आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Sadhvi Niranjan Jyoti And Modi's Defence By Aakar Patel

साध्वींची विधाने आणि मोदींची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साध्वी मानल्या गेलेल्या माननीय मंत्रिमहोदयांनी या आठवड्यात भारतीयांची विभागणी रामजादे (म्हणजे हिंदू)आणि हरामजादे अशी केलेली आहे .या मंत्रिमहोदया म्हणजे ज्या काही अर्धशिक्षित आणि अशिक्षित साध्वी (साध्वी म्हणजे स्वतःच स्वतःला पदवी देणारी
पवित्र व्यक्ती जिला कोणत्याही धर्मोपदेशकाचा दर्जा नाही) भारतीय जनता पक्षात गेलेल्या आहेत, त्यातील एक होय. अशी आणखी एक साध्वी म्हणजे उमा भारती ज्यांचे शिक्षण लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार सहावीपर्यंत झालेले आहे. या ज्या मंत्रिमहोदया आहेत त्यांना म्हणे आपले विधान लोकांना चुकीचे वाटावे याचेच आश्चर्य वाटले आहे. प्रसारमाध्यमांनी गदारोळ केल्यावर त्यांनी तोंडदेखली माफी मागितली. या प्रकारची अश्लाघ्य भाषा कायमच हिंदुत्ववादी पक्ष वापरत आले आहेत. आपली भूमिका पटवून देण्यासाठी ते अशा भाषेचा कसा वापर करतात ते मी नंतर दाखवून देणार आहे. मीडियाने हा विषय हाती घेतल्यावर विरोधी पक्षांनी तो लोकसभेत आणला. अरुण जेटली यांनी या विधानाचा निषेध केला आणि ते नाकारले; पण अरुण जेटली एकूणच हिंदुत्वाची फारशी बाजू घेणारे नाहीत. पण जेटली हे एकूणच राजकीयदृष्ट्या बिनमहत्त्वाचे आहेत आणि स्वतःची जागादेखील ते जिंकू शकलेले नाहीत. आपल्या पंतप्रधानांना मात्र हिंदुत्वाचे नेमके मूळ माहीत आहे. त्यामुळे त्यांनी या सगळ्या प्रकाराला काही लगेच प्रतिसाद दिला नाही. कारण नेमका कोणता संदेश लोकांमध्ये पाठवायचा हे त्यांना माहीत आहे. याबद्दल ते फारच सतर्क आहेत. त्यांनी आपली आवडती
एजन्सी एएनआयमार्फत बंद दाराआड झालेल्या बैठकीची बातमी फोडली. त्यात ते म्हणे असे म्हणाले की, सर्वांनी आपण काय बोलत आहोत याकडे जबाबदारीने लक्ष दिले पाहिजे. आता या प्रकाराला विधानाचा निषेध म्हणावा का, याबद्दल शंकाच आहे.

‘हिंदू'या वर्तमानपत्राने आपल्या संपादकीयामध्ये असे लिहिले की ‘जर पंतप्रधानांना साध्वीने वापरलेल्या शब्दांनी खरंच धक्का बसला असेल तर त्यांनी तसे स्पष्ट शब्दांत सांगायला हवे होते. त्याऐवजी त्यांनी सर्वसाधारण विधाने केली. जर त्यांना आपला थेट संदेश मंत्री आणि खासदारांना द्यायचा असता, तर निरंजन ज्योती यांना मंत्रिपदावरून दूर करणे उचित
ठरले असते. एखादी कृती करणा-यावर टीका न करता फक्त कृतीवर टीका केल्यास ते पुरेसे ठरत नाही. साध्वीने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी विरोधक चढवत असलेल्या हल्ल्यांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठीच माफीनामा सादर करण्याची चलाखी केली गेली असावी.’ विरोधी पक्षाने मोदींची चूक हेरली आणि तिचा लाभ घ्यायचा प्रयत्न केला. नंतर मोदी लोकसभेत आले आणि त्यांनी सांगितले की, साध्वी बोलल्या तसे वक्तव्य कोणीही करणे अयोग्य आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या गदारोळातील हवाच निघून गेली आणि विषय थंड झाला. प्रश्न असा आहे की, जे लोक हिंदुत्वाचा जप करतात ते अशी भाषा का वापरतात?
आणि त्यांचा कडक शब्दांत निषेध का केला जात नाही? निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात गिरीराज सिंह यांच्यासारखा लोकांना फारसा परिचित नसलेला उमेदवार पुढील
वाक्यामुळे प्रसिद्धीस आला, “वो लोग नरेंद्र मोदी को रोकना चाहते है, वो पाकिस्तान की तरफ देख रहे है. आनेवाले दिनो मे ऐसे लोगों के लिये जगह हिंदुस्थानमे नही, झारखंड मे नही, परंतु पाकिस्तानमे होगा, पाकिस्तान मे होगा...’’ याच सुमारास विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांच्या सभेची टेप बाहेर आली.
ज्या हिंदू वस्तीमध्ये दाउदी बोहरा यांनी जागा विकत घेतली होती, त्यांना तोगडियांनी सल्ला दिला होता. खरं तर दाउदी बोहरा ही भारतातील शांतताप्रिय जमात आहे. त्यांचे सुन्नी मुस्लिमांशी जमत नाही. बोहरा प्रामुख्याने श्रीमंत असल्याने समृद्ध अशा शहरी भागात राहणे पसंत करतात. त्यामुळे ते प्रामुख्याने हिंदू वस्तीत राहतात. ज्या लोकांनी तोगडियांच्या सल्ल्याची मागणी केली, त्यांना ते बोहरा आपल्या वस्तीत नको होते. तोगडिया यांनी त्यांना हुसकावून काढण्यासाठी दंगलीचे वातावरण तयार करण्याचा सल्ला दिला. जेणेकरून आपली हक्काची विकत घेतलेली मालमत्ता ते सोडून निघून जावेत. हे सारे व्हिडिओवर चित्रित
केले आहे आणि नेमकी काय योजना आहे हे त्यातून स्पष्टपणे लक्षात येते. मी मागे म्हटल्याप्रमाणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या. प्रसारमाध्यमे आक्रमक झाली आणि मोदी यांनी त्याला एक सर्वसामान्य विधान िट्वट करून प्रतिसाद दिला. ‘भारतीय जनता पक्षाचे शुभचिंतक म्हणवणा-यांनी वेडीवाकडी विधाने करून विकास आणि चांगले प्रशासन अशा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून प्रचाराला भरकटवू नये.' मात्र, याच मोदींनी गिरीराज सिंह यांना मंत्री केले आणि आपला अधिक विश्वास कशावर आहे, हे दाखवून दिले. आरएसएसने तोगडिया यांच्या विधानाबाबत गैरसमज झाल्याची थाप मारली. तोगडिया आजही विश्व हिदू परिषदेचे
आंतरराष्ट्रीय अध्यक्ष आहेत. यामागचे मूळ कारण असे आहे की, मोदी आणि आरएसएस यांनी जरी अशा विधानांचा पुटपुटत निषेध केला तरी आतून त्यांची या विधानांना मान्यता असते. म्हणूनच ते अशी विधाने करणा-या व्यक्तींचा पुरस्कार करतात. अर्थात हे घडते कारण भारताचा एक मोठा समुदाय या विधानांच्या बाजूने प्रतिसाद देतो, मग मीडिया कितीही आरडाओरडा करू देत.

अविवेकी वक्तव्यांमुळे कायम वादग्रस्त
१९९० च्या दशकाच्या प्रारंभीच्या वर्षांतील भारताला लाजेने मान खाली घालायला लावणारी घटना म्हणजे ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येमध्ये बाबरी मशिदीचे करण्यात आलेले उद्ध्वस्तीकरण. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. प्रत्येक धर्माच्या माणसाने इतर धर्मांचा योग्य आदर बाळगावा तसेच राजकारण, समाजकारणात धर्माचे स्तोम माजवू देऊ नये, हा
धर्मनिरपेक्षतेचा गाभा आहे. पण बाबरी मशीद उद्ध्वस्त करून त्या तत्त्वालाच हरताळ फासण्यात आला. अडवाणी यांनी काढलेल्या रथयात्रेत त्या वेळी विहिंपचे सर्व स्तरांवरचे नेते सक्रिय झाले होते. त्यामध्ये साध्वी ऋतंबरा यांचाही समावेश होता. संघ परिवारातील दुर्गा वाहिनीच्या तत्कालीन प्रमुख असलेल्या साध्वी ऋतंबरा यांनी या काळात केलेली अत्यंत
आगखाऊ भाषणे करून जनतेचे लक्ष वेधून घेतले होते. बाबरी मशीद उद्ध्वस्तीकरणाच्या घटनेची चौकशी करणा-या लिबरहान आयोगाच्या अहवालामध्येही साध्वी ऋतंबरा यांच्या भडक वक्तव्यांबद्दल कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. त्याच काळात अधिक चर्चेत आलेल्या साध्वी उमा भारती या सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय
जलसंपदा मंत्री आहेत. ज्या वेळी बाबरी मशीद उद्ध्वस्त होत होती, तेव्हा घटनास्थळी उमा भारती स्वत: उपस्थित होत्या. याआधी वाजपेयी सरकारच्या मंत्रिमंडळातही उमा भारती यांनी मंत्री या नात्याने विविध खात्यांची जबाबदारी पेलली होती. १९९४ मध्ये हुबळी येथे झालेल्या जातीय दंगलप्रकरणी साध्वी उमा भारती यांच्यावर अटक वॉरंट जारी झाल्याने त्यांना ऑगस्ट २००४ मध्ये मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. संघ परिवार व विश्व हिंदू परिषदेच्या तालमीत तयार झालेल्या साध्वींपैकी उमा भारती, निरंजन ज्योती या सक्रिय राजकारणामध्ये आल्या. मंत्री झाल्या. मात्र, अविवेकी वक्तव्यांनी कायम वादग्रस्त ठरलेल्या या साध्वींना व्यापक राजकारण व समाजकारण कसे करावे याचे भान फारसे कधीच आले नाही.