आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Prafulla Dahanukar By Shashikant Sawant, Divya Marathi

प्रतिभावंत चित्रकाराचे हरपणे...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रफुल्ला डहाणूकर यांची परिचित आकृती आता मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये दिसणार नाही. गेले काही महिने त्यांचा वावर कमी झाला होता; पण त्यापूर्वी अनेक वर्षे त्या कायम जहांगीरमध्ये आणि परिसरात सतत दिसत असत. अगदी पहिल्यांदा त्यांना पाहणा-या माणसाच्याही त्या लक्षात राहत, कारण त्यांची असाधारण उंची. त्यामुळेच चित्रकारांच्या ग्रुप फोटोत त्या सर्वांपेक्षा उंच दिसत. 2006 सालच्या त्यांच्या प्रदर्शनात त्यांची अनेक नवी जुनी चित्रे बघायला मिळाली. त्यातून किती विविध प्रकारची चित्रे त्यांनी केली आहेत हे दिसले. म्युरल, निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रण इत्यादी. खरे तर हे सारेच अभ्यासाचा भाग असतो आणि एकेकाळी अमूर्त चित्रकलाच काय ती श्रेष्ठ, असा एक समज जे. जे. महाविद्यालात रूढ झाला होता; पण अमूर्तसह त्यांनी सर्व शैलींमध्ये काम केले आणि त्यात चांगले कसब दाखवले.
1934 मध्ये जन्म झालेल्या प्रफुल्ला डहाणूकर यांना लहानपणापासून चित्रकलेची आवड होती आणि त्याला प्रोत्साहन देणारे पालक त्यांना लाभले. आणि ज्या काळात मुली विशेष संख्येने जे.जे.मध्ये नसत त्या काळात त्यांना जे.जे.मध्ये प्रवेश घेता आला. त्याचे त्यांनी चीज केले. सुवर्णपदक मिळवून त्यांनी पदवी मिळवली. पुढे लगेच बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक मिळवले. अगदी तरुण वयात त्यांनी स्वत:चे प्रदर्शन भरवले. नाटकापासून संगीतापर्यंत अनेक कलांमध्ये त्यांना रस होता. पुलंच्या फोटोच्या पुस्तकामध्ये प्रफुल्लाबार्इंचा नाटकातला फोटोही आढळतो.

त्या काळात भुलाभाई देसाई केंद्रामध्ये चित्रकार, नाटकातली मंडळी आणि इतर कलावंत एकत्र येत. अल्काझींसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ रंगकर्मी त्यामागे होता. अगदी अलीकडे त्याचे चित्रण विजयाबाई मेहतांच्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्रामध्ये आले आहे. वासुदेव गायतोंडेंसारखे चित्रकारही त्यात होते. प्रफुल्ला डहाणूकर आणि गायतोंडे यांची चांगली मैत्री होती. चित्रासाठी ब्रश आणि नाइफ याच्याऐवजी रोलर वापरण्याची कल्पना त्यांची होती आणि गायतोंडे यांनी या तंत्राचा मुबलक वापर केलेला आढळतो.


प्रफुल्ला डहाणूकर यांच्या सुरुवातीच्या चित्रांचा कल अर्थात मानवी आकृत्या आणि त्यांची आकर्षक मांडणी याकडे होता. प्रसिद्ध चित्रकार पळशीकर त्यांचे शिक्षक होते. पळशीकरांचा शिक्षणाबरोबर वाचन, संगीत, नाटक, साहित्य यांचा संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचा प्रयत्न असे. आज नामवंत झालेले अनेक कलाकार जे.जे.मध्ये त्या काळात शिकत होते. या काळाचे अत्यंत लोभस चित्रण प्रल्हाद अनंत धोंड यांच्या ‘रापण’ या पुस्तकात दिसते. या काळात शिकलेल्या सर्वच जे.जे.वासीयांमध्ये प्रयोगशीलता आणि एकांगी वृत्तीला नकार या गोष्टी आढळून येतात. त्या काळात प्रफुल्लाबाई गोल्ड मेडल मिळवून पदवी परीक्षा पास झाल्या. ही गोष्ट त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेषत्व दाखवते.


चित्रकार मंडळींना एकांत प्रिय असतो. सार्वजनिक जीवनाची धकाधकी त्यांना मानवत नाही; पण चित्रकलेइतक्याच प्रफुल्लाबाई बॉम्बे आर्ट सोसायटी आणि इतर संस्थांच्या कामात गढून गेलेल्या होत्या. धडपडणा-या अनेक नवीन चित्रकारांना त्यांची मदत तर मिळतच असे, पण वर्षानुवर्षे त्या तो स्नेह जपत. आशुतोष आपटेसारखा तरुण कलंदर चित्रकार समजून घेऊन त्याला मदत करणे त्यांनी केलेच; पण कारकीर्दीच्या विविध टप्प्यांवर त्यांनी मोलाची साथ दिली आणि ती कृतज्ञता तो मानतो. मला आठवते, आज मोठा चित्रकार झालेल्या कृष्णमाचारी बोससारख्या चित्रकाराची चित्रे त्यांनी पहिल्या प्रदर्शनात पाहताच त्याच्यातली प्रतिभा ओळखली होती. 25-26 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. आर्टिस्ट सेंटरमध्ये हे प्रदर्शन भरले होते आणि अनेक नवीन चित्रकारांची चित्रे त्यात समाविष्ट करण्यात आली होती.
अर्थातच अशा संस्थात्मक कामात गुंतणा-या व्यक्तीला राजकारण, गटबाजी, हिरीरीने निवडणुका लढवणे हे सारे करावे लागते; पण हे सारे करताना त्यांचे उत्साहाने वावरणे आणि त्यांचे इतर संस्थांची मदत बॉम्बे आर्ट सोसायटीला मिळवून देण्याचे कसब त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावे लागेल. आज बॉम्बे आर्ट सोसायटीची रंगशारदाजवळ उभी राहत असलेली भव्य इमारत हे त्यांच्या कामाचे फलित आहे. हे सारे करतानाच त्यांनी आपल्याकडे असलेली चित्रकलेची ज्योत सतत तेवत ठेवली होती. त्यांची उत्तरार्धातली अमूर्त चित्रे पोत आणि रंग यांचा सुरेख मेळ साधतात. भारतीय संगीतासारख्या आपल्या परंपरेशी नाते सांगतात. समुद्राच्या लाटांपासून बहरत्या निसर्गापर्यंत अनेक आकार आणि रंग याकडे ती निर्देश करतात.


पेडर रोडवर राहणा-या थोड्याथोडक्या मराठी माणसांत त्या होत्या म्हणजे एकप्रकारे एलिटच; पण हा एलिटपणा त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधी जाणवत नसे. त्यांचे नेटवरचे बहुतेक फोटो पाहिले तर या फोटोंमध्ये त्या दिलखुलास हसताना दिसतात. हे हास्य आता काळाच्या पडद्याआड गेले आहे.


shashibooks@gmail.com