आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Reconstruction Of Republican Parties By Sandesh Pawar, Divya Marathi

रिपब्लिकन पक्षाच्या पुनर्बांधणीची गरज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ने शिवसेना-भाजपसोबत तीन वर्षांपूर्वी महायुती केली. जागावाटपावरून महायुती फुटल्यामुळे रामदास आठवलेंना नाइलाजाने शिवसेनेला सोडून द्यावे लागले. भाजपसोबत युती करावी लागली. याचे कारण आठवलेंना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली, तसेच केंद्रात मंत्री बनण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे भाजपने दिलेल्या आश्वासनामुळे आठवलेंनी सेना सोडून त्यांच्याबरोबर युती केली आहे. मंत्रिपदासाठी विधानसभेच्या जागांवर पाणी सोडले आहे.
रिपाइंसाठी भाजपने राज्यभरात केवळ आठ जागा सोडल्या आहेत, त्या जागांवरील उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्मही मिळाले नसल्याने ते अपक्षच लढणार असून पक्षाच्या नावावर केवळ तीनच उमेदवार लढतील, असे चित्र आहे. परिणामी पक्षात प्रचंड नाराजी असून अनेक मोठे नेते - कार्यकर्ते आठवलेंना सोडून जात आहेत. ज्येष्ठ रिपाइं नेते अर्जुन डांगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आठवले यांची साथ सोडली. काकासाहेब खंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या अध्यक्ष व माजी मंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे या लोकसभेला काँग्रेससोबत होत्या. मात्र काँग्रेसने विधानसभेला जागा न सोडल्याने त्यांनी भाजपला साथ दिली आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने लोकसभेवेळी तयार केलेल्या महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने (एमडीए) महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढत आहेत.
बाळासाहेब नेहमीच आपल्या तत्त्वांशी ठाम राहिलेले दिसतात. ते या मोठ्या पक्षांच्या दावणीला स्वतःला बांधून घेत नाहीत. आपली अथवा पक्षाची या मोठ्या पक्षांच्या मागे फरपट होऊ देत नाहीत. यशापयशाची ते पर्वा करीत नाहीत. प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने या वेळी प्रथमच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. छोट्या पक्षांना बरोबर घेत संविधान मोर्चा स्थापन करून, महाराष्ट्र डावी लोकशाही आघाडीसोबत ५० पेक्षा जास्त जागा लढवत आहेत. रा. सू. गवईंचे सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांच्या रिपाइंला (जो मूळ रिपाइंचा प्रवाह आहे) अन्य कोणत्याच मोठ्या राजकीय पक्षाने (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप) जवळ केले नाही तसेच भारिप व बसपनेही साथ दिली नाही. त्यांनी राजकारणात अदखलपात्र ठरलेल्या छोट्या पक्ष-संघटनांना सोबत घेत महाशक्ती निर्माण केली आहे.

प्रा. जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टी लोकसभेपासून काँग्रेससोबत निवडणूक लढवत आहे. त्या बदल्यात काँग्रेसने त्यांना विधान परिषदेवर नियुक्त केले आहे. ते आमदार झाले आहेत. आता विधानसभेलाही ते काँग्रेससोबत युती करून लढत आहेत. त्यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीला काँग्रेसने पाच जागा दिल्या. या जागा काँग्रेसच्या निवडणूक चिन्हावरच लढणार आहेत. पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे गंगाधर गाडे अनेक पक्षांचा प्रवास करून आता विधानसभेत ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षामार्फत लढत आहेत. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज संसारे कुणाशीही युती न करता लढत आहेत. याशिवाय अन्य अनेक छोटे गट विविध राजकीय पक्षांसोबत स्थानिक पातळीवर साथ देत आहेत. त्यामुळे आंबेडकरी जनता संभ्रमित अवस्थेत आहे. रिपाइंची विखुरलेली राजकीय ताकद क्षीण झालेली आहे. त्यामुळे राजकारणात ती दखलपात्र समजली जात नाही.

अनेक रिपब्लिकन नेते रिपाइंचे गट वेगवेगळ्या नावाने चालवत (?) आहेत. परंतु सद्य:स्थितीत कोणताच गट प्रभावी राहिलेला नाही. अगदी आंबेडकर गट व आठवले गटही चाचपडताना दिसताहेत. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्रात लिहिल्याप्रमाणे ज्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना नागपूर येथे ३ ऑक्टोबर १९५७ रोजी झाली आहे, त्या पक्षाला उभे करण्यासाठी कोणतेही नेते पुढे येताना दिसत नाहीत. स्थापनेपासून कायम एकी-बेकीचा इतिहास राहिलेल्या या पक्षाला एन. शिवराज, दादासाहेब गायकवाड, रा. सू.गवई, रामदास आठवले, राजेंद्रन एस. हे अध्यक्ष लाभले. मात्र, स्थापनेपासून आजपर्यंत या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकलेली नाही. अल्प काळ महाराष्ट्र, पंजाब व हिमाचल प्रदेश या राज्यांत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली खरी; पण फाटाफुटीमुळे तीही टिकू शकली नाही. परिणामी मिळालेले ‘हत्ती’ हे चिन्ह व पुढे मिळालेले ‘उगवता सूर्य’ निवडणूक चिन्हही हा पक्ष गमावून बसला. आजच्या घडीलाही कोणत्याच रिपाइं गटाला निवडणूक आयोगाची मान्यताही नाही. स्वतःचे निवडणूक चिन्हही नाही. ते मिळवण्यासाठी कोणाचे प्रयत्नही दिसत नाहीत.

आजवर रिपाइं ऐक्यवादी पक्षाचे अध्यक्षपद व युती कुणाबरोबर करावी, या दोन प्रमुख मुद्द्यांवरूनच अनेकदा फुटले आहे. हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे पुनर्रचित रिपब्लिकन पक्षाचे राजकीय युती, आघाडी करण्यासाठी धोरण काय असावे? त्याचे आधार काय असावेत? रिपब्लिकन पक्षाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम काय असावेत? हे ठरवण्यासाठी पक्षात एक कोअर कमिटी निर्माण केल्यास व त्यानुसार धोरण ठरवल्यास त्याचा निश्चितपणे लाभ होऊ शकतो. रिपाइंच्या घटनेप्रमाणे रिपाइंच्या मतदारांचा पाया असणा-या एससी, एसटी, ओबीसी, बौद्ध या प्रमुख चार घटकांना रिपाइंच्या झेंड्याखाली आणण्यासाठी पक्षीय पातळीवर, धोरणात्मक व संघटनात्मक पातळीवर या समूहांना सामावून घेणे गरजेचे आहे.

रिपब्लिकन पक्षाला मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवून देण्याच्या भूमिकेतूनच पुढील लोकसभा निवडणूक लढवण्याची गरज आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन रिपाइंने रणनीती आखायला हवी. चार राज्यांत सहा टक्क्यांपेक्षा अधिक मते लोकसभा निवडणुकीत मिळवली पाहिजेत. तसेच चार राज्यांत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यताही मिळवली गेली पाहिजे. अन्य राज्यांतून खासदार निवडून आले पाहिजेत.

सध्या रिपाइं पक्ष डॉ. राजेंद्र गवई यांच्याकडे आहे. त्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रन एस.( कर्नाटक) आहेत. मात्र इतक्या वर्षांत त्यांनी मूळ रिपाइंला निवडणूक आयोगाची ना मान्यता मिळवून दिली, ना निवडणूक चिन्ह! शिवाय लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांत रिपाइंच्या नावावर एखाद-दुसरीच जागा लढवतात. त्यातही अपयश. त्यामुळे हा मूळ पक्ष वाढणार कसा? राष्ट्रीय पक्ष बनणार कसा ? निवडणूक चिन्ह मिळणार कसे ? हा प्रश्न आहे. रिपाइंचा मतदार हा अनु. जाती (१६.२० टक्के), अनु. जमाती (८.२० टक्के), ओबीसी(५२ टक्के) व बौद्ध (०.८ टक्के) असा जवळपास ८० टक्के आहे. त्याची योग्य गुंफण केल्यास रिपाइं राष्ट्रीय पक्ष बनू शकतो. स्वतंत्र निवडणूक चिन्हही मिळू शकते.

रिपाइंच्या सर्व नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तरी भानावर येऊन मूळ रिपाइंची पुनर्बांधणी, पुनर्रचना करण्याची गरज आहे. पक्षाचा जो सामाजिक आधार आहे, त्यास पक्षात सामावून घ्यावे, महत्त्वाची पदे बौद्धेतर समाजाला द्यावीत. अधिकाधिक जागांवर रिपाइंचे सक्षम उमेदवार उभे करून ताकदीनिशी लढल्यास यश दूर नाही.

महायुतीसोबत गेलेल्या रामदास आठवलेंची जागावाटपावरून टोलवाटोलवी झाली ती सा-यांनी पाहिली आहे. त्यामुळे आता आव्हान स्वीकारण्यासाठी कोणते रिपाइं नेतृत्व पुढे येते, ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रिपाइंचे चार प्रमुख नेते जर मूळ रिपाइंला उभे करण्यास पुढे येत नसतील, तर समाजातील (सर्व) नव्या नेतृत्वांनी पुढे येऊन आव्हान स्वीकारायला हवे. तसे झाल्यास प्रस्थापित नेतृत्व आपसूकपणे बाजूला सारले जाईल. या विधानसभेच्या निकालाने प्रस्थापित रिपाइं नेतृत्वाला जबर झटका मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही.