आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नितीन गडकरी यांचा आशावाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी महाराष्ट्रात अनेक कार्यक्रमांना हजेरी लावून अनेक घोषणा केल्या, त्यात देशाचा विकासदर आठ टक्क्यांवर नेऊ, या आशावादाचाही समावेश आहे. चार ते पाचच्या दरम्यान फिरणारा गेल्या दशकातील निचांकी विकासदर आठ टक्क्यांवर नेणे, ही सोपी गोष्ट नाही. मात्र त्यासाठी सत्तारूढ भारतीय जनता पक्षाला वादग्रस्त विषय बाजूला ठेवून विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
निवडणूक प्रचार सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यावर भर दिला होता आणि आता तो शब्द त्यांनी पाळावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. गडकरी यांनी महाराष्ट्राच्या दौ-यात ज्या महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत, त्यात भविष्यात सर्व रस्ते सिमेंटचे करणे, पालखी रस्त्याचे चौपदरीकरण, गुजरातप्रमाणे महाराष्ट्रात बसपोर्ट तयार करणार, नवा परिवहन कायदा येत्या अधिवेशनात मांडणार, पेट्रोल, डिझेलवरील खर्च वाचवण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढवणार आणि मुंबई- शिर्डी विमानसेवा लवकरच सुरू करणार या घोषणांचा समावेश आहे. कल्याण – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.
महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाचे काम आता वेगाने पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. रस्त्यांची आणि पुलांची कामे धडाक्याने करणारे मंत्री म्हणून गडकरी यांची ख्याती आहे. अर्थव्यवस्थेत रस्तेबांधणी ही पायाभूत उभारणी मानली जाते. पायाभूत सुविधा वाढल्याशिवाय विकासदर वाढत नाही, हे जाणूनच रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे धोरण सरकारने अवलंबलेले दिसते. मात्र दर्जाशी तडजोड करणा-यांना जमिनीत गाडून त्यावर बुलडोझर फिरवण्याची आणि सरकार व मंत्र्यांवर भरवसा ठेवू नका, असे सांगणे, हे केंद्रीय मंत्र्यांना न शोभणारे आहे. ज्यांना वकिासदर आठ टक्क्यांवर न्यायचा आहे, त्यांच्या तोंडातील ही भाषा या घोषणांची विश्वासार्हता कमी करणारी आहे.