साधारण तीन दशकांपूर्वी दर महिन्याच्या अखेरच्या बुधवारी मुंबईतल्या कुलाबा पोलिस ठाण्यासमोरील अपोलो फ्लोरिस्टमध्ये काही पारशी-इराणी पोलिसांची बैठक होत असे. ब्रुन मस्का, खारी व चहा याचा आस्वाद घेत हे पोलिस चर्चा करत असत. त्या वेळी या बैठकीला पारशी पंचायत असे चेष्टेने संबोधले जायचे, पण काही कालावधीने अचानक या बैठका बंद पडल्या. कारण अशा बैठकीला हजर राहण्यासाठी पारशी पोलिसच राहिले नाहीत. या घटनेचे मूळ कारण म्हणजे पारशी समाजाला मराठी भाषा येत नसल्याने या समाजाने पोलिस करिअरकडे दुर्लक्ष केले. आज अशी परिस्थिती आहे की, गेल्या २० वर्षांत पारशी-इराणी समाजातील एकही व्यक्ती महाराष्ट्र पोलिस दलात सामील झालेली नाही.
सध्या मुंबई पोलिसांमध्ये पारशी समाजाचे केवळ दोनच पोलिस आहेत. हे दोघेही मराठीबहुल परळमध्ये लहानाचे मोठे झाल्याने त्यांना मराठी येते. या भाषेच्या जोरावर त्यांनी १९९४ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व त्यात उत्तीर्ण होऊन ते पोलिस दलात सामील झाले. सध्या संपूर्ण देशभरात पारशी समाजाची लोकसंख्या उणीपुरी केवळ ७० हजार आहे. यापैकी ५० हजार लोकसंख्या मुंबईत राहते. बहुसंख्य पारशी समाज हा विविध व्यवसाय, कॉर्पोरेट व मनोरंजन जगतात कार्यरत आहे. पूर्वी भारतीय लष्कर, रेल्वेत या समाजाची संख्या उल्लेखनीय असायची. पोलिस दलातही तशीच परिस्थिती होती. ब्रिटिशांची सत्ता असेपर्यंत बॉम्बे स्टेटच्या पोलिस प्रमुखपदी ए. ई. काफीन हे पारशी होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मुंबई कमिशनर पदाचा मान पुन्हा पारशी समाजाच्या जे. एस. भरुचा यांच्याकडे गेला. १९५५ ते ५७ या काळात पोलिस कमिशनरपदी के. डी. बिलमोरिया हे होते, त्यानंतर १९७५ ते ७७ या काळात मुंबई पोलिस कमिशनरपदी के. जे. नानावटी होते. त्या काळात पारशी पोलिस उपनिरीक्षक पदापासून सेवेत रुजू होत असत, पण कालौघात संख्या रोडावल्याने गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत हेक्टर कोठावाला व पेट्टीगारा हे दोन पोलिस अधिकारी पोलिस उपायुक्त पदापर्यंत पोहोचले होते. सध्या पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले कायोमर्झ इराणी व सायरस इराणी हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यानंतरची पारशी पिढी सेवेत नाही.