आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्कारांचे संवर्धन करणारी संस्था

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पूज्य साने गुरुजी म्हणजे एक थोर मातृभक्त, विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि उत्कृष्ट कवी-लेखक. त्यांच्या गीत आणि कथालेखनाने मानवाच्या विकासासाठीच प्रयत्न केले. हा विकास भावपूर्ण अंत:करणातूनच होतो म्हणून त्यांनी बालशिक्षणाला अग्रक्रम दिला. त्यांच्या विविध वाङ्मयातून भारतीय संस्कृतीच्या संवर्धनाचा मार्ग अधोरेखित झाला. आपला देश 'बलसागर भारत' व्हावा या समर्पित भावनेनेच अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी कार्य केले.
साने गुरुजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या कार्याचं चालतंबोलतं स्मारक व्हावं, या ध्येयाने झपाटलेल्या साने गुरुजींचा एक मुलगा प्रकाशभाई मोहाडीकर यांनी २४ डिसेंबर १९५१ रोजी अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची स्थापना केली. आज महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ४५० शाखांतून "शाळा तेथे कथामाला'असा विस्तारही केला. आजही हे कार्य अव्याहत सुरूच आहे. या शाखांमार्फत विविध स्पर्धांचे आयोजन, मंगल वाङ्मय प्रसार, बाल आनंद मेळावे, श्रमसंस्कार शिबिरे, परिसर सहली आणि श्यामची आई संस्कार परीक्षा इत्यादींचे आयोजन केले जाते. प्रकाशभाईंनी महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांत मंगलयात्रा सुरू करून गुरुजींचा विचार रुजवला. प्रकाशभाईंचे १९ मे २०१२ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतरही त्यांनी सुरू केलेल्या स्मारकाचं कार्य धडपडणा-या असंख्य मुलांनी जागृत ठेवलं आहे. कथामालेचे अनेक कार्यकर्ते वर्षभरातून एकत्र येऊन त्यांचे स्नेहमिलन व विचारांचे आदान-प्रदान व्हावे म्हणून वार्षिक अधिवेशनाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रात आणि बाहेरच्या राज्यांत आतापर्यंत कथामालेची ४७ अधिवेशने झाली असून ४८ वे अधिवेशन औरंगाबादेत घेण्यात येत आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने मंगलयात्रा, कथाकथन, परिसंवाद, बालमेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या अधिवेशनात 'श्यामची आई' या गाजलेल्या पुस्तकाच्या १० हजार प्रती अत्यल्प किमतीत वितरित करण्याचा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला आहे, हे विशेष.