आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेब, सूर्याची पिल्ले काजवे झालीत त्याची गोष्ट...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वंदनीय बाबासाहेब, तुमच्या मागे येथे काय चालले आहे हे तुम्हाला सांगायचे बरेच दिवस मनात होते; पण योग येत नव्हता. मध्यंतरी बरे चालले होते, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली. म्हणून हे पत्र लिहायला घेतले. बाबासाहेब, तुमच्या क्रांतिकारी विचारांतूनच स्थापन झालेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला याच महिन्याच्या ३ तारखेला ५८ वर्षे पूर्ण झाली आहेत. जनसामान्यांना धम्मदीक्षेची प्रज्ञा तुम्ही दिली, या ऐतिहासिक घटनेलाही ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘शासनकर्ती जमात व्हा,’ असे सांगून तुम्ही तुमच्या पिलांना राजकीय शहाणपण देऊ केले होते; पण वर्तमान स्थिती फारच वाईट आहे. तुम्हाला पत्र लिहून रिपाइंची अत्यंत दयनीय स्थिती असल्याचे सांगताना खूप दु:ख होते आहे.
बाबासाहेब, तुम्ही १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. त्यानंतर पुढील वर्षातच म्हणजेच १९३७ मध्ये प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत तुम्ही आरक्षित जागेवरून १३, तर सर्वसाधारण मतदारसंघातून ४ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी ११ आरक्षित आणि ३ सर्वसाधारण मतदारसंघातून उमेदवार विजयी झाले. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या कुबड्या न घेता आपण राजकीय वाटचाल केली. वर्तमान स्थितीतील नेतृत्वाने मात्र तुमच्या या विचाराला पूर्णपणे तिलांजली दिली आहे. महाराष्ट्राच्या आंबेडकरी राजकारणात प्रामुख्याने तुमचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर, खासदार रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, स्मृतिशेष दादासाहेब उपाख्य रा. सू. गवई, नामदेव ढसाळ, टी. एम. कांबळे यांच्या नावांचा उल्लेख होतो. यांच्यापैकी तुमच्या नातवाचा अपवाद वगळता इतरांनी प्रस्थापित राजकीय पक्षांचे उंबरठे झिजवण्यातच धन्यता मानली आहे. स्वत:च्या तथाकथित राजकीय गटाचे व्यापक संघटन उभे करून स्वबळावर काही मिळवले असेल असे कुठे नजरेतच येत नाही. सेनेसोबत आधी ढसाळांनी युती करून पाहिली, पण त्यांना आलेले राजकीय अपयश त्यांच्यातील प्रज्ञावंत साहित्यिक, कवीच्या रूपाने दिसून आले नाही. सामाजिक न्यायमंत्री असताना आठवले यांनी काँग्रेस, मग राष्ट्रवादीतर्फे खासदारकी मिळवली होती, याची तुम्हाला कल्पना नसेल कदाचित..! पुढे पराभवानंतर त्यांनी ‘रिडालोस’ची स्थापना करून पाहिली. त्यानंतर मातोश्रीचे उंबरठे झिजवले. आता राज्यसभेच्या प्रतिनिधित्वामुळे त्यांनी भाजपशी सलगी वाढवली आहे. लाँग मार्चचे प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी असा आलटून-पालटून प्रवास केला. तुम्ही म्हणाल काँग्रेस तर ठीक आहे, पण राष्ट्रवादी काय प्रकार आहे...? बाबासाहेब, तुमच्या निर्वाणाच्या वेळी १६ वर्षांचे असलेले शरद पवार यांनी काँग्रेसमधून फुटून स्थापन केलेल्या नव्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी आहे. सध्या मात्र ते पृथ्वीराज बाबांच्या कृपेने आमदार आहेत, कारण त्यांनी विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारांना मते
मागितली होती.
हे ऐकून तुम्हाला सर्वात मोठा धक्का तुम्हाला बसेल; पण सांगावेच लागणार आहे. आठवलेंच्या पक्षाला राज्यात मंत्रिपद मिळाल्यास पत्नीला पुढे करणार असल्याचे वृत्त आहे. पक्षात अनेक सक्षम आणि प्रबळ उमेदवार असूनही रिपाइंने मिसेस आठवलेंनाच मंत्रिपद देण्याचा ठराव केला आहे. सध्या सरकारही पंतांचे आहे आणि त्यासुद्धा पंतांच्याच कुटुंबीयांतील आहे म्हणतात...! हो, त्यामुळे त्यांच्या रिपाइंत अस्वस्थता पसरली आहे. दादासाहेबांचे सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई सध्या ‘थांबा आणि वाट पाहा’ या भूमिकेत आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर स्वत:हून कुठल्याही राजकीय पक्षाच्या उंबरठ्यावर गेलेले नाहीत. तुम्ही दिलेले राजकीय शहाणपण त्यांनी तत्त्वत: स्वीकारलेले दिसते. बहुजनवादी ‘अकोला पॅटर्न’ मात्र राज्यभर रुजला नाही, याचे दु:ख आहे. सर्व प्रकारच्या रिपाइंची सध्याची स्थिती म्हणजे आचार नाही, विचार नाही, दिशा नाही; आंबेडकरी मतदारांना वाऱ्यावर सोडून त्यांच्या कल्याणाच्या आता तर यांनी बाता मारणेही सोडून दिले आहे. अशा दयनीय परिस्थितीत रिपाइंचा ५८ वा स्थापना दिन झाला म्हणजे तुम्हाला वाईट वाटत असेल, पण तुम्हाला सांगणे माझे काम आहे. तुमच्यापासून काहीच लपवून ठेवले नाही. रिपाइं स्थापना दिन म्हणजे ‘वांझोटा’ दिन म्हणावे लागत आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर तुम्ही आम्हाला दृष्टांतही देऊ शकत नाही, कारण तुम्हाला हे मान्य नाही; पण बाबासाहेब तुम्ही म्हणाला होतात ना 'मैं तो जीवनभर कार्य कर चुका । अब नौजवानों को आगे आना चाहिये..!' हाच मार्ग आहे, असे वाटायला लागले आहे.
बाबासाहेब, तुम्ही दिलेल्या रिपाइंचे आम्ही कसे तुकडे केले याचा काही नमुना म्हणून तुम्हाला ‘लिस्ट’ पाठवत आहे.
फुटीरवादी काही गटांची नावे : रिपाइं (आठवले गट), रिपाइं (एम. जी. नागमणी), भारतीय दलित पँथर (दयाल बहादूर), रिपाइं (गवई गट), भारिप-बहुजन महासंघ (अॅड. प्रकाश आंबेडकर), पीपल्स रिपब्लिकन पार्टी ( कवाडे गट), डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (टी. एम. कांबळे गट), रिपाइं (बी. सी. कांबळे), रिपाइं (खोब्रागडे), रिपाइं (शिवराम मोघा), रिपाइं (घनश्याम तळवटकर), रिपाइं (शिवराज), रिपाइं (राजा ढाले), इंडियन रिपब्लिकन पार्टी किंवा दलित पँथर (नामदेव ढसाळ), रिपाइं (राजाराम खरात), रिपाइं (गंगाराम इंदिसे), नॅशनल रिपब्लिकन पार्टी (अण्णासाहेब कटारे), अॅड. प्रकाश भोसले यांची रिपाइं (जयभीम), प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी (अॅड. श्याम तागडे), रिपाइं (स्वाभिमानी) शिवाय औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र रिपब्लिकन पार्टीची स्थापना करून स्थानिक नेत्यांनी स्वत:ला राष्ट्रीय नेते म्हणवून घेतले आहे. बस्स... आता तुम्हाला आणखी त्रास देण्याची इच्छा नाही, कारण आमच्यासाठी तुम्ही सुमारे ४० वर्षे खस्ता खाल्ल्या आहेत. फक्त शेवटी एवढेच सांगावे वाटते, तुम्ही प्रज्ञासूर्य होतात, तुमची पिल्ले साधी काजवेही नाही होऊ शकली...!