आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झुकझुक आगगाडी ते हायस्पीड ट्रेन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरीबंदरहून 16 एप्रिल 1853 रोजी दुपारी ठीक 3.35 वाजता 14 डबे आणि सिंध, साहिब आणि सरदार या इंजिनांच्या आशियातील पहिल्या आगगाडीने अनेक प्रतिष्ठितांना बरोबर घेऊन ठाण्याच्या दिशेने कूच केले.

मुंबई आणि ठाणेदरम्यान आशिया खंडातील पहिली रेल्वेगाडी धावली. त्या ऐतिहासिक घटनेला यंदा 160 वर्षे पूर्ण होत आहेत. या कालखंडातील अनेक राष्‍ट्रीय-आंतरराष्‍ट्रीय, सामाजिक, आर्थिक, तांत्रिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण घटनांची आणि स्थित्यंतरांची भारतीय रेल्वे साक्षीदार ठरली आहे. भारतीय रेल्वेने या वाटचालीत यशाची अनेक शिखरेही पादाक्रांत केली आहेत. आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक वेगवान, अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायक रेल्वेप्रवास
उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र भारतीय रेल्वेला गेल्या काही वर्षांमध्ये अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. भारतात आणीबाणीप्रसंगी सैन्याची जलद ने-आण करण्यासाठीही लोहमार्गांच्या बांधणीचा आग्रह तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड डलहौसीने धरला होता. त्यानुसार 1849मध्ये ग्रेट इंडियन पेनीनसुलार रेल्वे कंपनीची स्थापना होऊन मुंबई आणि ठाणेदरम्यान लोहमार्ग उभारण्यास सुरुवात झाली. तिकडे ईस्ट इंडियन रेल्वे कंपनीनेही कोलकात्याहून लोहमार्ग टाकण्यास सुरुवात केली होती. त्या आधी मद्रास आणि अन्य प्रांतांनीही लोहमार्ग उभारण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते.

अखेर 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईतील बोरीबंदरहून दुपारी ठीक 3.35 वाजता 14 डबे आणि सिंध, साहिब आणि सरदार या इंजिनांच्या आशियातील पहिल्या आगगाडीने अनेक प्रतिष्ठितांना बरोबर घेऊन ठाण्याच्या दिशेने ऐतिहासिक कूच केले. त्या रेल्वेगाडीला पाहण्यासाठी लोहमार्गाच्या दुतर्फा प्रचंड जनसमुदाय जमा झाल्याची नोंद आहे. त्यानंतर चारच वर्षांनी 1857च्या स्वातंत्र्यसमराने लोहमार्गांची आवश्यकता अधिक ठळक केल्याने पुढील काळात भारतात लोहमार्गांचे जाळे झपाट्याने विस्तारत गेले. त्याच वेळी गव्हर्नर-जनरल, ब्रिटिश अधिकारी आणि युरोपियन यांच्यासाठी ब्रिटिश भारतातील महत्त्वाच्या शहरांना जोडणा-या मेल रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या. त्या गाड्यांमध्ये विविध सुविधा पुरवलेल्या असत. त्यातून रॉयल मेलचीही वाहतूक केली जात असे. सध्या सुरू असलेल्या पंजाब मेल, सुवर्णमंदिर मेल, मुंबई-हावडा मेल, चेन्नई मेल त्यांपैकीच काही. आज प्रवासी वाहतुकीमध्ये भारतीय रेल्वे जगात पहिल्या, तर मालवाहतुकीत चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय रेल्वे आपली सामाजिक बांधिलकी जपतानाच दुसरीकडे पर्यटकांसाठी खास पॅलेस ऑन व्हिल्स, डेक्कन ओडिसी, महाराजा, गोल्डन चॅरियट अशा आलिशान रेल्वेगाड्याही चालवत आहे. आता अनुभूती हा अधिक आरामदायी डबाही लवकरच प्रवाशांच्या सेवेत येत आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे, काश्मीर तसेच ईशान्येकडील अनेक आव्हाने लीलया पेलली आहेत. वाफेच्या इंजिनांची जागा अत्याधुनिक डिझेल आणि विद्युत इंजिने घेत आहेत. इंजिने, डबे, लोहमार्ग, सिग्नलिंग आदींच्या उभारणीतही विविध देशांचे सहकार्य घेतले जात आहे. केवळ 34 किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाचा विस्तार आज 64,014 किलोमीटर झाला आहे. संगणकीकृत आरक्षण यंत्रणेद्वारे कोठूनही कोणत्याही गाडीचे आरक्षण करणे शक्य झाले आहे.

आज भारतीय रेल्वेवरील सर्वात वेगवान गाडी (ताशी 150 किलोमीटर) नवी दिल्ली आणि भोपाळ दरम्यान धावणारी शताब्दी एक्स्प्रेस असली तरी लवकरच ताशी 200 किलोमीटर वेगाने धावणा-या रेल्वेगाड्या सुरू होणार आहेत. भारतीय रेल्वेचे आजपर्यंतचे सर्वांत शक्तिशाली अत्याधुनिक डिझेल इंजिन (साडेपाच हजार अश्वशक्ती) डब्ल्यू.डी.जी.-5 लवकरच सेवेत येणार आहे. त्यात चालकांसाठी स्वच्छतागृहाची सोय असणार आहे. सध्या भारतीय रेल्वेकडे डब्ल्यू.ए.जी.-9, डब्ल्यू.ए.पी.-5 आणि 7 ही सहा हजार अश्वशक्तीची अत्याधुनिक, वेगवान विद्युत इंजिने असली तरी रेल्वेवरील वाढती मागणी लक्षात घेऊन आता नऊ हजार अश्वशक्तीच्या विद्युत इंजिनांचा विकास करण्यात येत आहे.

त्याच वेळी ही इंजिने अधिक पर्यावरणपूरक असतील याकडेही लक्ष दिले जात आहे. 2012-13मध्ये भारतीय रेल्वेने एक अब्ज टनांपेक्षा जास्त मालवाहतूक करून रशिया, चीन आणि अमेरिका यांच्या विशिष्ट गटात प्रवेश केला आहे. मालगाड्यांसाठी विशेष लोहमार्ग उभारण्याचेही काम आता सुरू झाले असून पूर्व डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 2017मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. टक्कर व अपघात प्रतिबंधक यंत्रणा यांसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश भारतीय रेल्वेमध्ये करण्यात येत आहे.