आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकी विसरलेले राजकारणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरण सत्याग्रहाचे सेनापती बापट यांचा राज्यातला एकमेव पुतळा नागपुरात आहे . दोन हजार मध्ये नागपूरला झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत छोट्या राज्यांना पर्यायाने वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीला भाजपने पाठिंबा दिला. तेव्हापासून सेनापती बापट यांच्या या पुतळ्याच्या पायथ्याशी संयुक्त महाराष्ट्राच्या नागपुरातील समर्थकांच्या वतीने महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम साजरा केला जातो. या वर्षीचा कार्यकम साजरा होत असताना सर्वच वक्त्यांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीला विरोध करताना संयुक्त महाराष्ट्राचे नेहमीप्रमाणे समर्थन केले. मात्र, विकासाच्या आघाडीवर होणार्‍या विदर्भाच्या उपेक्षेचे समर्थन करता येणार नाही, अशी भूमिका मांडली. केवळ विकासाच्या निकषावर वेगळे राज्य मागणे चूक आहे. कारण असे झाले तर प्रत्येक प्रादेशिक विभाग वेगळे राज्य मागेल अशी नेहमीची भूमिका मी मांडली तरी विकासाचे प्रश्न आणि त्यातून एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे हे विसरता येईना. मराठी माणसांचा संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, पण एकसंध महाराष्ट्र होण्याचे स्वप्न साकार झाले का, असा विचार हा कार्यक्रम सुरू असतानाच माझ्या मनात घोळू लागला. नंतरही एकसंध महाराष्ट्राच्या स्वप्नाचे काय, हा मुद्दा पिच्छा सोडेचना... दरम्यान, वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की, जायकवाडीसाठी सोडलेले पाणी अहमदनगर जिल्ह्यात अन्यत्र वळवले गेले आहे आणि मराठवाड्यातल्या नांदेडचे कवी केशव सखाराम देशमुख यांच्या एका कवितेतील ओळी आठवल्या.

हंडा हंडा पाण्यासाठी दोर-बादल्या घेऊन विहिरीच्या काठांवर झुंजणार्‍या स्त्रिया डोळ्यात उभ्या असतात, अशा वेळी तहानेचे इतिहास अंगावर धाऊन येतात. सर्पसमूह यावेत तसे राज्यातले राजकारण किती बदलले बघा, संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न उराशी बाळगून एकत्र आलेला मराठी माणूस एकमेकाच्या तहानेचा विचार माणुसकीच्या पातळीवर करायला तयार नाही आणि म्हणे हे राज्य एकसंध आहे! अहमदनगरचे राजकारणी औरंगाबादला पाणी द्यायला विरोध करतात, नाशिकचे राजकारणी अहमदनगरला पाणी देण्यास नकार देतात आणि सोलापूरला पाणी देण्यासाठी पुण्याचे राज्यकर्ते विरोध करतात. तानसाचे पाणी मुंबईकर पितात, पण तानसेकर मात्र पाण्यासाठी वणवण फिरतात... पाणी मिळावे यासाठी न्यायालयाला द्यावा लागतो तो आदेश न पाळण्यासाठी काही राजकीय मंडळी वरच्या न्यायालयात जातात... संयुक्त महाराष्ट्र स्थापन करण्यासाठी जिवाचे रान करून आंदोलन उभारलेल्यांनी, पोलिसांच्या लाठ्या-काठ्या खाल्लेल्यांनी, तुरुंगवास भोगलेल्यांनी, संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणाचे मोल देणार्‍यांनी, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणणार्‍यांनी माणसाची तहान भागवण्यासाठी हा महाराष्ट्र भविष्यात अशी काही भांडाभांडी करेल असे स्वप्न तरी पहिले होते का?

खरे तर या राज्याचा समतोल विकास केला जाईल अशी नि:संदिग्ध ग्वाही सर्वार्थाने दृष्टे लोकनेते असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी नागपूर करार करून वैदर्भीयांना दिली होती ही वस्तुस्थिती आहे आणि मग संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न अस्तित्वात आल्यावर हे राज्य मराठी माणसाचेच आहे, असा निर्वाळा ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अग्रलेखाला उत्तर देताना यशवंतरावांनी ठामपणे दिला होता ही या वस्तुस्थितीची दुसरी बाजू आहे. असे असतानाही तहान भागवण्याचीही माणुसकी विसरल्याचे क्लेशदायक चित्र दररोज समोर येत आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या शब्दावर विसंबून मराठवाडा विनाअट तर वैदर्भीय रीतसर करार करून संयुक्त महाराष्ट्रात आला . मात्र, यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरच्या आणि त्यांचा वसा चालवण्याचा दावा करणार्‍या अशा दोन्ही गटांच्या राज्यकर्त्यांनी समतोल विकासाचा शब्द पाळला नाही. त्यामुळेच महाराष्ट्र एकसंध आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय.

राजकारण म्हटल्यावर कट-कारस्थान, शह-प्रतिशह, कुरघोडी चालणार हे गृहीतच आहे किंबहुना तो राजकारणाचा धर्म आहे, अविभाज्य भाग आहे. आपल्या राज्यात घडले ते मात्र विपरीत आणि त्यामुळे परस्परांबाबत अविश्वासाची भावना निर्माण झाली. आधी विकासाचा असमतोल निर्माण केला गेला. त्यातून अनुशेषाचा प्रश्न समोर आला. त्यातून अनुशेष दूर करण्यासाठी जे काही गंभीर प्रयत्न सुरू झाले त्यातही राजकारण आणले गेले. अनुशेषाचाही अनुशेष निर्माण झाल्याची परिस्थिती निर्माण झाली. मराठवाड्यात गोविंदभाई श्रॉफ आणि विदर्भात श्री. वा. धाबे यांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी आंदोलन उभे राहिले. त्यातूनच वैधानिक विकास मंडळाचा अंकुश आला. हा अंकुश आणण्यास मराठवाड्याचे नेते, माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांचा विरोध होता. कारण हा अंकुश निष्प्रभ करण्याइतके पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व बेरकी आहे, असे मत त्यांनी मला एक पत्रकार म्हणून दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केले होते. तरी ती मागणी गोविंदभाई श्रॉफ यांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मंजूर करवून घेतली (आणि मगच पद्म सन्मान स्वीकारला हा एका निष्ठेचा इतिहास आहे).

आधी दांडेकर समिती आणि मग वैधानिक विकास मंडळांच्या स्थापनेनंतर कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे ऐरणीवर आले ते संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहिलेल्यांना विषण्ण करणारे, वेदना देणारे होते. नंतर वैधानिक विकास मंडळे विकलांग करण्याचा आणि या मंडळांसाठी मंजूर झालेला निधी पळवण्याचे उद्योग करण्यात आले. शंकरराव चव्हाण यांचे भाकीत खरे ठरले. वैधानिक मंडळाला खुंटीवर टांगल्याचे उद्योग उघडकीस आल्यावर नितीन गडकरी व बी. टी. देशमुख यांनी विधिमंडळ तसेच न्यायालयीन पातळीवर दिलेली लढाई गाजली. ती लढाई संपलेली नसतानाच आता या दुष्काळाने तहानेचा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आणलेला आहे.

यानिमित्ताने एक आठवण झाली. पाण्याचा प्रश्न अशा पद्धतीने आज न उद्या ऐरणीवर येणार आहे याची जाणीव अकाली निधन पावलेले मराठवाड्यातील एक अभ्यासू आमदार रायभान जाधव यांना आलेली होती. मनसेचे कन्नडचे विद्यमान आमदार हर्षवर्धन जाधव यांचे ते वडील. रायभान जाधव बराच काळ प्रशासकीय नोकरीत होते आणि मग राजकारणात आले, आमदार झाले. रायभान जाधव यांच्याच कन्नड तालुक्यात अंधानेरला मी शालेय शिक्षण घेतले, कन्नडच्या महाविद्यालयात प्रवेश घेणारा पहिला-दुसरा विद्यार्थी मी. आता मुंबईत सी.ए. असलेला लक्ष्मण काळे, औरंगाबादला वकिली करणारा भीमराव पवार, नाना थेटे आणि मी मिळून कन्नडला कृषी विद्यापीठ स्थापना तसेच मराठवाडा विकासाच्या चळवळीचे नेतृत्व केले. कॉलेज आणि कन्नड बंद करण्याचे उद्योग अनेकदा केले! साहजिकच रायभान जाधव यांच्याशी ओळख होती. पत्रकारितेत आल्यावर आमच्यात कन्नड हा समान दुवा होता. 1९९5 ते रायभान जाधव यांचे निधन होईपर्यंत आमच्यात नियमित संपर्क होता. जायकवाडीचे पाणी कसे वरच्या भागात रोखले जात आहे, त्यासाठी राजाचे नेतृत्व कसे जबाबदार आहे, याचा बराच अभ्यास रायभान जाधव यांनी केलेला होता. त्यासंदर्भात रायभान जाधव यांनी बरीच कागदपत्रेही जमा केलेली होती. ती सर्व माहिती ते मला पुराव्यानिशी देणार होते . औरंगाबादच्या खडकेश्वर परिसरातल्या त्यांच्या घरी आमच्या दोन प्रदीर्घ भेटीही त्यासंदर्भात झालेल्या होत्या. पण मृत्यूने अचानक घाला घातला आणि ती पुराव्याची कागदपत्रे मला मिळालीच नाहीत.

महाराष्ट्राचे राजकारण पुढच्या काळात पाण्याच्या मुद्द्याभोवती फिरेल आणि ते करताना राजकारणी सर्व मर्यादा विसरतील, असे रायभान जाधव नेहमी म्हणत. त्यांच्याशी झालेल्या चर्चा आणि एक पत्रकार म्हणून राज्यभर फिरताना जे काही पाहत होतो त्यावरून मलाही ते पटू लागलेले होते. तहान भागवण्यासाठी गदर्भामागे पाणी घेऊन धावणार्‍या एकनाथ महाराजांचा माणुसकीचा इतिहासही महाराष्ट्राचे राजकारणी विसरतील, असे मात्र तेव्हा वाटत नसे. आता राजकारणाने तीही खालची पातळी गाठली आहे. म्हणूनच म्हटले ‘महाराष्ट्र संयुक्त आहे, एकसंध नाही,’ हे कटू असले तरी सत्य आहे!