आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Narendra Modi Leadership In BJP By Akar Patel, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप नेतृत्व चिंतेत का नाही?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजपवरची पकड आणि त्यांचा मतदारांवरील प्रभाव हा या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीशी या पोटनिवडणुकांची तुलना झाली असली तरी भाजपने विधानसभेच्या ३३ जागांपैकी सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. इतर पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या तुलनेत ही संख्या जास्तच आहे. भाजपने उत्तर प्रदेशात ११ पैकी ३, गुजरातमध्ये ९ पैकी ६, राजस्थानमध्ये ४ पैकी १ तसेच पश्चिम बंगाल आणि आसाम राज्यातील एक-एक जागाही जिंकली. तरीही पक्षाचा पराभव झाला, अशी भावना निर्माण झाली.
"हिंदू' या दैनिकामधील विश्लेषणात असे म्हटले आहे की, भाजपची हार ही भारतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या ट्रेंडला विरोध दर्शवणारी होती. काँग्रेस आणि मित्रपक्षांनी २००४, २००९ नंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत ‘ते सत्तेत असलेल्या राज्यांत जवळपास दोन तृतीयांश आणि चार पंचमांश जागा जिंकल्या.’ याव्यतिरिक्त ‘या पोटनिवडणुकीतील भाजपचा सर्व राज्यांतील मतांचा हिस्सा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी झाला आहे.’ पण भाजपची गती मंदावली आहे, हे या पक्षासाठी अधिक काळजीचे कारण असू शकते. कारण भाजपने पोटनिवडणुकीत वाईट कामगिरी केल्याची ही काही पहिली वेळ नाही. आधीच्या दोन पोटनिवडणुकीतही भाजपची कामगिरी नेहमीपेक्षा वाईट होती.
माझ्या मते भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाला याची फारशी चिंता नाही. याचे कारण मी नंतर स्पष्ट करेन. निकालावर भाष्य करायचे तर उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव, ज्यांच्यावर माध्यमे कायम टीका करत असतात. ते म्हणाले की, त्यांचा विजय भाजपच्या नकारात्मक धोरणांमुळे झाला. भाजपची उत्तर प्रदेशमधील टीम कायम "लव्ह जिहाद' या विषयावर बोलत होती, ज्याचा अर्थ मुस्लिम पुरुषांनी हिंदू मुलींना भुरळ घालणे असा होतो. या कृतीचा उद्देश त्या मुलींचे धर्मांतर हा आहे.
तशी काही उदाहरणे प्रत्यक्षात दाखवण्यात आली, पण त्या उदाहरणांना पूरक माहिती अपेक्षित होती, जी त्यांच्याकडे नव्हती. मतदारांसाठी ही अनुनाद नसलेली कथा होती आणि भाजपने याला जितके महत्त्व दिले तितके द्यायला नको होते. पण भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीमागे हेच खरे कारण आहे का? मला तसे वाटत नाही. कारण नकारात्मक मते मिळाल्याचे दिसले नाही.
उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख पक्षांपैकी एक पक्ष, मायावतीचा बसपा, तटस्थ राहिला आणि त्या पक्षाने निवडणूक लढवली नाही. विश्लेषण असे दर्शवते की, भाजपचा मतांचा हिस्सा ५ टक्के वाढला. याचाच अर्थ बसपाच्या काही मतदारांनी हिंदुत्ववादी पक्षाला मते दिली.
भाजपच्या पराभवाचे खापर "लव्ह जिहाद' कॅम्पेनवर फोडताना काँग्रेसचे शकील अहमद म्हणाले, ‘भाजपच्या तिरस्काराच्या धोरणाला मिळालेला हा नकार आहे.’ मतांची आकडेवारी मात्र असे दर्शवत नाही.
भाजपचा पूर्ण पराभव झाला असे एक राज्य म्हणजे राजस्थान. भाजपने मोदींच्या कॅम्पेनमुळे लोकसभेच्या सगळ्या जागा जिंकल्या आणि यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीतील हार(४ पैकी ३ जागा ते हरले) संकट समजले गेले. कारण राजस्थानमध्ये कायम भाजप-काँग्रेस अशी द्विपक्षीय लढत पहिली गेली आहे. ही पोटनिवडणूक दीर्घकालीन किंवा
मध्यमकालीन ट्रेन्ड दर्शवत नाही.
ज्या गुजरातचे मोदींनी १२ वर्षे संगोपन केले, त्या गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात ट्रेन्ड नव्हता. भाजपने ९ पैकी ६ जागा जिंकल्या. यावरून काँग्रेस या द्विपक्षीय राज्यात निष्प्रभ असल्याचे दिसते. सगळ्यात शेवटी काँग्रेसला १९८५ मध्ये तिथे बहुमत मिळाले होते.
पश्चिम बंगालमध्ये भाजपने एक जागा जिंकली, मित्रपक्षाच्या मदतीशिवाय पहिल्यांदाच. ते दुस-या स्थानावर आले. त्यांनी दोन्ही जागांवर डावे पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांपेक्षा जास्त मते मिळवली. भारताच्या सर्वात मोठ्या राज्यांपैकी एका राज्यातील ही चांगली खेळी मानता येईल. या उदयामागे मोदींची लोकप्रियता हे कारण आहे.
एकूण मोदींसाठी व्यक्तिशः हा निकाल वाईट नाही. त्यांच्या अनुपस्थितीत (त्यांनी पोटनिवडणुकीसाठी प्रचार केला नाही) पक्षाने असमाधानकारक कामगिरी केली असल्याचे त्यांच्या निरीक्षणात येईल. त्यांचे अस्तित्व आणि नेतृत्व यामुळे विजयासाठी आवश्यक मते मिळाली. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला चमत्कृतिजन्य विजय मिळाला याचे श्रेय मोदी करिष्मा आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या संघटन आणि लोकांना एकत्र आणण्याच्या कौशल्याला दिले जाते. पोटनिवडणुकीतील पराभव हे सिद्ध करतो की मोदींचा सहभाग हा शहा यांच्या सहभागापेक्षा महत्त्वाचा आहे. मोदी जेव्हा युद्धभूमीत उतरतात तेव्हाच भाजपची खरी ताकद पाहायला मिळते. महाराष्ट्रातील आगामी निवडणूक हे सिद्ध करेल.
त्या राज्यात भाजपचा जुना आणि महत्त्वाचा मित्रपक्ष हा जागावाटपाच्या बाबतीत हट्टी आहे. जे आता सवयीचे झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सेनेची भूमिका महत्त्वाची, तर लोकसभेत भाजपची. याबाबतीत गेली २० वर्षे ठाकरे आग्रही आहेत. प्रत्येक वेळी प्रमोद महाजन (जे त्यांच्या भावाने त्यांचा खून करेपर्यंत ठाक-यांना सांभाळून चालत होते) सेनेशी वाटाघाटी करायचे आणि माध्यमांमध्ये ते असमाधानी असल्याच्या बातम्या असत. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी मित्रपक्षातील मायावती यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेपेक्षा भाजप जास्त लोकप्रिय आहे हे सत्य कोणी नाकारू शकत नाही. तो केवळ प्रादेशिक पक्ष असून काही पॉकेट्समध्येच प्रभावी आहे. दरवेळेप्रमाणे या वेळीसुद्धा हिंदुत्ववादी युती तडजोड करून तोडगा काढेलच. काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जशी एकमेकांची गरज आहे तशी यांनाही महाराष्ट्रात आहे. युती करण्यामध्ये देशात भाजपसारखा लवचिक पक्ष नाही. या वेळी नाही जमले तरी पुढच्या वेळी मात्र भाजप एक मोठा मित्रपक्ष म्हणून उदयाला येईल.
एक गोष्ट नक्की : जिथून पक्षासाठी मोठ्या प्रमाणात फंड पाठवला जातो, त्या महाराष्ट्रात काँग्रेस हरणार आहे. फक्त राजकीयदृष्ट्या नव्हे, तर आर्थिकदृष्ट्यासुद्धा गांधी परिवाराला आणि त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसणार आहे. असे जेव्हा घडेल तेव्हा राजस्थानच्या छोट्या विजयाचा अत्यानंद संपून जाईल.