आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Pakistan Decision Banning Haquani Network And Jamat Ud Dawa

खायचे व दाखवायचे दात वेगळे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईत झालेले भीषण बॉम्बस्फोट, २००८ मध्ये मुंबईवरच झालेला दहशतवादी हल्ला
यामागे पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा हात होता. न्यूयॉर्कमधील ट्विन टॉवर्स उद्ध्वस्त
करणा-या अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकी लष्कराने पाकिस्तानी हद्दीत शिरकाव करून ठार केले होते. परंतु पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचे केंद्र आहे हे माहीत असूनही त्या देशास अमेरिकेने कायम आपल्या पंखाखाली घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित राहाण्यासाठी भारत भेटीवर येत आहेत.
त्या दरम्यान पाकिस्तानातील दहशतवाद्यांकडून भारतात घातपाती कारवाया घडवण्यात
आल्या तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेने दिला होता. अमेरिकेच्या मदतीवरच पाकिस्तानचे अस्तित्व अवलंबून असल्याने हा इशारा दुर्लक्षिता येणे त्या देशाला शक्य नाही. जमात-उद-दवा व हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनांवरही बंदी घालावी, ही अमेरिका, ब्रिटनने केलेली मागणीही पाकिस्तानने निमूटपणे मान्य केली आहे. जलालुद्दीन हक्कानी याने स्थापन केलेल्या हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील विदेशी फौजांवर काही भीषण हल्ले चढवले होते. त्यामुळे हक्कानी नेटवर्कला अमेरिकेने सप्टेंबर २०१२ मध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले. जमात-उद-दवा ही संघटना हाफिज मोहंमद सईद चालवतो. मुंबईवर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचणा-या सूत्रधारांमध्ये हाफिजचा समावेश होता. लष्कर-ए-तय्यबावर बंदी
आल्यानंतर जमात-उद-दवाच्या माध्यमातून हाफिज मोहंमद सईदच्या कारवाया सुरू
होत्या.
झकी उर लख्वी याला पाकच्या न्यायालयाने जामिनावर अलीकडेच सोडले होते; पण खूप टीका झाल्यानंतर त्याला पाक सरकारने पुन्हा तुरुंगामध्ये डांबले. पेशावरमधील शाळेवर दहशतवादी हल्ला होऊनही चांगले व वाईट तालिबानी, असा भेद पाकिस्तानचे सरकार करीत बसले होते. जमात-उद-दवा, हक्कानी नेटवर्कवर पाकिस्तानने बंदी घातली आणि मालमत्ता जप्तीचे आदेश दिले असले तरी या संघटनांच्या दहशतवाद्यांच्या कारवाया त्यामुळे थांबतील, असे दिवास्वप्न कुणीही
बघण्याची गरज नाही.