आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Pro Democracy Movment In Hongkong, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अस्वस्थ हाँगकाँग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चीनच्या अधिपत्याखाली असले तरी स्वायत्त असलेल्या हाँगकाँगमध्ये लोकशाही अधिकारांसाठी चळवळ होईल असे वातावरण आजपर्यंत निर्माण झाले नव्हते. कारण हाँगकाँगची खरी ओळख ही या देशात असलेल्या आर्थिक संधींमुळे होती. ब्रिटिशांनी आपल्या वसाहतवादाच्या धोरणात हाँगकाँगला बंदरांचा विकास केला होता. त्यामुळे केवळ चीनच नव्हे तर जगभरातील हजारो निर्वासित उद्योग वा रोजगाराच्या निमित्ताने या देशात स्थलांतर करत होते. या निर्वासितांच्या व्यवहार कौशल्याने गेल्या ४० वर्षात या देशाने वेगाने प्रगती साधली. जगासाठी हा देश महत्त्वाचा आर्थिक बिंदू ठरला गेला.
अगदी २० वर्षांपूर्वी हाँगकाँगचे ब्रिटनकडून चीनकडे हस्तांतरण झाले तेव्हाही हाँगकाँगचे व्यापारी रूप टिकवण्यात येईल अशी चीनने हमी दिली होती. त्यामुळे अत्यंत शांततामय वातावरणात हाँगकाँग चीनमध्ये सामील झाला होता. पण दोन वर्षांपूर्वी चीनचे अध्यक्ष म्हणून शी जिनपिंग यांची निवड झाली तेव्हापासून कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असलेल्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने (एनपीसी) हाँगकाँगच्या प्रशासनात ढवळाढवळ करण्यास सुरुवात केली. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे या पक्षाने २०१७ मध्ये हाँगकाँगमध्ये होणा-या निवडणुकांमध्ये उमेदवार निवडीत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. या पक्षाने सुमारे १२०० सदस्यांमधून कम्युनिस्ट पक्षाच्या प्रभावाखाली असलेले तीन किंवा चार उमेदवार निश्चित केले असून यापैकी एकाकडे हाँगकाँगच्या प्रशासनाची किल्ली देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाविरुद्ध हाँगकाँग पेटला आहे.
हाँगकाँगमधील प्रमुख अशा कॅनॉट रोडवर हजारो विद्यार्थी, नागरिक, साहित्यिक, कॉर्पोरेट कंपन्यांमधील अधिकारी चीन सरकारच्या विरोधात उतरले आहेत. हाँगकाँगच्या आंदोलकांचे म्हणणे असे आहे की, २०१७ मध्ये होणा-या निवडणुका या मुक्त वातावरणात व्हाव्यात व त्यावर चिनी कम्युनिस्ट पार्टीचा अंकुश नसावा. आंदोलकांनी एनपीसीचा निर्णय मागे घेण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या या आंदोलनाला आता हिंसक रूप येत आहे. येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल पण हाँगकाँगमधील ही लोकशाही चळवळ चीनसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.