आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल यांनी गांधी तर बनून दाखवावं!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी चार-पाच वर्षांपूर्वी दैनिक ‘भास्कर’ मध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखाचे शीर्षक होते, ‘राहुल जैसा कोई और नहीं’. परंतु यादरम्यानच्या काळात माझ्या सगळ्या आशेवर हळूहळू पाणी फेरले गेले. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील निवडणुकांनी काँग्रेसच्या या उदयोन्मुख तार्‍याला प्रभावहीन करून टाकले. तसेच देशात इतकी मोठाली आंदोलने, निर्भयाकांड घडले, परंतु राहुल गांधींनी या प्रकरणी मौन बाळगल्याने संपूर्ण देश हतबुद्ध झाला. पण राहुल गांधींच्या तोंडून आता अशी काही वक्तव्ये निघाली आहेत की, त्यातील एक शतांश हिस्साही त्यांनी करून दाखवला तर ‘राहुलसारखा दुसरा कोणी नाही’ असे मीच नव्हे तर संपूर्ण देश म्हणेल.

राहुलनी म्हटले आहे की, ते पंतप्रधान बनू इच्छित नाहीत. त्यांच्या या गोष्टीवर देश विश्वास ठेवील, कारण गेल्याच महिन्यात त्यांनी सत्ता म्हणजे विष असल्याचे जयपूरच्या अधिवेशनात म्हटले होते. त्यांच्या आजी आणि वडिलांनी ते प्यायले होते. त्या पेल्यातले भूत त्यांना दिसत असेल तर स्वाभाविक आहे. मग त्यांनी काँग्रेसचे सरचिटणीसपद आणि उपाध्यक्षपद का स्वीकारले? हा सत्तेचा प्याला नाही काय? ही तर महासत्ता आहे, म्हणजे केवळ सत्तेचा प्याला नसून मोठे भांडे आहे. कम्युनिस्टांच्या हुकूमशाही राज्यात असायचे त्याप्रमाणे आज सरकारपेक्षा पक्ष वरचढ आहे. पंतप्रधानांपेक्षा पक्षाध्यक्ष तर मंत्र्यांवर सरचिटणीस वरचढ ठरतो आहे. पक्षाच्या हुकूमशाहीपेक्षा घराणेशाहीचा वरचष्मा हा लोकशाहीसाठी धोकादायक असतो. राहुल गांधींनी कोणतेही पद स्वीकारले नसते तर देशाने त्यांना खरोखरच मोठा नेता मानले असते. पक्षात पद एखाद्याच्या पात्रतेमुळे नव्हे तर कृपेने मिळते. आपणास कोणत्याही पदाची लालसा नाही, परंतु आपण देशाची सेवा करू इच्छितो, असे म्हणून त्यांनी पद न स्वीकारता सिद्ध करून दाखवले असते. चार-पाच वर्षांपूर्वी ते गावोगाव फिरत होते. गरिबांच्या घरात राहत होते, झोपत होते आणि आपल्या नजरेने देशाची ओळख करून घेत होते.
तेव्हा लोकांना वाटले होते की, हा तरुण भारतीय राजकारणाची नवी व्याख्या तयार क रण्यासाठी निघालेला आहे.

अनेक दशकांपासून ठरावीक साच्याचे राजकारण करणार्‍या सगळ्या पक्षांच्या खडूस नेत्यांनाही घाम फुटत होता. फार दिवसही उलटून गेले नसतील, पण ‘यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे’ असे लोक ांना माहिती झाले आहे. खाण्याचे दात जयपूरमध्ये दिसले. राहुल गांधींनी आपल्या आईचा आशीर्वाद घेतला आणि सरचिटणीसपदावरून उपाध्यक्षपदाची शिडी चढले, दरबारी लोकांनी घोषणांनी देश दुमदुमून सोडला. भावी पंतप्रधानाच्या नावे घोषणा देण्यात आल्या. पण राहुल तर म्हणतात, मला पंतप्रधान व्हायचे नाही. मग हे दरबारी काय करतील? खरा राजभक्त दरबारी तोच असतो, जो राजाच्या हो ला हो लावतो. ते आता तर आणखीच खुश होतील. आता प्रत्येकाचा प्रयत्न हाच राहील की राहुलचे ‘मनमोहन’ आपण कसे बनणार! मग राहुल स्वत: सोनिया गांधी बनू शकतील काय? सोनियांची सोनिया बनणे ही मजबुरी होती, पण राहुल तर गांधी बनू पाहत आहेत. राजीव, इंदिराजी आणि नेहरूंपेक्षा पुढे जाण्याची आकांक्षा आहे. गांधी म्हणजे काय? फिरोज गांधी की राजीव गांधी किंवा महात्मा गांधी! राहुल गांधींनीच म्हटले आहे की, त्यांचे आदर्श महात्मा गांधी आहेत. ते खरोखरच त्यांच्या मार्गाने जाऊ लागले होते; पण न जाणो काय झाले, आता त्यांना पंतप्रधानपदही महत्त्वपूर्ण नाही असे वाटू लागले आहे. जर ते गांधींंना आपले आदर्श मानत असतील तर काँग्रेस उपाध्यक्ष आणि खासदारकीला चिकटून का बसले आहेत? वर्षभरानंतर या पदालाही फारसे महत्त्व उरले नाही आणि राहुल जर गांधी बनू शकले आणि त्या गांधींच्या मार्गावर थोडीफार वाटचाल केली तर कित्येक पंतप्रधानांपेक्षा लोक त्यांनाच स्मरणात ठेवतील, कृतज्ञ राहतील. तसे पाहता एखाद्या सच्चा नेत्यालाही पंतप्रधानपदाची इच्छा व्हावी असा सन्मान आता त्यात उरलेलाच नाही. राहुलनी ते पद नाकारले, हे चांगलेच केले.

पण त्यांनी असे समजून-उमजून केले की पत्रकारांसमोर अनवधानाने काही भलतेसलतेच बोलून गेले? बहुतेक जीभ घसरली असावी. नाही तर, मला मुलेबाळे झाली तर तीसुद्धा घराणेशाही आणतील म्हणून मी लग्नच करणार नाही, असे बोलून गेले नसते. लग्न झाल्यानंतर मुले झालीच असती असेही नसते. तसेच ज्यांना मुले झाली, ते सर्व नेते भ्रष्टाचारी असतात, असेही नाही. गांधीजींना चार मुले होती. ज्या राजकारण्यांना मुलेबाळे नाहीत किंवा ज्यांनी लग्नच केलेले नाही, तेसुद्धा आदर्श राजकारणी आहेत असेही नाही. आपल्या देशातील अनेक अविवाहित आणि निपुत्रिक नेत्यांनी आपल्या भ्रष्ट वर्तनाची अनेक उदाहरणे दाखवून दिली आहेत. जर राहुल गृहस्थीच्या झंझटीपासून दूर राहू इच्छित असतील आणि देशाची सेवा करू इच्छित असतील तर त्यांचे कोण स्वागत करणार नाही? पण यामागील भाव वेगळे असतील तर तो गुंता सिग्मंड फ्राइड किंवा एडलर वा जुंगसारखे मनोविश्लेषक सोडवू शकतील.

राहुल काँग्रेसच्या सत्तेचा ढाचा बदलू पाहत आहेत. पक्षाचे धोरण 10-20 नाही तर 500 लोकांनी ठरवावे. त्यामुळे अंतर्गत लोकशाही साकार होईल. हे अफलातून विचार आहेत. हे विचार जर प्रत्यक्षात साकारण्यात आले, तर भारतातील सगळे पक्ष सुधारतील. जवळपास सर्वच पक्ष काँग्रेसची नक्कलच करत असतात. प्रादेशिक पक्ष तर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्याच बनलेल्या आहेत. अखिल भारतीय पक्ष मूठभर लोकांच्या हातात बंदिस्त झालेले आहेत. जर आमच्या पक्षात अंतर्गत लोकशाही टिकली तर भारत देश प्रत्यक्षात सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जाईल. आपल्या डोक्यावर सत्तेचा मुकुट आणि खांद्याला तलवार लटकवण्याची इच्छा ज्या लोकांना असते, त्यांच्यात या सद्विचारांना अंतिम स्वरूप देण्याचे सामर्थ्य नसते. डोक्याला कफन बांधून आणि तलवारीच्या धारेवर ज्यांची चालण्याची इच्छा असते त्या व्यक्तीच अशी क्रांतिकारी कामे करू शकतात. हे महात्मा गांधींनी करून दाखवले. स्थितप्रज्ञासारखे किल्ल्याच्या पायर्‍या चढताना परिवर्तनाच्या गप्पा मारणे सोपे आहे, पण हे परिवर्तन अशक्य नाही. अट इतकीच आहे, कोणी कधीतरी राहुल गांधी होऊन तर दाखवा!