आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक पेप्सी गेली, दुसरी आली (वि. वि. करमरकर )

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शीतपेयांची जगप्रसिद्ध पेप्सी कंपनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी काडीमोड घेणार. इतकेच नव्हे, तर क्रिकेटमधील सौदेबाजीचा कलंक आपल्याला यापुढे लागू नये यासाठी पाच वर्षांचा करार तीन वर्षांतच एकतर्फी रद्द करणार! पाच वर्षांचा करार ३९६ कोटी रुपयांचा, त्यापैकी शेवटच्या दोन वर्षांच्या सुमारे १६० कोटी रुपयांसाठी भारतीय मंडळाला नवा पुरस्कर्ता शोधावा लागणार. तोही तडकाफडकी! नऊ ऑगस्टला ही बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली. क्रिकेट मंडळाचं धाबे दणाणलंय, असं चित्र उभं केलं गेलं.

आयपीएलमधील विविध घोटाळे आणि भारतीय मंडळाची होत असलेली नाचक्की याबाबत पेप्सीची समजूत घालण्याचा प्रयत्न आम्ही करू, अशा अर्थाचं गुळगुळीत, मुळमुळीत निवेदन मंडळाकडून प्रसिद्धीस दिलं गेलं. आयपीएल चेअरमन राजीव शुक्ला म्हणाले की, पेप्सी आहे आमचे जुने आधारस्तंभ. आम्ही परस्परांची बाजू समजून घेत राहू. त्यांना प्रमुख पुरस्कर्ते (टायटल स्पॉन्सर) राहायचं नसेल तरी एक पुरस्कर्ते म्हणून ते राहू शकतील.

बॅकफूटवर जाणाऱ्या मंडळाने, एका बाजूने तडजोडीचा पवित्रा अधिकृतरीत्या घेतला; पण दुसऱ्या बाजूनं पेप्सी तूर्त ‘आर्थिक अडचणीत आहे’ अशा ठसठशीत आठकॉलमी मथळ्याच्या बातम्या, देशातील अव्वल दैनिकांत छापून आणण्यात पुढाकार घेतला! दरवर्षी ८० कोटी रुपये खर्च केल्यावरही इतर छोट्या पुरस्कर्त्यांच्या तुलनेत आपल्याला असमाधानकारक प्रसिद्धीचा अपुरा मोबदला मिळतोय, असंच पेप्सीला जाणवू लागलंय, असंही मंडळाचे प्रवक्ते अनधिकृतपणे सांगू लागले.

मंडळाचे असे दुहेरी, दुटप्पी पवित्रे पेप्सीसारख्या व्यावसायिक संस्थेस थोडेच अनपेक्षित होते? करारभंगाच्या आरोपाची जी नोटीस पेप्सीने मंडळावर बजावली होती, त्यातील कळीचे मुद्दे पेप्सीने लगेच लोकांपुढे ठेवले. ‘क्रीडाक्षेत्रातील घोटाळे टाळण्याचे वा रोखण्याचे प्रामाणिक व पारदर्शक प्रयत्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने केलेले नाहीत. सकारात्मक प्रसिद्धी मिळवावी, या हेतूने पेप्सी मंडळाशी करारबद्ध झाली; पण पंचवार्षिक कराराच्या सुरुवातीसच चव्हाट्यावर आला तो २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळा!’

पण २०१३ मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग घोटाळ्यातून मंडळ काहीच शिकलं नाही. सर्वोच्च न्यायालयात न्या. मुद्गल यांच्या चौकशी समितीने, मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर कर्तव्यपालन न केल्याचा ठपका ठेवला. न्या. ठाकूर व न्या. कलिफुल्ला यांच्या आदेशांचाही आधार घेत पेप्सीनं आपली व्यथा मांडली : आता तर न्या. लोढा यांची समिती, आयपीएलचे सीईओ (प्रमुख कार्याधिकारी) सुंदर राजन यांचे गैरव्यवहार तपासत आहे. न्या. मुद््गल, न्या. लोढा प्रभृतींच्या चौकशीतून क्रिकेटची प्रतिमा किती कलंकित झाली, तेच उघडकीस येत आहे. मंडळाने करारभंग केलाय. हा करारभंग आहे कराराच्या मुळावरच घाव घालणारा! करार करताना दिलेली आश्वासनं मंडळानेच पाळलेली नाहीत. आता बँकेच्या हमीपोटी आम्ही रीतसर भरलेले ७८ कोटी रुपये मंडळाने पेप्सीला परत केले पाहिजेत!’

पेप्सीने मंडळाची कशी हजामत केलीय आणि सौदेबाजीनं डागाळलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कसं फैलावर घेतलंय आणि पेचात पकडलंय, असं अनेकांना वाटू लागलं होतं. कारण एक ‘पेप्सी’ माघार घेत असताना, तिची जागा घेण्यास दुसरी ‘पेप्सी’ सज्ज झालेली होती. जणू दबा धरून बसलेली होती! पेप्सीला करार मोडीत काढला जाण्याची वाट बघत होती! ही नवी ‘पेप्सी’ म्हणजे ‘व्हिवो’ नामक फोन कंपनी; अर्थातच महत्त्वाकांक्षी चीनमधील कंपनी. भारतीय बाजारपेठेत आज घटकेस व्हिवोचा वाटा आहे अवघा दोन टक्के. आता ती भारतीय बाजारपेठेत उतरतेच, ती सव्वाशे कोटी रुपयांची थैली हाती घेऊन. केवळ चीनखालोखाल मोठी बाजारपेठ जिंकण्याच्या जबर महत्त्वाकांक्षेतून. जाहिरातीची फलकबाजी, विक्रेत्यांना बोनस-बढतीची हमी, ही व्हिवोच्या मार्केटिंग तंत्राची हत्यारे. तिचा भर ई-कॉमर्सइतकाच ऑफलाइन दुकानांच्या मालकांवर. पाचआकडी किमतीच्या स्मार्टफोन विक्रीवर तिचा भर. यंदाच्या वर्षात २० लाख स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत विकण्याचं उद्दिष्ट ठेवलंय या चिनी कंपनीनं. पुढल्या वर्षी तिपटीनं विक्री वाढवायचीय व्हिवोला. चिनी लष्करी आक्रमण झालं व स्थिरावलं अरुणाचल प्रदेशात. तितकाच विचार व्हायला पाहिजे, भारतीय बाजारपेठेतील चिनी घुसखोरीचा जागतिकीकरणाच्या व्यवहारात. चिनी बाजारपेठेत भारताचा टक्का किती, याचाही विचार व्हायला हवा. तो इतका कमी का अन् कसा वाढवावा, याचाही विचार व्हायला हवा. ‘मेक इन इंडिया’च्या घोषणांचाही विचार व्हायला हवा. चिनी बनियांचं प्रभुत्व नवं नाही; पण त्याची दखल नव्यानं घेतली पाहिजे. तरी मुद्दा उरतो, पेप्सीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा. त्यांच्या पंचवार्षिक करारातील गेल्या तीन वर्षांतील, आयपीएल घोटाळ्यांचा. मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवासन, त्यांचे जावई, त्यांच्या चेन्नई सुपरकिंग्जचे कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सीईओ रामनपासून श्रीसंत प्रभृतींच्या गैरव्यवहारांचा. क्रिकेटचे नाव खराब होताना मंडळ अध्यक्षांच्या आणि त्यांच्याभोवती देशभरातून जपलेल्या लाभार्थींच्या व होयबांच्या कर्तव्यच्युतीचा. त्याविरुद्ध पेप्सीचा निषेध हा सर्वस्वी एकाकी आहे! बाकी पुरस्कर्त्यांपैकी आवाज उठवण्यास एकही हरीचा लाल पुढे आलेला नाही!

फिफा या फुटबॉलमधील जागतिक संघटनेत, सॅप ब्लॅटर यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत महाघोटाळे लोकांपुढे आले, तेव्हा प्रमुख पुरस्कर्ते चूप बसले नव्हते. त्यांच्या एकत्रित दबावामुळेच ब्लॅटर राजीनामा देण्यास अखेर एकदाचे राजी झाले. सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग अन् गॉल्फपटू टायगर वूड्स हे अमेरिकन खेळाडू क्रीडा जगतात एव्हरेस्टच्या शिखरावर होते; पण उत्तेजकं घेत असल्याचा इन्कार शंभरदा केल्यानंतर आर्मस्ट्राँगला गुन्हा कबूल करावाच लागला. टायगर वूड्सचा विवाहबाह्य लफड्यांचा अतिरेक झाल्यावर, जनमानसात त्याचं स्थान तळागाळाला गेलं. या दोघांनाही पुरस्कर्ते गमवावे लागले होते. भारताची गोष्ट, संस्कृती वेगळी, निव्वळ नफेबाजी हेच येथील बनियांचे प्रमुख मूल्य आहे. एरवी भारतीय मंडळाला किमान दम, निदान इशारा देण्यासाठी इतर पुरस्कर्तेही तरी एक-दोन पावलं पुढं आले असते! क्रिकेटमध्ये अमाप पैसा आहे अन् पैशाकडे पैसा, लोहचुंबकाप्रमाणे आकर्षित होत आहे. जागतिकीकरणात असंच होत असतं. गरीब अधिक संख्येने गरीब होत असतात, श्रीमंतांची श्रीमंती वाढत असते!