आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On P. K. Anna Patil By Ramesh Dane, Divya Marathi

ख-या अर्थाने कर्तृत्ववान पुरुषोत्तम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत पी. के. अण्णा पाटील)
सर्वसामान्यांच्या जीवनात स्वाभिमानाने जगण्याची ऊर्मी निर्माण करणारे सहकार महर्षी पुरुषोत्तम काळू उपाख्य पी. के. अण्णा पाटील यांच्या निधनाने खान्देश एका सच्चा गांधीवादी व रचनात्मक कार्यावर प्रखर विश्वास असणा-या नेत्याला मुकला आहे. १९४२ च्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील अखेरचे स्वातंत्र्यसैनिक म्हणूनही त्यांचा उल्लेख करावा लागेल. पी. के. अण्णांच्या जाण्याने स्वातंत्र्यसंग्रामातील अखेरचा दुवा निखळला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकांना संघटित करून त्यांनी उत्तर महाराष्ट्राच्या एका कोप-यात असलेल्या शहादे तहसीलचा सर्वांगीण विकास घडवून आणला. साखर कारखाना व १३ बायप्रॉडक्टचे प्रकल्प, सूतगिरणी, स्टार्च प्रकल्प, दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बागायतदार संघ, सहकारी, मुद्रणालय, सहकारी औद्योगिक वसाहत, सहकारी बँक, शैक्षणिक संकुल या उभारणीसोबतच सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात घडवून आणले. गुर्जर समाजात हुंडाबंदी, विवाह समारंभातील अफाट खर्च, रूढी, परंपरा यावर पायबंद घातला. सामूहिक िशस्तीचे पर्व सुरू करून ते विस्तारले. या अभिसरणातून आगळी-वेगळी परंपरा शहादा-तकोदा-नंदुरबार परिसरात सुरू झाली. ती महाराष्ट्रात अन्यत्र कुठेही दिसणार नाही. शहाद्यातील पू. साने गुरुजींच्या नावाने असलेल्या शिक्षण संस्थेला गुर्जर व अनेक समाजांतील विवाहाप्रीत्यर्थ भरीव देणग्या या सामाजिक अभिसरणाची मोठी देण आहे. गेल्या २५ वर्षांपासून अशा प्रकारच्या देणग्या या संस्थेला मिळत आहेत. सामूहिक त्यागाचे हे मोठे उदाहरण म्हणावे लागेल.

तापी, गोमाई व आदिवासी भागातील देव नदीवर सातपुडा सहकारी साखर कारखाना पुरस्कृत सहकारी उपसा जलसिंचन याेजना आणून क्रांतिकारी कार्यक्रम राबवला. १९८० ते १९८५ या काळात असंख्य गावी पायपीट करून ४५ हजार एकर क्षेत्र पाण्याखाली आणले. दुष्काळग्रस्त २७ तालुक्यांपैकी एक असलेल्या शिंदखेडेचा त्यात समावेश आहे. ठिबक सिंचन, आधुनिक शेती, कमी उतारा असलेला प्रदेश असूनही हवामानावर मात करून जास्त उतारा देणा-या उसाच्या जाती त्यांनी विकसित केल्या. त्यासाठी प्रयोग केले. माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली. स्वत:ची इंडस्ट्री, स्वत:ची संस्था ही संकल्पना त्यांना माहीत नव्हती. जे जे काही उभारले ते लोकांच्या मालकीचे; त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य होते. सहकारावर त्यांची अढळ श्रद्धा होती. महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात चढउतार सुरू असताना त्यांनी सहकाराशी कुठेही तडतोड केली नाही. शिवाय सहकारावर निष्ठा असलेले असंख्य कार्यकर्ते तयार केले. प्रकल्प तर उभारलेच, परंतु कार्यकर्त्यांची फळीही उभारली. निरवानिरवीची वेळ येण्यापूर्वीच त्यांनी सर्व संस्था तरुणांच्या हाती सुपूर्द केल्या.
जुन्या व नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून संस्थांचा कारभार आज नीटस व पारदर्शीपणे सुरू आहे. एखाद्या नेत्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होते तशी या परिसरातील संस्थांच्या संदर्भात होणार नाही. आणीबाणीत पी.के.अण्णांनी काँग्रेस सोडून जनता पार्टीत प्रवेश केला. कालांतराने त्यांनी राज्याच्या जनता पक्षाचे नेतृत्व केले. एकत्रित धुळे जिल्ह्यात त्यांनी एवढा दरारा निर्माण केला की, काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात त्यांच्यासह ४ आमदार निवडून आले.
राजकीयदृष्ट्या हा सुवर्णकाळ होता. या काळाचा त्यांनी खुबीने विकासासाठी उपयोग करून घेतला. शहाद्यात १ जानेवारी १९८१ रोजी प्रदेश जनता पार्टीचे अधिवेशन त्यांनी आयाेजित केले होते. या अधिवेशनासाठी मोरारजी देसाई, चंद्रशेखर, रामकृष्ण हेगडे, प्रा. मधू दंडवते, नानासाहेब गोरे, ए. एस. अण्णा आवर्जून उपस्थित होते. शहाद्यात असंख्य नेत्यांचा राबता असायचा. जाॅर्ज फर्नांडिस, डाॅ. सुब्रम्हण्यम स्वामी, प्रमिलाताई दंडवते, डॉ. बापू काळदाते, राजारामबापू पाटील, भाई वैद्य, राजेश पायलट, प्रतापराव भाेसले, िवलासराव देशमुख, शरद पवार, शंकरराव चव्हाण, िशवाजीराव पाटील- िनलंगेकर, सुधाकर नाईक, डाॅ.रत्नाकर महाजन, बबनराव ढाकणे, बबनराव पाचपुते अशी िकतीतरी नावे घेता येतील. या सर्वांनी पी.के.अण्णांच्या कार्याचे जवळून अवलाेकन केलेले आहे. तीनवेळा आमदारकी त्यांना प्राप्त झाली. पराभवाचे चटकेही सहन केले. पण पराभवाने खचून न जाता प्रत्येकवेळी नव्या जाेमाने ते कामाला लागले. लाेकलेखा समितीचे अध्यक्षपद व महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे ३ वर्षे अध्यक्ष होते. या पलीकडे त्यांना सत्तेची पदे िमळू शकली नाहीत. जे िमळाले त्याचे त्यांनी साेने केले. एसटीचे अध्यक्ष असताना महामंडळ नफ्यात आणले. कर्मचारी आजही त्यांच्या कारकीर्दीची आठवण करतात.
शहाद्यात सूतगिरणी स्थापन करून महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेशपेक्षा क्विंटल मागे १०० रुपये अधिक भाव देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे जळगाव व धुळे िजल्ह्यांतून असंख्य शेतक-यांचा िवश्वास कमावला. या िगरणीचा िवस्तार केला. त्यातून कापड व गारमेंट उद्याेग काढून महिलांना माेठ्या प्रमाणावर राेजगार उपलब्ध करून देण्याची याेजना आखली होती. ती अपूर्ण राहिली आहे. शेतात जे जे पिकेल त्यावर प्रक्रिया करण्याचे, शेतक-यांच्याच मालकीचे प्रकल्प असावेत, असा ध्यास घेतलेला होता.

९ आॅक्टोबर १९२३ रोजी खेडेगावात जन्मलेल्या पुरुषोत्तमाने ख-या अर्थाने पुरुषोत्तम आपल्या कर्तृत्वाने साकार केला. खान्देशात १९२४ ते १९३० व त्यानंतर १९४२ पावेतो पू. साने गुरुजींचे वास्तव्य होते. गुरुजींच्या विचारांचा प्रभाव पूर्ण खान्देशवर होता. तसाच तो गांधीजींच्या स्वातंत्र्य आंदोलनाचाही होता. लहानपणीच या विचारांचे बाळकडू राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून पी.के. अण्णा पाटील यांना मिळाले. परिणामी स्वातंत्र्याच्या आंदोलनातही त्यांनी उडी घेतली. ९ सप्टेंबर १९४२ च्या शिरीषकुमार मेहताच्या नेतृत्वाखालील िमरवणुकीत ते होते. या मिरवणुकीवर इंग्रज पोलिसांनी बेछूट गोळ्या झाडल्या. यात शिरीषकुमारसह शशिधर केतकर, घनश्याम, धनसुख, लालदास हे सवंगडी शहीद झाले. पी.के.अण्णा पाटील व इतर सहकारी वाचले. परंतु फौजदारांचा मोठा भाऊ तुकाराम मराठे यांच्यावर चाकूहल्ला झाल्याने पी.के. अण्णा यांना पोलिसांनी पकडले व धुळे तुरुंगात टाकले. पुढे तो खटला सुरू झाला. मात्र, संशयाचा फायदा मिळून त्यांची मुक्तता झाली.
या काळात शिवाजीराव गिरधर पाटील तुरुंगात होते. त्यांना धुळे तुरुंगातून पळवून लावण्यासाठी सूताचा दोर तयार करून पी.के. अण्णांनी मदत केली होती. भूमिगत चळवळीतही त्यांचे योगदान आहे.

त्यांचा ९ ऑक्टोबर हा वाढदिवस विचारमंथन दिन म्हण्ून साजरा होतो. त्या दिवशी पी.के. अण्णा पाटील फाउंडेशनच्या वतीने नामवंत संस्था व व्यक्तींना पुरस्कार प्रदान करून गौरवले जाते. यंदाचा पुरस्कार सेवाग्राम आश्रमाला व सिंधुताई सपकाळ यांना प्रदान करावयाचा होता, पण त्याआधीच त्यांनी इहलोकीची यात्रा संपवली. या कर्तृत्ववान नेत्याला खान्देशातील अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील एवढे त्यांचे अफाट कर्तृत्व आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
* लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.