आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकियावर आणखी एक गंडांतर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील अग्रगण्य मोबाइल निर्मिती करणा-या नोकिया या कंपनीने श्रीपेरुंबुदूर येथील आपल्या प्रकल्पातून मोबाइल संच निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने मेक इन इंडिया या योजनेअंतर्गत देशातील व विदेशातील उद्योगांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती तसेच कररचना उद्योजकांना अनुकूल होईल, असे आश्वासन दिले होते. ही घोषणा होऊन काही दिवस होत असताना नोकियाने असा तडकाफडकी प्रकल्प बंद करण्यामुळे देशातील उद्योग जगताला धक्का बसला आहे. हा प्रकल्प बंद होण्यामागे कंपनीतील काही समस्या कारणीभूत असल्याचे या खात्याच्या केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले असले तरी सरकार व नोकिया यांच्यातील करावरील संघर्षामुळे हा प्रकल्प गुंडाळण्याची वेळ नोकियावर आली आहे.
नोकियाचे म्हणणे आहे की, कर विभागाने कंपनीचे मोठ्या प्रमाणातील भांडवल रोखून धरले आहे. त्यामुळे व्यवसाय करण्यास कंपनीला ब-याच अडचणी येत आहेत, तर कर विभागाचे म्हणणे आहे की, नोकियाने विविध सॉफ्टवेअर उत्पादनांवरचा कर सरकारजमा केला नसल्याने कंपनीचे भांडवल रोखून धरण्याची वेळ आली. हे प्रकरण अधिक चिघळत गेल्यास नोकियाने आपला प्रकल्प पूर्णपणे बंद करण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे मायक्रोसॉफ्ट या कंपनीने नोकियाचे संच विकत घेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने नोकियाची कोंडी झाली आहे. श्रीपेरुंबुदूर प्रकल्पातून मायक्रोसॉफ्ट संच विकत घेत नाही, पण मायक्रोसॉफ्टच्या या निर्णयाने नोकियाच्या विपणन व्यवस्थेवर संकट आले आहे. या अगोदर भारतात देशी मोबाइल कंपन्या व सॅमसंग-अ‍ॅपल कंपन्यांनी नोकियाची मक्तेदारी मोडीत काढल्याने नोकियाचा व्यवसाय धोक्यात आला होता. नोकियाचे देशात काही ठिकाणी प्रकल्प आहेत, पण श्रीपेरुंबुदूर येथील प्रकल्पातून पश्चिम आशियातील देश, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडमध्ये मोबाइल विक्रीस पाठवले जात होते. हा सगळा विदेशी व्यापार एकाएकी बंद झाल्याची किंमत कंपनीसह सरकारलाही चुकती करावी लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पात सध्या ९०० हून अधिक कामगार असून त्यांच्यावर नोकरी गमावण्याची टांगती तलवार आहे.