आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या इंजिनाला वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जपान आणि युरोप मंदीत सापडला असताना, चीनचा विकास दर घटत असताना आणि भारतातील मागणी वाढत नसताना देशाची अर्थव्यवस्था पटरीवर आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी रेपो रेट पाव टक्क्याने कमी करून ७.७५ केला आहे. इतर दरांत कपात केली नसली तरी भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणेचा आशावाद कायम राहण्यास तो पुरेसा आहे. सरकार, उद्योग, व्यावसायिक आणि घर घेण्यास उत्सुक असलेले नागरिक यांना हा एक सुखद धक्का आहे. एरवी पतधोरण जाहीर करण्याच्या तारखा निश्चित असतात आणि त्या दिवशी त्यावर देशाचे लक्ष केंद्रित असते, मात्र गुरुवारी भल्या सकाळी रिझर्व्ह बँकेने हे स्वागतार्ह पाऊल उचलले आहे. या निर्णयामुळे व्याजदर कमी होतील आणि व्यवहारातील चलनाची उपलब्धता वाढेल.
पुरेशा बँकमनीच्या अभावी भारतात व्याजदर चढे आहेत आणि त्यामुळे भांडवल प्रचंड महाग आहे. त्यामुळेच भारतीय व्यापारी उद्योजक परकीयांशी समान स्पर्धा करू शकत नाही, तर घर घेणारे नागरिक वर्षानुवर्षे व्याज फेडत बसतात. असे हे व्याजदर विकसित देशांच्या बरोबरीने जाणे, हा फार मोठा प्रवास असला तरी ते पुढील वर्षभरात कमी होत राहतील, असे संकेत राजन यांनी दिले आहेत. जुलै २०१४ पासून चलनवाढ नियंत्रणात आली असून कच्च्या तेलाच्या घसरणीने भारताला मोठीच मदत केली आहे. चालू खात्यावरील महसूल तूट ४.१ टक्क्यांवर जाऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिले आहे. महागाई केवळ कमीच झाली नाही तर जानेवारी २०१६ पर्यंत ती ६ टक्क्यांच्या खालीच राहील, असे संकेत मिळाले आहेत. रेपो दर कमी करण्यासाठी यापेक्षा आणखी काय हवे असते? खरे म्हणजे डिसेंबरमध्येच हे सर्व संकेत मिळाले होते, त्यामुळेच यापुढे केव्हाही दरांत कपात केली जाऊ शकते, असे राजन म्हणाले होतेच. भारतातील आर्थिक घडामोडींवर सध्या जगाचे लक्ष आहे, कारण भारतात मागणी आणि क्रयशक्ती वाढली तर १२५ कोटी लोकसंख्येचा हा देश चीनप्रमाणे पुढील काळात जगाचे इंजिन होऊ शकतो.