आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादाला चपराक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतंत्र स्कॉटलंडच्या मागणीला स्कॉटलंडवासीयांनीच नकार दिल्यामुळे ब्रिटनच्या राजकीय इतिहासात एका नवा अध्याय जोडला गेला आहे. सुमारे तीनशे वर्षांपासून स्वतंत्र स्कॉटलंडच्या विषयावर ब्रिटनचे राजकारण ढवळून निघत असे. गेल्या दोन वर्षांत तर स्कॉटलंडमधील युनियनिस्ट पार्टीने स्वतंत्र स्कॉटलंडच्या मागणीला देशव्यापी जोर देऊन ब्रिटनच्या संसदेवर या विषयावर सार्वमत घेण्यासाठी दबाव आणला होता. या दबावापुढे झुकून ब्रिटनच्या संसदेने सार्वमत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता.
स्कॉटलंडमध्ये सार्वमताच्या निमित्ताने राष्ट्रवादी भावनेला जोर आला होता. युनियनिस्ट पार्टीने स्कॉटलंडच्या इतिहासाला साद घालत स्कॉटिश जनतेला ब्रिटनपासून स्वतंत्र राहण्यासाठी गळ घातली होती. ब्रिटनच्या पंतप्रधानांनी स्कॉटलंडचे विभक्त होणे या देशाच्या हितासाठी कसे योग्य नाही, असा प्रचार केला होता. ब्रिटनमध्ये असे वातावरण झाले होते की स्वतंत्र स्कॉटलंड समर्थकांना निसटता विजय मिळेल. पण हे सगळे अंदाज खोटे ठरले व ५५ विरुद्ध ४५ टक्क्यांनी स्वतंत्र स्कॉटलंडची मागणी जनतेने फेटाळून लावली. महत्त्वाचे म्हणजे ग्लासगो या स्कॉटलंडमधील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या शहरात स्वतंत्र स्कॉटलंडच्या बाजूने भरघोस मते पडली, पण स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्गच्या जनतेने मात्र आम्हाला हे स्वातंत्र्य नको असल्याचे सांगितले. ब्रिटनच्या शेकडो वर्षांच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत ही मैलाचा दगड ठरावी अशी घटना आहे.
ब्रिटनच्या जनतेने एकता व अखंडतेची कास धरली. राष्ट्रवाद, भाषिक-सांस्कृतिक अस्मिता यांना देशाच्या ऐक्यापुढे दुय्यम स्थान दिले. व्यक्तिस्वातंत्र्य व लोकशाहीचा विकास यांना पसंती दिली. स्वतंत्र स्कॉटलंड झाले असते तर ब्रिटनच्या पायाभूत व्यवस्थेवर, जगभर पसरलेल्या त्यांच्या उद्योगविश्वावर प्रचंड ताण पडला असता. स्कॉटलंडही नव्या ऊर्जेने उभा राहण्यास बराच कालावधी लागला असता. खरे कौतुक ब्रिटनच्या लोकशाहीचे करावयास हवे की, कोणताही हिंसाचार, दंगली, रक्तपात न घडता हे सार्वमत शांततेत पार पडले. युरोप खंडात प्रादेशिक अस्मिता व वंशवादाची लाट असूनसुद्धा स्कॉटलंडच्या जनतेने ब्रिटनच्या राज्यघटनेच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला ही समाधानाची बाब म्हणावी लागेल.