आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कानपिचक्या नव्हेत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर संघसंबंधित सर्व संस्था प्रसिद्धी माध्यमांच्या रडारवर आलेल्या आहेत. त्या हिंदुत्वासंबंधी काय बोलतात, कोणते कार्यक्रम करतात, या विषयांना भरपूर प्रसिद्धी मिळू लागली आहे. ही प्रसिद्धी देण्यामागचा हेतू नरेंद्र मोदी यांना अडचणीत आणण्याचा असतो. याचबरोबर सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणांना आणि वक्तव्यांनादेखील भरपूर प्रसिद्धी दिली जाते.

११ जानेवारी रोजी संघाच्या देवगिरी प्रांताचा स्वयंसेवकांचा एक दिवसाचा मेळावा औरंगाबाद येथे झाला. या मेळाव्यास मोहन भागवत उपस्थित होते. स्वयंसेवकांसमोर त्यांचा बौद्धिक वर्ग (भाषण नव्हे) झाले. त्यात ते जे काही म्हणाले, त्याच्या बातम्या झाल्या. काही वर्तमानपत्रांनी बातमी देण्याचे नियम आणि संकेत पाळले. भागवत जे बोलले ते सारांशरूपाने काही वर्तमानपत्रांनी दिले. एका ख्यातनाम मराठी वृत्तपत्राने बातमी देत असताना त्या बातमीबरोबर संपादकीय शेरेबाजीदेखील केली.

या वृत्तपत्राची शेरेबाजीयुक्त बातमी त्यांच्याच शब्दांत अशी आहे, ‘सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांना सांगितलेली ज्युलियस सीझरची गोष्ट भुवया उंचावायला लावणारी ठरली. ‘तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले; यापुढे काय', असा प्रश्न उपस्थित केल्याने नव्या सरकारला संघाच्या या कानपिचक्या तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे... त्याच्या जिंकण्याच्या पराक्रमाचे कौतुक होईल; पण समाजमनावर प्रभाव राहिला तो प्रभू रामचंद्रांचा. तसे करायचे झाल्यास जन्मभर चिकटलेल्या सवयी बदलाव्या लागतील, असे ते म्हणाले. सरसंघचालकांच्या या गोष्टीचा राजकीय अर्थ काढला जात असून पंतप्रधान मोदी यांच्या यशाशी तो जोडला जात आहे!'

बातमीचे शीर्षक आहे, ‘संघाच्या कानपिचक्या'. या कानपिचक्या कोणाच्या? तर नरेंद्र मोदी यांच्या. या बातमीत आणखी गमतीशीर वाक्य आहे ते असे, या भाषणाचा राजकीय अर्थ काढला जात असून सरकारला या कानपिचक्या तर नाहीत ना, अशी चर्चा चालू झाली आहे. एक तासाचे भाषण ऐकून त्यावर बातमी लिहिणा-या पत्रकाराला झालेली चर्चा कुठे ऐकायला मिळाली असेल? कवीविषयी असे म्हटले जाते की, जे न देखे रवी ते देखे कवी, यात थोडा बदल करून सामान्य जन जे ऐकू शकत नाहीत, जाणू शकत नाहीत ते अशी बातमी लिहिणारे पत्रकार जाणतात. संघ स्वयंसेवक सरसंघचालकांचे बौद्धिक ऐकतात, ते मनात साठवितात, त्यावर विचार करतात आणि पुढे त्यावर काय काम करायचे आहे याची चर्चा करतात. ते राजकीय चर्चा कधी करीत नाहीत. हा संघ स्वयंसेवकांचा स्वभाव जे जाणतात त्यांना ही बातमी वाचून गंमतच वाटली असेल.

जाहीर भाषणातून राजकीय क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्त्यांना चार बोल ऐकविणे ही संघाची पद्धती नाही. कोणत्याही सरसंघचालकांनी या पद्धतीचा अवलंब केलेला नाही. संघाची एक पद्धती आहे, ती अशी की, ज्याच्याविषयी बोलायचे असेल त्याला जवळ घेऊन त्याच्याशी बोलावे. जाहीरपणे वादविवाद किंवा कानपिचक्या देण्याची संघाची पद्धती नाही. केंद्रातील भाजप सरकार आणि संघ यांच्यात उत्तम समन्वय साधण्याचे काम काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना दिलेले असते, ते कार्यकर्ते हे काम शब्दश: अहोरात्र करीत असतात. या परस्पर समन्वयामुळेच भाजप ठीक चालतो आणि संघाचे कामही ठीक चालते.

भागवतांना काय सांगायचे आहे, हे समजून घ्यायला पाहिजे. केंद्रात भाजपचे सरकार आले, म्हणजे संघकार्याचा अंतिम विजय झाला, असा अर्थ स्वयंसेवकांनी करू नये. शासन येतं आणि जातं, परंतु समाज मात्र कायमस्वरूपी असतो. आपल्या समाजाचे वैशिष्ट्य तो शासनकेंद्रित नाही. शासनकर्ता हा समाजाचा सर्वोच्च आदर्श आपण कधी मानलेला नाही. ज्या-ज्या समाजाची रचना एककेंद्री असते ते समाज टिकत नाहीत आणि ज्या समाजांची रचना सत्ताकेंद्राच्या भोवती झालेली असते ते समाज, सत्ताकेंद्र कोसळल्यानंतर नामशेष होतात. शासनकेंद्रित समाजव्यवस्था प्राचीन इजिप्तमध्ये होती, रोममध्ये होती, इराणमध्ये होती. या देशांतील सत्ताकेंद्रे जेव्हा नाहीशी झाली तेव्हा तो समाजदेखील संपला. भारतात असे घडलेले नाही. घराण्यामागून घराणी राज्यकर्ती झाली, दीर्घकाळ परक्यांचे राज्य होते; परंतु आपले समाजजीवन नष्ट झाले नाही. गौतम बुद्धांच्या काळी जे समाजजीवन होते, रामायणाचे जे समाजजीवन होते, महाभारतकालीन जे समाजजीवन होते, ते जसेच्या तसे आजही चालू आहे. हे लक्षात घेता एक व्यक्ती सध्या अतिशय लोकप्रिय आहे, शासन स्थिर आहे एवढ्यावरून भविष्यातील समाजजीवन स्थिर राहील, असे नाही.

भागवत यांनी त्यासाठी प्रभू रामचंद्रांचे उदाहरण दिले आहे. त्यांच्या भाषणातील वाक्ये अशी आहेत, ‘सर्व प्रसिद्ध वीरांना जग विसरून जाते, मात्र प्रभू रामचंद्रांसारख्या महापुरुषांचे असे होत नाही. ८५०० वर्षांनंतरही रामाने आपल्या आचरणाने प्रस्थापित केलेली माणसं अजूनही आहेत. बंधुत्वपूर्ण व्यवहाराला राम-भरताची जोडी, असे आजही म्हटले जाते. संघाचे स्थानही असेच राहणार आहे. संघाला स्वत:साठी काही नको, संघाला देशाला मोठे करायचे आहे. तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे न रहे, या भावनेने संघाचे स्वयंसेवक काम करतात. म्हणून संघ वाढतो आहे.'

समाज कोणत्याही एका व्यक्तीमुळे किंवा शासनामुळे स्थिर होत नाही अथवा त्याचा विकास होत नाही, तर समाज त्याच्या जीवनमूल्यांमुळे आणि चारित्र्यामुळे स्थिर राहतो आणि त्याचा विकास होतो. आज त्याची देशाला सर्वाधिक गरज आहे. देशाचे चारित्र्यबल घडविण्याचे काम प्रभू रामचंद्रांनी केले आहे. यामुळे हजारो राजे आले आणि गेले, बादशहा आले आणि गेले, व्हाईसरॉय आले आणि गेले, परंतु समाज मात्र आपल्या मूल्यांना धरून राहिलेला आहे. त्याला आपल्या मुळांना धरून ठेवण्याचे काम भारतातील राम-कृष्णांनी जसे केले आहे, तसेच संतपरंपरेने केले आहे. आधुनिक काळातील समाजसुधारकांनीदेखील केलेले आहे.
देश उभा करणे, तो समृद्ध करणे, वैभवसंपन्न करणे, समाजरचना निर्दोष करणे, हे एका व्यक्तीच्या आवाक्याबाहेरचे काम आहे. हे काम सर्वांनी मिळून करायचे काम आहे. प्रत्येकाने करण्याचे काम आहे. कामाचा प्रभाव समाजामध्ये वाढला पाहिजे. याचा संघाचा अर्थ कोणता होता? याचा संघाचा अर्थ होतो समाजात नीतिमत्ता वाढली पाहिजे, चारित्र्यबल वाढले पाहिजे, आत्मबल वाढले पाहिजे, आत्मविश्वास वाढला पाहिजे. संघ नावाच्या संस्थेचा प्रभाव निर्माण करणे अथवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव मोठे करणे हे संघाच्या कामाचे लक्ष्य राहू शकत नाही. मोहन भागवत यांनी जे काही सांगितले आहे ते स्वयंसेवकाच्या दृष्टीने नवीन आहे, असेही नाही. संघात जाणारा स्वयंसेवक या गोष्टी सातत्याने ऐकतच असतो.

त्या नव्याने पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात आणि समूह रूपाने त्याचे चिंतन करावे लागते. मनुष्य स्वभाव असा आहे की तात्कालिक यश आणि अपयशाचे त्याच्या कार्यशक्तीवर परिणाम होत जातात. अनुकूलता असेल तर शिथिलता येते. मूळ अधिष्ठानाचा विसर पडण्याची शक्यता असते. म्हणून पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगावी लागते, असे सांगताना येथे कुणाला कानपिचक्या देण्याचा प्रश्न नसतो. संघाचा असा बौद्धिक वर्ग म्हणजे समूह मनाने केलेला हा स्वत:शीच संवाद असतो, स्वत:लाच आठवण करून द्यायची असते की आपल्याला देश वैभवसंपन्न करायचा आहे. सृष्टीची धारणा करणा-या धर्माचे संरक्षण करून हे काम करायचे आहे. जगाच्या ज्या अनंत समस्या आहेत त्याचे उत्तर आपल्याकडे आहे ते देण्यासाठी आणि ते उत्तर जगाने ऐकण्यासाठी आपण समर्थ आणि शक्तिशाली बनणे आवश्यक आहे. मोहन भागवत यांचा बौद्धिक वर्ग ऐकणा-यांची हीच मानसिक अवस्था होती. गावगन्ना राजकीय चर्चा करण्यासाठी आणि राजकीय अर्थ काढण्यासाठी त्यांच्याकडे वेळ तरी कुठून असणार?