आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकाशन संस्थेतील 'महाभारत'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवद्गीतेला केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या गीता प्रेरणा महोत्सवामध्ये बोलताना नुकतीच केली होती. या मागणीवरून बराच गदारोळ उठला होता. भगवद्गीतेचे नेमके स्थान काय हे जेव्हा ठरायचे तेव्हा ठरेल, पण भारतीय परंपरेतील तो एक प्राचीन ग्रंथ आहे ही बाब नजरेआड करता येणार नाही.
भगवद्गीता, वेद, उपनिषदे, पुराणे, तुलसीदासांचे रामचरितमानस आदी प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून त्यांच्या संशोधित व संपादित आवृत्त्या प्रसिद्ध करण्याचे मोलाचे काम उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या गीता प्रेसने १९२३ या वर्षापासून सुरू केले. या ग्रंथांच्या कोट्यवधी प्रती आजवर खपल्या आहेत. २०२३ मध्ये गीता प्रेसचे शताब्दी वर्ष आहे. मात्र, तो योग साधेपर्यंत गीता प्रेसला अनेक अडचणींतून जावे लागणार असे त्या संस्थेच्या सध्याच्या अवस्थेवरून दिसत आहे. गीता प्रेसमधील कर्मचारी वाढीव वेतनाची मागणी करीत असून त्यावरून त्यांचा संस्थेच्या व्यवस्थापनाशी संघर्ष सुरू आहे. कर्मचारी व व्यवस्थापन यांच्यातील बोलणी फिसकटल्याने गीता प्रेसच्या व्यवस्थापनाने मंगळवारपासून बेमुदत टाळेबंदी जाहीर केली आहे. गेल्या एक महिन्यापासून परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल आम्हाला उचलावे लागले असे गीता प्रेसचे विश्वस्त देवीदयाल यांचे म्हणणे आहे. १८५ कायमस्वरूपी तर कंत्राटी तत्त्वावर काम करणारे तीनशे कर्मचारी व व्यवस्थापनामध्ये वेतनवाढ, भत्ते आदींच्या मागण्यांवरून १९९२ पासून झगडा सुरू आहे. भगवद्गीता या ग्रंथामध्ये सर्व प्राणिमात्र समान आहेत असाही एक संदेश आहे. मात्र तो ग्रंथ छापणा-या गीता प्रेसच्या व्यवस्थापनाला आपल्या कर्मचा-यांना न्याय द्यावा असे काही वाटलेले दिसत नाही.
थोडक्यात, भगवद्गीतेचा जो काही संदेश असेल तो पुस्तकात, प्रत्यक्ष व्यवहारात मात्र तो आचरायचा नाही असे यांचे तत्त्व दिसते. भारतीय संस्कृतीतील प्राचीन ग्रंथ ना नफा ना तोटा तत्त्वावर प्रसिद्ध करणा-या प्रकाशन संस्था आधीच या देशामध्ये विरळ होत चालल्या आहेत. गीता प्रेसमधील बेमुदत टाळेबंदी जर अशीच कायम राहिली तर या संस्थेला वाचविण्यासाठी व तेथील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्कृतिरक्षक म्हणविणा-या मोदी सरकारने शर्थीचे प्रयत्न करणे आवश्यक आहे.