आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केशर दिव्यांची कथा सांगणारा कवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादरच्या मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये एक कवितावाचनाचा कार्यक्रम होता आणि त्यासाठी आदरणीय वैद्य सर प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. मला वाटते वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट असावी. वैद्य सरांच्या कविता वाचत होतो, त्या पाठ म्हणून दाखवतही होतो, पण प्रत्यक्ष त्यांना जवळून भेटण्याची संधी मिळाली नव्हती. आम्ही नव्यानेच लिहू लागलो होतो तेव्हा. आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो आणि नेमके वैद्य सरांना आणण्याची जबाबदारी आमच्यावर आली.
मी आणि संदेश ढगे नावाचा माझा एक मित्र आनंदाने त्यासाठी तयार झालो. सर तेव्हा माटुंग्याला राहत होते. आम्ही त्यांच्या घरी गेलो. मनामध्ये धास्ती होती. सरांनीच दरवाजा उघडला. आम्ही कार्यक्रमासाठी तुम्हाला न्यायला आलो आहोत, असे त्यांना सांगितले. त्यांनी मोठ्या आपुलकीने आम्हाला आत नेले. पाणी दिले. आमची चौकशी केली आणि पुढच्या दहा मिनिटांमध्ये ते तयार होऊन आमच्याबरोबर निघाले. सरांची पत्नी म्हणजे आदरणीय सरोजिनीबाई आणि सरांच्या मातोश्री तेव्हा घरी होत्या. मराठीतील हे दोघे आश्वासक कवी आहेत बरं का, असे म्हणून त्यांनी आमची ओळख करून दिली. सरांबरोबरची ती पहिली भेट. सर मध्ये आणि मी व संदेश सरांच्या दोन्ही बाजूला असा आमचा तो प्रवास आजही मनामध्ये ताजा आहे. त्यानंतर मात्र सरांशी जवळीक नरि्माण झाली आणि ती हयातभर तशीच राहिली.
मोबाइल नव्हते तेव्हा. फोनही क्वचित एखाद्याकडेच होते. पण कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये भेट व्हायची आणि सर आमच्या कुठेतरी प्रकाशित झालेल्या आणि त्यांनी वाचलेल्या कवितांवर आवर्जून बोलायचे. आम्हाला आश्चर्य वाटायचे. एवढा मोठा कवी पण कुठेही अहंभाव नाही. उलट सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि जिव्हाळा सांभाळण्याचा त्यांचा स्वभाव. त्यांच्या वागण्या-बोलण्यात एक निगर्वी आपलेपणा होता आणि तो त्यांच्या साहित्यातूनही अवरित झिरपत राहिला होता.

कविता फक्त चांगली लिहून काम भागत नाही तर ती तितक्याच प्रभावीपणे सादर करता आली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असे. आपल्या कविता सादर करताना त्यांनी कधीही कागद समोर ठेवला नाही. कविता पाठ पाहिजे आणि सगळ्या रसिक श्रोत्यांच्या समोर ती एका नजाकतीने पेश करता आली पाहिजे, असे ते म्हणत असत. शब्दांतील चढउतार, ठरावीक ओळींनंतरचे थांबणे, आवाजातील पेशकश अशा अनेक गोष्टी त्यांनी स्वत: आत्मसात केल्या होत्या आणि त्यांच्या सहवासामध्ये आलेल्या प्रत्येक कवीने त्या समजून घ्याव्यात, असे त्यांना वाटत असे. ते स्वत: दुस-या एखाद्या कवीची कविताही अगदी तोंडपाठ म्हणून दाखवत असत.

एकदा डोंबिवलीचा एक कार्यक्रम करून सर आणि मी पहाटेच्या पहिल्या लोकलने मुंबईकडे येत होतो. सर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते आणि मध्यरात्रीपर्यंत कविसंमलेन सुरू राहिले होते. सरांनी आपल्या कवितांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पहाटेची वेळ. हवेत गारवा होता. गाडी तशी रिकामी होती. आम्ही दोघे दरवाजाजवळ जरा आत टेकून उभे होतो. गाडीच्या वरच्या बाजूला जिथे कड्या असतात, त्या दांड्यांच्या वर भाजी आणायला जाणा-या भय्या लोकांनी आपल्या मोठमोठ्या टोपल्या ठेवल्या होत्या. गाडीच्या दिव्यांचा प्रकाश त्यातून झरिपत होता. सरांनी त्याकडे बोट केले आणि मला म्हणाले, सतीश, तो पाहा त्या टोपल्यातून प्रकाश कसा झरिपत बाहेर पडतो आहे. आपल्या आत असलेल्या कवितेचा प्रकाशही असा झरिपत राहिला पाहिजे आणि तो जाणवतही राहिला पाहिजे.

सरांशी गप्पा म्हणजे एक पर्वणीच असायची. त्यांच्या लहानपणीचे अनेक दाखले ते द्यायचे. त्यांच्या एखाद्या गाजलेल्या गाण्याची जन्मकथा सांगायचे. मी त्यांना एकदा विचारले होते, की सर, प्रत्येक कवीला, सगळेच्या सगळे काव्यप्रकार यायलाच हवेत का? सरांचे त्यावरचे उत्तर विचार करण्यासारखे होते. ते म्हणाले होते, सतीश, एखादा तरबेज शिकारी जेव्हा शिकारीला जातो तेव्हा आपल्या भात्यामध्ये सगळ्या प्रकारचे बाण ठेवतो. समोर कोणती शिकार आली तर कोणता बाण वापरायचा हे त्याला नेमके माहीत असते. समोर जर वाघ आला तर तो खास वाघाला जायबंदी करेल असा बाण काढेल आणि जर समोर ससा आला तर सशासाठीचा एक वेगळा बाण तो बाहेर काढेल. सशाची शिकार करताना तो वाघासाठीचा बाण वापरणार नाही किंवा वाघाची शिकार करताना तो सशासाठीचा बाण वापरणार नाही. कवितेचेही तसेच असते. एखादा अनुभव तुमच्याकडे छंद आणि वृत्तांची मागणी करतो, एखादा अनुभव हा गझलची मागणी करतो, तर एखादा अनुभव हा मुक्तछंदामध्ये मांडायचा असतो आणि हे सगळे प्रकार जर कवीला माहीत नसतील तर त्याची अभिव्यक्ती नीट होणार नाही. भले तू कोणताही काव्यप्रकार हाताळ, पण त्यासाठी सगळ्या काव्यप्रकारांची माहिती असायला हवी आणि ती जाणीवपूर्वक करून घ्यायला हवी.
समज एखादा चित्रकार आहे तर त्याला जसे सगळे रंग माहीत असायला पाहिजेत आणि कोणत्या रंगामध्ये कोणता रंग मिसळला तर कोणता रंग तयार होता हेही जसे माहीत असायला हवे, अगदी तसेच कवीलाही काव्यप्रकाराचे सगळे रंग माहीत असायला हवेत.
कराडच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मी आणि सर एकत्र होतो. सर निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन करणार होते आणि त्याच संमेलनात मला कविता सादर करायची होती. सर इतके ज्येष्ठ पण तरीही, प्रत्येक कवीची त्यांनी बारकाईने माहिती गोळा केली होती. त्यांचा क्रम ते जोडत होते. हे सर्व करत असताना, स्टेजवर कसे वावरायचे, क्रम कसा ठरवायचा, एखाद्या कवीबद्दलची विशिष्ट माहिती कागदाच्या
हाशिया (मार्जिन) मध्ये कशी लिहायची, कोणती शाई वापरायची म्हणजे स्टेजवरच्या दिव्यांमध्ये अक्षरे चकाकत नाहीत याचे सखोल ज्ञान त्यांनी मला दिले. एकेक मुद्दा अगदी समजावून सांगितला. पुढे जेव्हा मी ठाणे येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निमंत्रितांच्या कविसंमेलनाचे सूचसंचालन करत होतो तेव्हा या माहितीचा मला पुरेपूर फायदा झाला आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेव्हा साक्षात वैद्य सर माझ्यासमोर बसलेले होते.
सरांनी अनेक नवोदितांसाठी मायेची थाप दिली. त्यांच्या कवितासंग्रहासाठी प्रस्तावना लिहिल्या. प्रकाशन समारंभासाठी कोणतेही आढेवेढे न घेता उपस्थित राहिले आणि सर्वांना आपलेसे केले.

सरांच्या कवितांनी सर्व थरांतील रसिकांना आपलेसे केले होते. ते आयुष्यभर कविता जगत राहिले आणि कवितेतील केशर दिव्यांची कथा सांगत राहिले.
आज सर नाही आहेत आपल्यामध्ये. त्यांच्याबद्दल आणि कवितेवर प्रेम करणा-या प्रत्येक रसिकाबरोबर असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल आत्ता एवढेच म्हणता येईल :
मी झेंडूच्या फुलांची माळ ओवीत बसले होते
ओवता ओवता धागा केशरी झाला
बस्स, तुझ्या-माझ्या नात्याबद्दल
मला एवढेच काय ते बोलता येईल.