आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Owaisi's Politics By Muzaffar Hussain

ओवेसींना वेसण कोण घालणार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महत्त्वाकांक्षा असणे चुकीचे नाही; पण एखाद्याने कोठून तरी हळदीचा तुकडा चोरून आणून किराणा दुकान थाटण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पदच. असे करणे कधीकधी आत्महत्याही ठरू शकते. हैदराबादचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे दु:साहस याच प्रकारात मोडणारे आहे. तरीही त्यांच्या तडफेची चर्चा करणे आणि त्यांच्या वाटचालीवर एक नजर टाकणे अप्रासंगिक होणार नाही.

देशातील सध्याच्या पिढीला हैदराबाद मुक्तिसंग्राम इतिहासाबद्दल तशी कमीच माहिती आहे. सरदार पटेल यांच्या पोलादी हातांनी धैर्याने आणि चतुराईने तत्कालीन हैदराबादच्या निझामाचे साम्राज्य भारतात विलीन करून जिनांचे दु:स्वप्न धुळीस मिळवले होते. हैदराबादच्या ओवेसींकडून सुरू असलेले फुटीर राजकारण समजून घ्यायचे असेल तर मुक्तिसंग्रामाचा इतिहास विसरून चालणार नाही. ओवेसी यांना समजून घेण्यासाठी हैदराबाद येथे जन्मलेला आणि वाढलेला मजलिसे इत्तिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) समजून घ्यावा लागेल. जिना यांच्या मुस्लिम लीगप्रमाणेच एमआयएमचा आधारही फक्त आणि फक्त मुसलमान मतदारच आहे.

भारतात वेळोवेळी मुस्लिमांच्या अनेक राजकीय आणि सामाजिक संघटना उभ्या झाल्या; पण त्यातील मुस्लिम लीग आणि मजलिसे इत्तिहादुल मुस्लिमीन आजही जिवंत आहेत. यांचे प्रभावक्षेत्र भले मर्यादित असेल, वेळ येताच हे पुन्हा सक्रिय होतात. आता मुंबई बाँबस्फोटातील दोषी याकूब याला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर ओवेसी यांनी फुत्कार सोडण्यास सुरुवात केली आहे. यानिमित्त ओवेसी यांनी फुटीरता आणि धर्मांधतेला खतपाणी घालणे सुरू केले आहे. या रणनीतीचा परिणाम लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पाहण्यास मिळत आहे. राजकारणात येऊन ओवेसी यांनी या खेपेला मुस्लिम मतदारांच्या बळावर फुटीर राजकारण करत मुस्लिम मतदारांच्या मनात व मेंदूत खळबळ माजवून दिली आहे.

देशातील काँग्रेस क्षीण होत असताना असदुद्दीन ओवेसी यांनी आपला डाव खेळण्यास सुरुवात केली आहे. केरळात कोया यांनी जो डाव साधला, त्याच मार्गाने जात आंध्र आणि आसपासच्या प्रदेशात ताकद वाढवण्याचा ओवेसींचा प्रयत्न आहे. गेल्या काही निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने त्यांचा उत्साह वाढला आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सत्तेत येणे मुसलमानांसाठी वरदान ठरले. कारण, पाकिस्तान बनल्यानंतर काँग्रेसच्या मागे जाण्याशिवाय मुसलमानांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. याचा पुरेपूर फायदा मुसलमानांना व्होट बँक बनवून काँग्रेसने घेतला. अगदी याच प्रकारे काँग्रेसचा पुरेपूर फायदा करून घेण्यात मुसलमानांनीही काही कसर सोडली नाही.

केरळमधील मुस्लिम लीग हा पक्ष देशाच्या फाळणीची आठवण करून देणारा एकमेव पक्ष होता; परंतु नंतरच्या काळात जिथे जिथे मुसलमान बहुसंख्येने आहेत त्या ठिकाणी ते आपले छोटे छोटे पक्ष बनवत राहिले. असदुद्दीन ओवेसी यांनी याचाच तर फायदा घेतला. भारतात जेव्हा जेव्हा काँग्रेस अडचणीत आला तेव्हा त्याला मुस्लिम मतदारांनी तारले. त्यामुळे मुस्लिम नेत्यांना आत्मविश्वास आहे की, वेळ येईल तेव्हा मुस्लिम पक्षांना सरकार बनवायचे असेल तर काँग्रेस पक्ष नक्कीच धावून येईल. त्यामुळे पुढील काळात सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस आणि मुस्लिम पक्षांमध्ये जवळीक पाहण्यास मिळाली तर आश्चर्य करण्याचे कारण नाही. केरळमध्ये मुस्लिम लीग हा पक्ष सत्तेत काँग्रेसचा भागीदार राहिला आहे. त्यामुळे कर्नाटकात गरज पडली तर ओवेसी यांच्या पक्षाला काँग्रेस पाठिंबा देणारच नाही, हे कशावरून? महाराष्ट्रात गरज लागेल तेव्हा काँग्रेस साथ देईल, याची ओवेसी यांना खात्री आहे. एकूणच काय तर सत्तेची चव चाखत राहण्यासाठी काँग्रेस ओवेसींचा लाभ घेईल आणि ओवेसी काँग्रेसचा. आगामी काळात जागोजागी हे चित्र पाहण्यास मिळू शकेल.

नरेंद्र मोदी यांच्या यशाने काँग्रेस आणि मुस्लिम दोघेही चिंतेत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि ओवेसी यांची आघाडी नाकारता येत नाही. त्यामुळे ओवेसी यांची घोडदौड गांभीर्याने घेणे प्रत्येक राष्ट्रवादी व्यक्तीसाठी आवश्यक बाब आहे. ओवेसी यांनी महाराष्ट्रात एक पाऊल पुढे टाकत आपल्यासोबत दलितांना घेण्याची रणनीती सुरू केली आहे. महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील महापालिका निवडणुकीत ओवेसी यांनी दलितांना हिंदू समाजापासून वेगळे करण्याची चाल खेळली आहे. याचा परिणामही पाहण्यास मिळत आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमने आपला झेंडा फडकवला आहे. एक जागा औरंगाबाद आणि एक नवी मुंबईतून खेचण्यात त्यांना यश आले आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी टक्कर देणे तशी सोपी गोष्ट नाही; पण महाराष्ट्रात मिळालेल्या यशाने ओवेसी यांचा उत्साह वाढला आहे. औरंगाबादच्या महापालिकेत ११३ पैकी २६ जागा ओवेसी यांच्या पक्षाने जिंकल्या. भाजपच्या पारड्यात २३ अन् सेनेच्या पारड्यात २८ जागा गेल्या. त्यामुळे ओवेसी यांनी महाराष्ट्राकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

आगामी काळात मुंबई, पुणे आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुका केवळ दोन वर्षांनी होणार आहेत. त्यामुळे ओवेसी वारंवार महाराष्ट्रात दिसत आहेत. ते आता हैदराबादेत कमी आणि मुंबईत जास्त दिसत आहेत. मागील महिन्यात रमजानच्या निमित्ताने इफ्तार पार्ट्या झडत होत्या. मुसलमानांना आकर्षित करण्यासाठीचा हा एक ड्रामा असतो. येथे धार्मिक गोष्टी कमी आणि राजकीय बांग अधिक दिली जात असते. रोजा सोडण्याच्या वेळी, संध्याकाळी राजकीय नेते मशिदींच्या जवळ घुटमळू लागतात. यामुळे मुस्लिम खुश होतील, असे त्यांना वाटते.
परंतु, कोणीही विचारी मुसलमान याची निंदाच करेल. रोजा ही एक आध्यात्मिक क्रिया असते. त्याला राजकीय हत्यार बनवणे योग्य ठरवता येत नाही. भारतात मोरारजीभाई यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी रमजानमध्ये इफ्तारचा पाखंड केला नाही. असो. पुढील काळात ओवेसी यांच्या धर्मांध पक्षाला वेसण घातली नाही तर भारतात फुटीरता आणि धर्मांधतेच्या राजकारणाला गती येईल, हे निश्चित.