आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नौदलाचा दरारा वाढणार...!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या राष्ट्रहिताचा विस्तार संपूर्ण हिंदी महासागरावर झालेला आहे. अशा परिस्थितीत भारतासमोर आपल्या नौदलाची शक्ती वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सागरी पृष्ठभागावर आणि त्याखाली, जमिनीवर, आकाश व अवकाशातही नौदलाची क्षमता वाढविण्यास भारताने सुरुवात केलेली आहे. अलीकडेच मुंबईतील माझगाव गोदीत ‘आयएनएस विशाखापट्टणम' या स्वदेशी अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिकेचे झालेले जलावतरण भारतीय नौदलाच्या सक्षमीकरणाच्या दिशेने पडलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. सन २०१८ मध्ये ही विनाशिका भारतीय नौदलात सामील होईल, तेव्हा ती भारतीय नौदलाची सर्वात अत्याधुनिक आणि हिंदी महासागरातील सर्वात शक्तिशाली विनाशिका असेल.
भारतीय नौदलासाठी ‘प्रोजेक्ट-१५ बी’ अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञान व आरेखनावर आधारित अत्याधुनिक स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत. सध्या पूर्णत्वाकडे निघालेल्या ‘प्रोजेक्ट-१५ ए’चा तो पुढचा टप्पा आहे. भारतात बांधण्यात आलेल्या त्या आजपर्यंतच्या सर्वात अत्याधुनिक विनाशिका असणार आहेत. या युद्धनौकांची प्रत्यक्ष बांधणी सुरू होऊन साधारण दीड वर्ष झाले आहे. या प्रकल्पावर काम करणा-या अधिका-यांकडून आता सांगितले जात आहे की, आधीच्या ‘प्रोजेक्ट-१५ ए’ प्रकल्पापेक्षा ‘प्रोजेक्ट-१५ बी’ कमी वेळात पूर्ण होईल. त्यासाठी या विनाशिकेचे जलावतरण वेळेच्या सुमारे चार महिने आधी झाल्याच्या बाबीकडे ते लक्ष वेधत आहेत, तरीही दरम्यानच्या काळात या प्रकल्पात अडथळे येणार नाहीत आणि या कामाचा वेग टिकून राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे. शीतयुद्धोत्तर काळात बदललेली सुरक्षाविषयक समीकरणे, भारताने स्वीकारलेली खुली अर्थव्यवस्था आणि त्यामुळे सागरी व्यापारीमार्ग तसेच सागरी संपत्तीचे प्रभावीपणे संरक्षण करण्याची वाढलेली नितांत आवश्यकता अशा पार्श्वभूमीवर नौदलाच्या वाढलेल्या गरजा विचारात घेऊन नव्वदच्या दशकात स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक विनाशिका बांधण्यासाठी ‘प्रोजेक्ट-१५’ हाती घेण्यात आला होता. त्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या दिल्ली, मुंबई आणि म्हैसूर या गायडेड मिसाइल विनाशिकांच्या आरेखनाने आणि कार्यक्षमतेने जगातील अनेक नाविकतज्ज्ञ प्रभावित झाले होते. त्या विनाशिकांची कामगिरी विचारात घेऊन आणि भविष्यातील आव्हानांचा विचार करून पुढे त्याच आरेखनावर आधारित पण स्टेल्थ विनाशिका बांधण्याची मागणी नौदलाने केली होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी ‘प्रोजेक्ट-१५ ए’ हाती घेण्यात आला. याद्वारे कोलकाता, कोची आणि चेन्नई येथे या स्टेल्थ विनाशिका बांधल्या जात आहेत.
‘प्रोजेक्ट-१५ ए’मधील विनाशिकांच्या अनुभवाच्या आधारावर अशा प्रकारच्या आणखी चार विनाशिकांची बांधणी करण्याला (प्रोजेक्ट-१५ बी) संरक्षण मंत्रालयाने २०११मध्ये मान्यता दिली होती. सन २०१३मध्ये ‘प्रोजेक्ट-१५ ए’मधील सर्व विनाशिकांचे गोदीतील मुख्य काम संपल्यावर नव्या ‘प्रोजेक्ट-१५ बी’मधील विनाशिकांची बांधणी सुरू करण्यात आली. कोलकाता श्रेणीतील विनाशिकांच्या आरेखनात आणखी काही सुधारणा करून आणि त्यात आणखी काही वैशिष्ट्यांचा समावेश करून ‘प्रोजेक्ट-१५ बी’ तयार करण्यात आला आहे. यातील पहिल्या विनाशिकेचे आयएनएस विशाखापट्टणम असे नामकरण करण्यात आले आहे. या ‘प्रोजेक्ट-१५ बी’द्वारे बांधल्या जात असलेल्या युद्धनौका भारतीय नौदलातील आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या विनाशिका असणार आहेत.
‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील युद्धनौकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या नव्या वैशिष्ट्यांपैकी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यावर बसविण्यात येणारे निर्भय हे स्वदेशी बनावटीचे सब-सॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र. एक हजार किलोमीटर दूरच्या लक्ष्यावर मारा करू शकणारे हे क्षेपणास्त्र असून सध्या त्याचा विकास करण्यात येत आहे. सन २०१४ मध्ये त्याची पहिली यशस्वी चाचणी पार पडली आहे. याबरोबरच स्वनातीत (सुपरसॉनिक) ब्रह्मोस क्षेपणास्त्रही ‘प्रोजेक्ट-१५ बी’मधील युद्धनौकांवर बसविण्यात येणार आहे. या दोन क्षेपणास्त्रांमुळे समुद्रात संचार करत असताना शत्रुच्या भूमीवरील लक्ष्यांचा व युद्धनौकांचा प्रभावीपणे वेध घेणे शक्य होणार आहे. या विनाशिकांवरील अशीच अन्य काही शस्त्रसामग्री आणि दळणवळण यंत्रणांमुळे भारतीय नौदलाचा निळ्या पाण्यावरील दरारा वाढण्यास मदत होणार आहे. ‘विशाखापट्टणम’ श्रेणीतील युद्धनौका ७३०० टन वजनाच्या असणार आहेत. ताशी ३० सागरी मैल किंवा ५६ किलोमीटर वेगाने या युद्धनौका समुद्रात संचार करू शकणार आहेत. समुद्रात दूरवर टेहळणी, पाणबुडीविरोधी कारवाई, मदत आणि बचाव अशा विविध मोहिमांसाठी यातील प्रत्येक युद्धनौकेवर दोन सी-किंग, ध्रुव किंवा कामोव्ह-३१ ही हेलिकॉप्टर ठेवण्याची सोय करण्यात येत आहे. माेहिमेच्या आवश्यकतेनुसार दोन वेगवेगळ्या प्रकारचे हेलिकॉप्टर्सही यावर ठेवता येतात. या हेलिकॉप्टरच्या उड्डाण व उतरण्यासाठी युद्धनौकेच्या मागील बाजूला हेलिपॅड तयार करण्यात येणार आहेत. त्याच्याच पुढे हेलिकॉप्टरच्या देखभाल व दुरुस्तीसाठी हँगरही यावर असेल. तसेच युद्धनौकेच्या दिशेने येत असलेल्या हवेतील लक्ष्याचा १०० किलोमीटर दूरवरूनच शोध घेऊन त्यावर हल्ला करण्यासाठी बराक-८ ही क्षेपणास्त्रे ‘विशाखापट्टणम’वर बसविण्यात येणार आहेत.
आपले सामरिक सामर्थ्य सिद्ध केलेल्या भारतीय नौदलाला एकीकडे साधनांची आणि मनुष्यबळाची कमतरता भासत असतानाच त्याचा प्रत्येक प्रकल्प रखडत चालला आहे. त्याचा नौदलाच्या तयारीवर विपरीत परिणाम होत आहे. सध्या पी-१५ बी मधील चार युद्धनौकांसाठीचे शाफ्ट रशियाकडून तयार करून घेण्यात येत आहेत. रशियाकडून शाफ्ट मिळू लागतील, तसे ते या युद्धनौकांमध्ये बसविण्यात येणार आहेत. १९८०च्या दशकापासून भारताने युद्धनौका बांधणीच्या क्षेत्रात स्वदेशीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यास सुरुवात केली. त्याची फळे भारतीय नौदलाला मिळू लागली आहेत. दिल्ली, कोलकाता, शिवालिक, विक्रांत, कामोर्टा अशा श्रेणींच्या महत्त्वाच्या आणि अत्याधुनिक युद्धनौकांची स्वदेशातच आरेखन व बांधणी करून या क्षेत्रातील आपल्या परंपरागत कौशल्याचे जगाला पुन्हा एकदा प्रदर्शन घडविण्यास सुरुवात केलेली आहे. ‘आयएनएस विशाखापट्टणम’ हे त्याचेच आणखी एक उदाहरण आहे.
Parag12951@gmail.com
बातम्या आणखी आहेत...