आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिकची पायाभरणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीतल्या क्रमांक एकच्या स्पेनच्या कॅरोलिना मरीनने दोनच महिन्यांपूर्वी सायना नेहवालला हरवत वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. कॅरोलिनाच्या ताकदवान खेळापुढे सायना निष्प्रभ ठरली. याच कॅरोलिनाला पी. व्ही. सिंधूने डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत पराभूत केले. या सामन्यात सिंधूच्या रॅकेटमधून ‘शटल’ नव्हे तर ‘बुलेट’च बाहेर पडत होत्या. ‘पॉवरगेम’च्या बळावर जगावर राज्य करणाऱ्या कॅरोलिनावर सिंधूने तेच अस्त्र चालवले.
सिंधूच्या वेगापुढे कॅरोलिना निरुत्तर झाली. प्रतिस्पर्ध्याची गाळण उडवणारा ‘माइंड गेम’ जो जिंकतो तोच चॅम्पियन ठरतो. केवळ शारीरिक क्षमता आणि कौशल्याच्या बळावर चॅंम्पियन बनत नाही. मग खेळ कोणताही असो. उपांत्य फेरीपूर्वी याच कॅरोलिनाकडून तीनदा पराभूत होणाऱ्या सिंधूने या वेळी तिला मानसिकदृष्ट्याही खचवले. सिंधूची ही हुशारी कौतुकास्पद आहे. या विजयाने आंतरराष्ट्रीय अंतिम फेरीचे दरवाजे सिंधूसाठी पहिल्यांदाच उघडले. जगातील तीन सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूंना सलग तीन सामन्यांत हरवून सिंधूने दिमाखात अंतिम फेरी गाठली. अवघ्या दोन आठवड्यांत तिने दबदबा निर्माण केल्याने अपेक्षा उंचावणे साहजिक होते. चीनच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती लीबरोबर सिंधूने डेन्मार्क ओपनचा अंतिम सामना खेळला. लीच्या ऐतिहासिक कामगिरीचे ओझे सिंधू अंगावर घेणार नाही, असे वाटत होते. पण बहुधा आयुष्यातला पहिलाच अंतिम सामना आणि दमदार प्रतिस्पर्धी याचा दबाव तिच्यावर पडला असावा. पण सिंधू नाउमेद झालेली नाही. उलट सन 2016 च्या रिओ (ब्राझील) ऑलिम्पिकच्या सिंधूच्या पदकाची पायाभरणी डेन्मार्क ओपनच्या पराभवाने झाली आहे. वीस वर्षांची सिंधू आणखी सात-आठ वर्षे तरी नक्की खेळेल. सायनानंतर भारतीय बॅडमिंटनचे भविष्य जवळपास सहा फूट उंच सिंधूच्या वेगवान आणि ताकदवान हातात सुखरूप असल्याचीही ग्वाही डेन्मार्क ओपनने दिली आहे.