आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Narendra Modi's Independence Day Speech By Prashant Dixit, Divya Marathi

मोदींचे बौद्धिक : चमकदार भाषा, निसटलेले मुद्दे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणाचे कौतुक करताना त्यातील महत्त्वाच्या त्रुटींकडेही लक्ष गेले पाहिजे. मोदी आता पंतप्रधान असल्यामुळे आता त्यांनी प्रेरणादायी भाषणे करू नयेत अशी अपेक्षा होती. प्रेरणादायी वक्तृत्वाने श्रोते भारावून जात असले तरी प्रत्यक्ष हाती काही लागत नाही असा अनुभव येतो. उत्तम प्रवचन करता आले की काम झाले असे भारतात दुर्दैवाने समजतात. निष्काम कर्मावर बोलणारे गावोगाव भेटतात, पण प्रत्यक्षात तसे काम करणारा विरळा. किंबहुना अशा व्यक्ती भारतापेक्षा पाश्चात्त्य देशांत अधिक आढळतील. घोषणांचा सुकाळ पण कामाचा दुष्काळ ही भारताची वास्तवता. शतकानुशतके त्यात फरक पडलेला नाही.

मोदींचे लाल किल्ल्यावरील भाषणही त्या चरकात सापडण्याची दाट शक्यता आहे. ते लोकांना आवडणारे आहे. त्यातील काही मुद्दे लोकांना भिडणारे आहेत. मोदींचे भाषण हा एक सैद्धांतिक रोड मॅप आहे. अन्य पंतप्रधानांचे रोड मॅप व मोदींचा रोड मॅप यामध्ये फरक आहे. हा रोड मॅप लोकांच्या आवाक्यातील आहे. कार्यकर्ता म्हणून काम करून पंतप्रधानपदावर बसणारी पहिली व्यक्ती हे मोदींचे वैशिष्ट्य. ते भाषणात दिसते.
लालबहादूर शास्त्री व देवेगौडा वगळता आजपर्यंतच्या अन्य पंतप्रधानांची कारकीर्द मुख्यत: नेते म्हणूनच आकाराला आली. हे नेते लोकप्रिय होते, पण सामान्य लोकांतून आलेले नव्हते. शास्त्रींचे तसे नव्हते. म्हणून जय जवान, जय किसान अशी अस्सल भारतीयाला भावेल अशी घोषणा त्यांच्याकडून दिली गेली. या घोषणेचा प्रभाव अजूनही आहे. दुर्दैवाने शास्त्रींना अल्प काळ मिळाला. त्यांना अधिक काळ मिळता तर भारताची प्रगती वेगळ्या दिशेने व अधिक भरीव झाली असती, असे त्यांच्या कारभाराचा अभ्यास करणारे सांगतात. देवेगौडा हे अपघाताने पंतप्रधान झाले व हरदनहळ्ळी या आपल्या गावाच्या पलीकडे त्यांच्या कारभाराची व बुद्धीचीही मजल गेली नाही. मोदींचे तसे नाही. सामान्यातून त्यांची वाटचाल झालेली आहे व त्याबद्दल त्यांना कॉम्प्लेक्स नाही. तसाच हिंदू संस्काराबद्दलही नाही. नेपाळमध्ये पशुपतिनाथाची उघड पूजा करण्यात त्यांना संकोच वाटला नाही. दिल्लीच्या बुद्धिवंतांच्या वर्तुळात आपली ऊठबस नाही याचा ते तिरकस उल्लेख करतात. मात्र त्याबद्दल त्यांना खंत वाटत नाही.

हिंदू संस्कार व सामान्य जनतेमध्ये कार्यकर्ता म्हणून केलेले काम याचबरोबर महात्मा गांधींचा त्यांच्यावर प्रभाव जाणवतो. हा प्रभाव विचारांचा अजिबात नसून लोकांना कार्यक्रम देण्यातील महात्मा गांधींच्या कौशल्याचा आहे. लहानसहान कार्यक्रमांतून लोकांना गुंतवून ठेवण्याची कला गांधीजींना अवगत होती. मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातील काही मुद्दे हे गांधीजींच्या कौशल्याची आठवण करून देणारे आहेत. मुलींसाठी शौचालये उभारणे, लोकप्रतिनिधींनी गावे दत्तक घेणे, आईवडिलांनी मुलांवर संस्कार करणे, गर्भपात करू नका असे आवाहन डॉक्टरांना करणे, या उपाययोजनांमध्ये कुठेतरी गांधी डोकावतात. अर्थात असे उपाय सुचवण्यामागे माणूस घडवणे हे महात्मा गांधींचे मुख्य ध्येय होते. असे ध्येय मोदींकडे असण्याची शक्यताही नाही. ही नक्कल असली तरी अशा नकलीचाही देशाला उपयोग होऊ शकतो.

गांधींचे व्यवस्थापकीय कौशल्य मोदींना आवडत असले तरी गांधी विचारापासून ते दूर असल्याने त्यांनी तंत्रज्ञानाला महत्त्व दिले आहे. कम, मेक इन इंडिया ही घोषणा त्यातून आली. देशात रोजगार वाढायचा असेल तर परदेशी कंपन्यांना इथे आमंंत्रण देण्यावाचून गत्यंतर नाही हे चीनच्या फार पूर्वीच लक्षात आले. त्यानुसार चीनमध्ये 80च्या दशकापासून अमेरिकी कंपन्यांना लाल पायघड्या घालण्यात आल्या. त्यातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला. कोट्यवधी लोक गरिबीतून मध्यमवर्गात चढले. चीनकडे स्वत:चे तंत्रज्ञान नव्हते, पण मनुष्यबळ होते. मनुष्यबळ हे भांडवल म्हणून वापरून चीनने अमेरिकी भांडवलदारांना आकर्षित केले. हे धोरण इतक्या प्रभावीपणे वापरले गेले की बेकारीची समस्या अमेरिकेत उभी राहिली. तंत्रज्ञान हाती नसेल तर उत्पादनात मदत करूया. त्यातून मिळालेल्या पैशातून आपले तंत्रज्ञान उभे करूया, असे धोरण डेंग यांनी मांडले. कम, मेक इन इंडिया या घोषणेतून मोदी इथे डेंगची नक्कल करीत आहेत.
मात्र एका फार मोठ्या मर्यादेकडे मोदींचे दुर्लक्ष झाले आहे. महात्मा गांधी व डेंग यांनी धोरणे नुसती आखली नाहीत वा सांगितली नाहीत, तर ती राबवली. क्वचितप्रसंगी कठोरपणे राबवली. धोरणे राबवण्याबाबत दोघांचीही पद्धत वेगळी होती.
महात्मा गांधी आपल्या आदर्शवत आचरणाने तसेच मौन, उपवास अशा उपायांनी प्रसंगी जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस अशांना नमते घेण्यास भाग पाडत. त्यांच्या नैतिक आचरणाचा दबदबा लोकांवर थेट परिणाम करीत असे. उच्च नैतिक आदर्श राबवण्यासाठी स्वत:वर कठोर निर्बंध घालून घेण्यास ते कचरत नसत. नैतिक दबावाचे ते राजकारण होते. याचा प्रभाव इतका असे की सशस्त्र क्रांतीसाठी धाडसाने काम करणा-या सेनापती बापटांनाही हाती झाडू धरण्याची लाज वाटली नव्हती. असा नैतिक दबदबा मोदी कधीच निर्माण करू शकणार नाहीत.
डेंग यांनी असे न करता प्रशासकीय सुधारणांचा मार्ग निवडला. सुस्त व भ्रष्ट नोकरशाहीला त्यांनी वठणीवर आणले. पोथीनिष्ठतेमध्ये अडकलेल्या पक्षाच्या नेत्यांना साम, दाम, दंड अशा सर्व मार्गांचा वापर करून सरळ केले. विकासाला गती देणारा भ्रष्ट अधिकारीही मला चालेल, अशी स्वच्छ व्यावहारिक भूमिका घेतली. नैतिक पेचात डेंग कधी अडकले नाहीत व लोकांनाही अडकू दिले नाही. आधी काही लोकांना श्रीमंत होऊ द्या, असे सांगताना त्यांनी असंख्य गरिबांवर त्या वेळी होत असलेल्या अन्यायाकडे कानाडोळा केला. हुकूमशाही, दबावतंत्र कठोरपणे चालवले. मात्र देशात पैसा भरपूर येईल व तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याकडेही लक्ष दिले. यात मुख्य भर प्रशासकीय, न्यायिक व आर्थिक सुधारणांवर होता.

मोदी याबद्दल बोलले नाहीत ही त्यांच्या भाषणातील मोठी त्रुटी आहे. प्रशासन, न्यायव्यवस्था व पोलिस या क्षेत्रांत त्वरेने सुधारणा होण्याची, ही तिन्ही क्षेत्रे गतिमान व भ्रष्टाचारमुक्त होण्याची आत्यंतिक गरज भारताला आहे. तसे करण्यासाठी काय करणार हे मोदींनी सांगायला हवे होते. मेक इन इंडिया असे ते सांगतात किंवा आयात होणारी एखादी तरी वस्तू येथे बनवा असे आवाहन उद्योजकांना करतात. पण हे करीत असताना उद्योजकांसमोरच्या अडचणींची दखल घेत नाहीत. सुस्त व भ्रष्ट प्रशासन हे भारताचे जुने दुखणे आहे. कणखर, गतिमान प्रशासनाची परंपरा भारतात नाही. हा गुण भारतात आणण्याचा एकमेव प्रयत्न शिवछत्रपतींनी केला. नैतिक दबाव हा व्यक्तीपुरता मर्यादित असतो. मात्र कार्यक्षमतेची सवय प्रशासनाला पडली की त्याचे फायदे देशाला दीर्घकालपर्यंत मिळतात. जर्मनी, चीन, अमेरिका, युद्धपूर्वकाळातील ब्रिटन ही त्याची उदाहरणे. कार्यक्षम, गतिमान प्रशासन व न्यायव्यवस्थेचा पाया नसताना केलेल्या घोषणा वा आवाहने ही फसवी असतात. या सुधारणा झाल्या नाहीत तर मोदींचे भाषण हे फसवे संघीय बौद्धिक ठरेल.
prashant.dixit@dbcorp.com