आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिशादर्शक हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
२० व्या शतकातील भारतीय राजकारणावर गंभीरपणे लिखाण करणारे जे काही मोजकेच विचारवंत व राजकीय संशोधक होते त्यामध्ये रजनी कोठारी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाई. १९७०मध्ये 'पॉलिटिक्स इन इंडिया' या रजनी कोठारी यांच्या भारतीय राजकारणाची समीक्षा करणा-या ग्रंथाने काँग्रेस पक्ष हा राजकीय पक्ष राहिलेला नसून ती एक व्यवस्था झाल्याची सैद्धांतिक मांडणी केल्याने खळबळ माजली होती. त्यांची ही समीक्षा अर्थातच वादाची होती; पण अशा वैचारिक मांडणीमुळे भारतीय राजकारणाच्या दिशेचा अर्थबोध मात्र होत होता. पुढे रजनी कोठारी यांच्या 'कास्ट इन इंडियन पॉलिटिक्स', 'कम्युनॅलिझम इन इंडियन पॉलिटिक्स', रिथिंकिंग डेमोक्रसी या अन्य अनेक ग्रंथसंपदांनी भारतीय राजकारणावर, जातव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात प्रकाशझोत टाकण्याचे कार्य केले. त्यांच्या वैविध्यपूर्ण व्यासंगी शैलीमुळे व सामाजिक संशोधनामुळे २० व्या शतकातील भारतीय राजकारणाची चिकित्सा करणा-या मोजक्याच विचारवंतांमध्ये त्यांचे आदराने नाव घेतले जाई. राजकारण हे केवळ पक्षाधिष्ठित किंवा विकासाभिमुख नसते, तर मानवी अधिकारांचे पालन करणारे असावे लागते या मताचे ते होते. त्यामुळे मानवाधिकाराची चळवळ त्यांनी हाती घेतली. त्यातून १९७०मध्ये त्यांनी सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस) ही संस्था स्थापन केली व पुढे लोकायन या संस्थेचीही उभारणी केली.
देशातल्या ब-याचशा सामाजिक चळवळी नेतृत्वाच्या अभावी, विचारसरणीशी सुसंगत नसल्याने गलितगात्र अवस्थेत असल्याचे त्यांचे मत होते. सामाजिक चळवळी या लोकशाही सशक्त करणा-या असतात अशा चळवळींना राजकारणात स्थान देण्याबाबत ते आग्रही होते. ७० च्या दशकात त्यांनी काँग्रेस पक्षाचे सक्रिय सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती; पण आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांना साथ दिली. पुढे मात्र त्यांनी पक्षीय राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्ही. पी. सिंग यांचे सरकार असताना १९८९ ते १९९० या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून काम केले. पण अखेरपर्यंत ते भारतीय राजकारणाला दिशादर्शन देण्याचे काम करत होते.