्ला दिला असता, तर त्यांच्यासमोर बसलेल्या विद्यार्थ्यांनाही तो निश्चितच पटला असता.

एवढ्या मोठ्या देशव्यापी कार्यक्रमाचे नियोजन हे करावेच लागते. ते त्यांच्या टीमने केले हे बरेच झाले, अन्यथा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या काळात राष्ट्रपती झालेल्या अब्दुल कलाम यांनीही काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी असाच संवाद साधला असताना एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न केला की, ‘तुम्ही फार मोठे शास्त्रज्ञ आहात हे मला माहीत आहे. तुम्ही पोखरणच्या वाळवंटात भारतीय अणुबाॅम्बचा स्फोट यशस्वीपणे घडवून आणलात, याबद्दल तुमची खूप वाहवा केली जाते; पण मी विचार केला की, अणुबाॅम्बने तर मानव व इतर जीिवतांची, निसर्ग व पर्यावरणाची हानीच होते. तुम्ही जर खरोखरच महान शास्त्रज्ञ आहात, तर मग संपूर्ण मानवजातीला उपयुक्त होईल असा एखादा शोध अजूनपर्यंत का बरे लावला नाही? विद्यार्थ्याच्या या प्रश्नावर राष्ट्रपती अब्दुल कलाम निरुत्तर झाले. तशी निरुत्तर होण्याची वेळ मोदी गुरुजींवर आली नाही, हे बरेच झाले.
लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.
bhimraobansod@gmail.com