आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव माझा मी देवाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आषाढ अवतरला. ग्रीष्माच्या कडाक्याने वाळून गेलेली धरित्री हिरवीगार दुलई पांघरून टकामका बघू लागते. आकाशातील काळ्याकुट्ट मेघांची धावपळ, गार वा-याचा पाठशिवणीचा खेळ. मध्येच खट्याळपणे बरसणारी पावसाची सर, तर कधी विजेचा लखलखाट, अशा नवलाईत पाऊस, थंडीवा-याची, कशाचीही पर्वा न करता भक्तांची वारी पंढरीकडे चालत निघालेली असते. हातात टाळ-वीणा, मुखाने विठोबा रखुमाईच्या नावाचा अखंड गजर करत हे भोळेभाबडे भक्त त्या सावळ्या विठोबाला भेटण्यास निघालेले असतात. महाराष्ट्रातील वारकरी आषाढी व कार्तिकी एकादशीला संताच्या किंवा देवाच्या पालखीपुढे भजन करत, नाचत भक्तिभावात मग्न होऊन पंढरीला जातात.
"आधी रचिली पंढरी। मग वैकुंठ नगरी।
जेव्हा नव्हते चराचर। तेव्हा होते पंढरपूर।।'
अशी संत नामदेवांची जी श्रद्धा, अढळभक्ती व अनन्य निष्ठा होती. तीच या वारक-यांत आहे. खांद्यावर पताका घेऊन मुखाने हरिनाम घेत, तालात मागेपुढे पावले टाकत ते मार्गक्रमण करतात. भक्तिरसात आकंठ न्हालेल्या या भक्तांकडे पाहून "दया क्षमा शांती। तेथे देवाची वसती।' याचा साक्षात्कार होऊन पदोपदी सर्वत्र समभावाचेच दर्शन होते. "उच्च नीच काही नेणे भगवंत' या उक्तीनुसार कोणत्याही धर्माचे-जातीचे, स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, सर्व जण सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून येथे एकत्र येतात. विठोबाच्या भेटीसाठी या वारीबरोबर जायचे असेल तर दोन हस्तक, एक मस्तक आणि भक्तिभावनेने भरलेले सात्त्विक हृदय असले की पुरेसे. येथे पैशाच्या श्रीमंतीपेक्षा हृदयाची श्रीमंती लागते.
पंढरीची वारी सर्वसमावेशक आहे. येथे सर्व जण एका समान पातळीवर येतात. म्हणूनच येथे खरी लोकशाही नांदते. वारी समाजातील सर्व थरांत लोकप्रिय झाली म्हणूनच या वारक-यांनी मारलेली भक्तीची हाक सर्वांच्या कानापर्यंतच नव्हे, तर हृदयापर्यंत भिडली. सगळ्यांच्या मनात भक्तिभाव प्रज्वलित करत ही वारी पुढे पुढे जाते. म्हणूनच महात्मा गांधींनी बहुजन समाजात देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दांडी यात्रा काढली, तर विनोबा भावे यांनी भूदान यज्ञासाठी पदयात्रा काढली. विमानाने, रेल्वेने, बसने प्रवास केला तर इच्छित स्थळी लवकर पोहोचतो; पण माणसांचा संपर्क येत नाही. पण ज्यांना एखादा विचार समाजाच्या सर्व थरांत पोहोचवायचा आहे, सर्वांशी संवाद साधायचा आहे, मनामनांचा सांधा जोडायचा आहे, त्यांनी पदयात्रा करायला पाहिजे. म्हणूनच हे वारकरी भक्तीचा, प्रेमाचा संदेश सर्वांना देत, त्यांना आपल्या वारीत सामील करून घेत पंढरीला जातात.
अखंड ज्याला देवाचा शेजार।
कारे अहंकार नाही गेला।
जाती-धर्म किंवा लिंग ईश्वरप्राप्तीच्या आड येत नाही. ज्याच्या मनात निष्पाप, निर्व्याज शुद्ध भक्तिभावाचा ओलावा आहे, तो देवाचा भक्त होऊ शकतो. त्यामुळे मुक्ताबाई, दासी जनी, बहिणाबाईंसारख्या स्त्रिया, गोरा कुंभार चेाखा मेळा, सावता माळी, नरहरी सोनार, सेना न्हावी यासारखे भिन्न स्तरांतील भक्त भागवत धर्मात श्रेष्ठ ठरले. एवढेच नव्हे, तर भक्तिमार्गावरील दीपस्तंभ ठरले. सद््गुण आणि सत्कर्म यामुळे सामान्य मनुष्य श्रेष्ठ ठरतो. आचारविचारांची शुद्धता, भूतदया, सदाचरण यांची शिकवण ज्ञानदेव, नामदेव, तुकाराम आणि एकनाथादी संतांनी दिल्यामुळे मानवी मनाची पालवी उंचावण्यास मदत झाली. या वारकरी संप्रदायाने बहुजन समाजाला कर्मठ, औपचारिक धर्मातून सोडवून सुसंस्कृत, माणुसकी शिकवणारा व्यापक धर्म दिला. त्यामुळे भक्त व ईश्वर यांच्यातील भटाभिक्षुकांची मध्यस्थी कमी झाली. त्यामुळे हिंदूधर्मावर आलेली ग्लानी नाहीशी झाली. परमेश्वरप्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग करून किंवा संसार मोडून रानावनात जाण्याची किंवा अंगाला भस्म फासून हिमालयात जाण्याची गरज नाही, तर प्रपंचात राहूनच परमेश्वरप्राप्ती करून घेता येते, हे या वारकरी संप्रदायाने ठासून सांगितले. "सुखे संसार करावा। मनी विठ्ठल आठवावा।' हे सांगताना ऐहिक जीवनातील सुखदु:खाकडेच केवळ लक्ष न देता आध्यात्मिक जीवनाकडे जायला पाहिजे, हे सांगायला ते विसरले नाहीत. "शुभमंगल सावधान' म्हणताच स्वत: पळून गेलेले समर्थ रामदाससुद्धा "प्रपंच करावा नेटका' असेच म्हणतात. पंढरी म्हणजे संतांचे माहेर, भूलोकीचे वैकुंठच. म्हणूनच जन्माला यावे व एकदा तरी पंढरीची वारी करावी. म्हणून संत देवाला विचारतात...
वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी।
वास दे पंढरी सर्वकाळ।
आम्हाला वैकुंठ नको, कैलास नको, फक्त पंढरी व पांडुरंग हवेत.
पंढरीची वारी आणि एकादशी या दोन बहिणींचे जन्मजन्मांतरीचे नाते आहे. पंढरपुरी आषाढी, कार्तिकी एकादशी झाली की त्यामुळे शुक्रता-याच्या राशी उभ्या राहतात. ज्यानं पंढरीची वारी पायी केली त्याच्या भाग्याला सीमाच नाही. वारकरी पंथाचे अध्वर्यू संत ज्ञानदेव यांना बुडणा-या समाजाला स्वधर्माची, स्वकर्तव्याची जाणीव करून देऊन सन्मार्गाला लावायचे होते म्हणून त्यांनी साध्या, सोप्या भक्तिमार्गाचा अवलंब केला. "चित्तशुद्ध तरी शत्रूमित्र होतो' हे वारक-यांचे ब्रीदवाक्य. कटीवर कर ठेवून विटेवर उभा राहणारा जिवलग पांडुरंग हा वारक-यांचे उपास्य दैवत. "एकएक अक्षरात। आहे माझा रमाकान्त।' ही दृढनिष्ठा. पंढरीला खळ। होतो क्षणेचि निर्मळ। हा अढळ विश्वास. दागिनाही सुंदर आणि दागिने घालणाराही संुदर. कुणी कुणाला शोभा आणली, हे कसं सांगणार? देवाला सर्वस्व अर्पण करणारा भक्त श्रेष्ठ, का भक्ताची सदासर्वदा वाट पाहणारा कारुण्यामूर्ती देव श्रेष्ठ! देवामुळे भक्ताला आणि भक्तामुळे देवाला शोभा आली एवढं मात्र खरं.
अापण सर्व विठ्ठलाची लेकरं आहोत. "विठ्ठल माउली कृपेची कोवळी। आळविता घाली प्रेमपान्हा।' ही वारी प्रेमपान्हा देणा-या विठ्ठलाची कोवळी मातृत्व भावना ओळखण्यास शिकवते. सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करायला शिकवते. नद्या जशा शेवटी समुद्राला येऊन मिळतात; त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून अनेक संत-महात्म्यांच्या पालख्या घेऊन या वारी शेवटी पंढरीनाथाच्या चरणी एकरूप होतात. चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी एकमेकाला उराउरी भेटतात. एकमेकांत देवाचे स्वरूप बघतात. देवमय होऊन जातात. देव माझा, मी देवाचा अशी ही विलक्षण समाधी.
drspanse@gmail.com