आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Railway By Vivek Musale, Divya Marathi, Interim Railway Budget

महाराष्ट्राला अधिक रेल्वेगाड्या शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेब्रुवारी 2014 चा रेल्वे अर्थसंकल्प हा हंगामी स्वरूपाचा होता, परंतु हंगामी रेल्वे अर्थसंकल्प असो अथवा संपूर्ण वर्षाचा रेल्वे अर्थसंकल्प असो; त्यात महाराष्ट्राला काही फारसे फायदे मिळत नाहीत, ही नेहमीचीच जनभावना असते हे अनेक वर्षांतील रेल्वे अर्थसंकल्पांच्या बातम्यांतून स्पष्ट दिसत असते. याचा विचार करत असताना हे का होते, याची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न केला तर जे काही दिसले त्याची चर्चा करूया.
1] एक तर रेल्वेकडून महाराष्ट्राला कोणत्या अपेक्षा आहेत, यावर फारशी चर्चा होत नाही आणि झालीच तर ती फक्त रेल्वे बजेटच्या काळातच थोडीशी होते.
2] दुसरे कारण असे की, ज्या काही मागण्या होतात त्या ब-याचदा अशा स्वरूपाच्या असतात की, त्यात रेल्वेला अधिकतम साधनसामग्रीची जरूर भासणार असते आणि निधीच्या उपलब्धतेची नेहमीच रेल्वेकडे कमतरता असते.
वरील मुद्दे लक्षात घेऊन काही अभ्यास केलेला आहे आणि अधिकतम साधनसामग्रीचा प्रश्न पडणार नाही, अशा मागण्या कशा करता येतील, हे बघू.
मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, म्हणून तेथून महाराष्ट्रात पोहोचणा-या आणि येणा-या गाड्या या अधिक असतात. मुंबईला दररोज सकाळी येऊन संध्याकाळी परतणा-या अशा पुणे, नाशिक, मनमाडहून येणा-या-जाणा-या गाड्या अनेक आहेत. तशाच मुंबईहून सकाळी पुणे येथे जाणा-या गाड्या मध्य रेल्वे चालवते. तशाच काही बलसाड, सुरतहून मुंबईला सकाळी येऊन संध्याकाळी बलसाड, सुरतला परतणा-या गाड्या आहेत. पश्चिम रेल्वेवर वडोदरा ते भिलाड अशी सकाळी भिलाडला येऊन सायंकाळी चार वाजता वडोद-याला परतणारी गाडी आहे. या सर्व गाड्या मुंबई सेंट्रल, लोकमान्य टर्मिनस कुर्ला, पुणे, भिलाड अशा स्टेशनच्या यार्डात सर्वसाधारणपणे सकाळी 11 ते सायंकाळी 5 च्या काळात ‘रिकाम्या’ उभ्या असतात. या सर्व गाड्यांचे डबे आणि इंजिने ही सकाळी 3 ते 5 तास आणि सायंकाळी 4 ते 6 किंवा 5 ते 8/9 इतकाच वेळ रुळावरून धावतात. म्हणजेच दिवसाच्या 24 तासांपैकी फक्त 6 ते 8 तासच उपयोगात आणले जातात. याचाच अर्थ असा होतो, की रेल्वेच्या उपलब्ध साधनसामग्रहीचाही योग्य वापर होत नाही.
पुण्यातील मुंबईला येणारे दररोजचे ‘पास’धारक हे पुणे-मुंबई-पुणे धावणा-या ‘डेक्कन क्वीन’चा ‘वाढदिवस’ दरवर्षी थाटामाटात ‘साजरा’ करतात. सुरत-मुंबई धावणारी (फ्लाइंग राणी) आणि ‘डेक्कन क्वीन’ यांचे डबे ‘खास’ अशा रीतीने तयार केलेले आहेत आणि असे ‘खास’ किमतीचे डबे हे पर्याप्त रीतीने न वापरणे म्हणजे रेल्वेच्या पैशाचा एक प्रकारचा ‘अपव्यय’च आहे, असे दिसते आणि म्हणूनच या ‘स्पेअर कपॅसिटीचा’ उपयोग करून नव्या रेल्वेगाड्या महाराष्ट्राला म्हणजे सध्या निदान मुंबई-नाशिक-पुण्याला तरी जास्त रेल्वेगाड्या सहजपणे केवळ टाइम मॅनेजमेंटने प्राप्त करून देता येतील. उदा. डेक्कन क्वीनच्याच डब्याचे मुंबई-चिंचवड-मुंबई नॉनस्टॉप एक्स्प्रेस, फ्लाइंग राणीचे डबे वापरून फ्लाइंग प्रिन्सेस, मुंबई-डहाणू-अंबरनाथ-मुंबई दोन थांबे एक्स्प्रेस, पंचवटीच्याच डब्यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस-रोहा परत सुपरफास्ट अशा अनेक नव्या गाड्या केवळ स्पेअर कपॅसिटी वापरूनच चालू होऊ शकतात.


वडोदरा-भिलाड एक्स्प्रेस सकाळी 11 ते दुपारी 4 भिलाडला पडून राहते, ती डहाणूपर्यंत वाढवता येईल. त्याचप्रमाणे मुंबई-पुणे ज्या गाड्या पुणे यार्डात दिवसभर ‘वामकुक्षी’ घेतात, त्या दौंड, बारामतीपर्यंत वापरता येतील. जेणेकरून दौंड-बारामतीकरांना मुंबईला थेट जाणा-या तिथून सुटणा-या गाड्या अस्तित्वात येतील. यास पुणेकर थोडा विरोध करू शकतील, परंतु जर पुण्यासाठी तीन चतुर्थांश डब्बे राखीव ठेवले तर मार्ग सापडू शकेल आणि नव्या सोयी अस्तित्वात येऊ शकतील. गाड्या कोणत्याही रेल्वे यार्डात ‘रिकामटेकड्या’ चक्क सहा ते आठ तास ठेवण्यापेक्षा त्या त्याच काळात सहा-सात तास फिरून जवळपासची फेरी करून आल्या तर साधनसामग्रीचा अधिकतम आणि पर्याप्त असा उपयोग होऊन त्यात जनतेचा आणि रेल्वेचा असा दुहेरी फायदा होईल.


अर्थात, असे विषय आता रोटरी, सायन्स, जस्टिस जायंट्स अशा सोशल क्लब्जने हाती घेऊन त्यासाठी उपक्रम करणे जास्त उचित ठरेल. कारण त्यांच्या शाखांचे जाळे हे भारतभरच नव्हे तर चक्क जगभर विखुरलेले आहे आणि ते उपक्रमांच्या पाठपुराव्यासाठी इतरत्रदेखील मदत मागू शकतात. रेल्वे प्रवासी संघटना या अजून स्थानिक स्वरूपाच्या असल्याने त्या स्थानिक मागण्या जास्त करून करतात. त्यांचा साधनसामग्रीचा पर्याप्त उपयोग हा दृष्टिकोन किंवा हेतू नसतो. म्हणूनच सोशल क्लब्ज आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स यांसारख्या संस्थांनी महाराष्ट्रात जास्तीत जास्त रेल्वे धावू शकतील, याकडे लक्ष पुरवणे अधिक लाभदायी ठरावे. असे घडो ही प्रार्थना आणि अपेक्षा.


vnmusale@gmail.com