आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Political Parties Pro People Work By Ramesh Pantange

हे प्रश्न कुणाचे आहेत?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात संसदीय पद्धतीची लोकशाही राज्यव्यवस्था आहे. या पद्धतीत ज्या पक्षाला बहुमत मिळते त्याचे राज्य येते. ज्यांना राज्यसत्ता मिळत नाही ते विरोधी बाकांवर बसतात. सत्ताधारी पक्ष जे काही करेल, त्याच्यावर सतत टीका करत राहणे हा त्यांचा एककलमी कार्यक्रम होतो. डॉ. मनमोहन सिंग यांचे शासन असताना भाजप आणि त्याचे मित्रपक्ष हेच काम करत आणि आता नरेंद्र मोदी यांचे शासन आले असताना काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हेच काम करत असतात. विरोधी पक्षांची टीका जर खरी मानली तर देशात कुठलेही सरकार अधिकारावर राहण्याच्या लायकीचे नाही असा त्याचा अर्थ करावा लागेल. सुदैव आपले की वस्तुस्थिती अशी नसते. सत्तेवर असलेला प्रत्येक राजकीय नेता आणि पक्ष आपल्या कुवतीप्रमाणे काम करत राहतो. लोकांना जर तो पसंत पडला नाही तर लोकच त्या नेत्याला आणि पक्षाला सत्तेपासून दूर ठेवतात. भाजपला दहा वर्षे लोकांनी सत्तेपासून दूर ठेवले होते. संसदीय पद्धतीने आपल्या देशाला नकारात्मक विचार करण्याची सवय लावली आहे. आपले राजनेते नालायक आणि भ्रष्ट आहेत, आपली न्यायव्यवस्था कासवगतीने चालते, भ्रष्टाचार शिष्टाचार झालेला आहे, उच्चपदस्थ आणि पैसेवाल्यांना कोणी हात लावू शकत नाही, सगळ्या व्यवस्था सडत चालल्या आहेत, भ्रष्टाचारमुक्तीची भाषा बोलणारे लबाड निघतात, अशा प्रकारे हा नकारात्मक प्रचार सातत्याने चालू राहतो. राजकीय पक्षांची एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्याची जी शर्यत चालू असते त्या शर्यतीत देशापुढील अनेक मूलगामी प्रश्न दुर्लक्षिले जातात. त्याची एखादा राजकीय नेता दखल घेताना अभावानेच दिसतो.

नॅशनल सॅम्पल सर्व्हेने एक आकडेवारी प्रसिद्ध केली. खेड्यातील महिलेला २०१२ मध्ये पिण्याचे पाणी आणण्यासाठी वर्षातून सरासरी १७३ किमीचा प्रवास करावा लागतो. दिवसेंदिवस भूगर्भातील जलसाठा आटत चालला आहे. त्यामुळे घराजवळच्या विहिरी कोरड्या पडतात आणि दूरवरून पाणी आणावे लागते. रोज २०० मीटर ते ५ किमी इतका पाण्यासाठी प्रवास करावा लागतो. आमच्या राजनेत्यांनी खेड्यात राहणा-या आपल्या मूक भगिनीच्या या कष्टांचा कधीतरी विचार करावा आणि त्यांचे कष्ट कसे दूर होतील यासाठी प्रयत्न करावा. भारतातील स्त्रिया अन्याय-अत्याचाराला सहज बळी पडतात. शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळाच्या त्या बळी होतात. दिल्लीत एका महिलेवर बलात्कार झाला आणि हे प्रकरण सर्व देशभर गाजले. दलित आणि मागासवर्गीय महिलांवर रोज कोठे ना कोठे बलात्कार होतच असतो. ना त्याची बातमी होते, ना त्याविरुद्ध आवाज उठवला जातो. असे का होते? याचा कोणी विचार करते का? कायद्याप्रमाणे मुलीचे लग्न ती १८ वर्षांची झाल्याशिवाय लावता येत नाही. या कायद्याची अंमलबजावणी अजिबात होत नाही. लहान वयात लग्न झाले की तिचा विकासच संपतो. कौटुंबिक जबाबदा-यांचा भार तिच्या खांद्यावर पडतो. खेडोपाडी या विषयावर जनजागृती करण्याची खूप गरज आहे. आमच्या नेत्यांना जनजागृती करण्यासाठी थोडा वेळ काढता येईल का?

सध्या देशात घटस्फोटांचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. भारतीय समाज हजारो वर्षे टिकला याची जी अनेक कारणे आहेत त्यात आपली कौटुंबिक व्यवस्था आणि कौटुंबिक मूल्यव्यवस्था उत्तम राहिली हेदेखील एक आहे. मुलगी शिकली, अर्थार्जन करू लागली, ती स्वतंत्र झाली हे चांगले झाले. मुलेही शिकतात आणि उत्तम करिअर निर्माण करतात. परंतु मुलामुलींवर जसे करिअर निर्माण करण्याचे संस्कार होतात तसे लग्न करून एकत्र राहायचे आहे आणि एकत्र राहणे म्हणजे अनेक बाबतीत तडजोड करावी लागते. अहंकाराचे प्रश्न निर्माण करून संसार उभा राहत नाही. हे संस्कार लोप पावत चालले आहेत. आणि त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. विवाहविच्छेदाने मुलांचे जीवन उद्ध्वस्त होते. एक तर मुले अबोल होतात किंवा हिंसक होतात. अथवा बंडखोर होतात. त्यांच्या संगोपनात आई आणि वडिलांची भूमिका ही महत्त्वाची असते. पाश्चात्त्य देशात शाळेत गोळीबार करणा-या मुलांच्या कथा वर्तमानपत्रांतून आपण वाचतो. अशी गोळीबार करणारी बहुतेक मुले घटस्फोटित मातापित्यांची असतात. यासाठी मुलामुलींनी करिअर केले पाहिजे, परंतु त्याच वेळी एकमेकांना समजून संसार केला पाहिजे आणि तडजोडी करायला शिकले पाहिजे. हे सांगण्याची व्यवस्था समाजात कोण उभी करणार? राजकीय पक्ष आणि नेत्यांना तर यासाठी वेळ नसतो. त्यांना एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्या काढण्यासाठीही वेळ पुरत नाही. परंतु सत्तेच्या राजकारणापेक्षा समाजाचे सातत्य आणि स्थैर्य हे अधिक महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे.
भारतात बालगुन्हेगारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. दिल्ली बस बलात्कार आणि खून प्रकरणात बालगुन्हेगार सापडला. नॅशनल क्राइम रिसर्च ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २००८ मध्ये मागील वर्षांपेक्षा बालगुन्हेगारीत ९.२ टक्क्यांनी वाढ झालेली आहे. २००७ ची आकडेवारी सांगते की, ३४५२७ बालगुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. त्यातील ३२६७१ मुले होती आणि १८५६ मुली होत्या. बालगुन्हेगारांना सुधारगृहात पाठवले जाते आणि नंतर सोडून दिले जाते. संघटित गुन्हेगारी टोळ्या त्याचा लाभ घेतात आणि गंभीर गुन्हे करण्यासाठी मुले आणि मुली यांचा वापर करतात.

जगातील सर्वाधिक गरीब लोक भारतात राहतात. दिल्लीत येणारे प्रत्येक सरकार गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहते. पण प्रत्येक सरकारला त्यात मर्यादित यश मिळते. कारण प्रत्येक पक्ष गरीब समूहाकडे मतपेढी म्हणून पाहतो. मते मिळण्यासाठी योजना तयार केल्या जातात. योजना मते मिळण्यासाठी करायच्या नसून गरिबाला उत्पादनक्षम, क्रयशक्तिधारक करण्यासाठी करायला पाहिजेत. भिकेची पोळी खाण्याऐवजी श्रमाची पोळी खाणे अधिक चांगले. ती जास्त गोड लागते आणि अंगालाही लागते. सर्व राजकीय पक्षांनी प्रामाणिकपणे निश्चय केला की पुढच्या पाच वर्षांत देशातून गरिबीचे उच्चाटन करून टाकू तर ते अशक्य नाही. १२ महिने ३६५ दिवस राजकीय धुळवड खेळलीच पाहिजे असे नाही. निदान ६५ दिवस बाजूला काढून या आणि अशा प्रश्नांचा मूलभूत विचार सर्वांनी मिळून करायला पाहिजे. कारण हे आमचे राष्ट्रीय प्रश्न आहेत.
लेखक हे राजकीय अभ्यासक आहेत.
ramesh.patange@gmail.com