आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Article On Raj Thackeray And His Blue Print Timing, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्ल्यू प्रिंटची टायमिंग मिस्टेक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवडणुकीच्या काळात काही योजनांच्या घोषणा कानांनी ऐकायला, डोळ्यांनी पाहायला आणि जिभेने वाचायला लोकांना आवडतात. नंतर त्याबद्दल कुणी फारसे विचारत नाही. त्यामुळे प्रचाराचे ढोल वाजू लागताच घोषणांचे जाहीरनामे, वचननामे बाहेर पडतात. नव्या पिढीसाठी त्याचे नामकरण ‘ब्ल्यू प्रिंट’ असे करण्यात आले आहे. त्याचे पेटंट अर्थातच राज ठाकरे यांनी चार-पाच वर्षांपूर्वीच घेऊन टाकले. त्यामुळे भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीवाले त्याकडे फिरकलेच नाहीत.

मात्र, राजकीय वैरी असला तरी भाऊच आहे ना, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पेटंटमधील निम्मा भाग घेतला. महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट कशी तयार करायची, हे ठरवण्यासाठी दोन्ही भाऊ दिवस-रात्र कार्यकर्त्यांना हाताशी धरून अभ्यासाला लागले.
पण मध्येच थोडी गडबड झाली. कार्यकर्त्यांऐवजी टाटा कन्सल्टन्सीच्या मदतीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी, असे मनात येताच राज यांनी अभ्यास थांबवला. या दिरंगाईचा फायदा घेत उद्धव यांनी बाजी मारली. तेरा शहरांत शिवसेनेच्या पदाधिका-यांना समोर बसवून त्यांनी त्यांची ब्ल्यू प्रिंट वाचून दाखवली. त्याचे ब-यापैकी कौतुकही झाले. त्यामुळे राज काहीसे हबकले, नाराज झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही. नवनिर्माणची ब्ल्यू प्रिंट जाहीर करण्यासाठी त्यांनी घटस्थापनेचा मुहूर्त निवडला. तेव्हा प्रिंटमधील प्रत्येक मुद्द्यावर घनघोर चर्चा होईल, अशी त्यांची अपेक्षा होती. राज टायमिंगचे बादशहा मानले जातात. कुठे, कधी आणि कसे बोलावे, याचा त्यांना अचूक अंदाज आहे.
पण त्यांचे ब्ल्यू प्रिंटचे टायमिंग चुकले. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपचा काडीमोड आणि राज यांचे प्रिंट वाचन एकाच वेळी सुरू झाले. मराठी माणसाला काडीमोडातच स्वारस्य असते. या टायमिंग मिस्टेकमुळे राज यांना अपेक्षित चर्चा झाली नाही. यातील बहुतांश योजना राज यांच्या विकासदृष्टीची जाणीव करून देणा-या आहेत. पुढील काळात सत्तेची समीकरणे जमली तर यातील काही योजना प्रत्यक्षात येतील, असा विचार करण्यास कुणाची हरकत आहे काय?